समता सैनिक दल: काळाची गरज 1


समता सैनिक दल: काळाची गरज

जय भीम मित्रांनो,
बाबासाहेबांनी जन्मास घातलेल्या संघटनांपैकी समता सैनिक दल हे एक महत्वाचे संघटन होय जिच्या स्थापनेविषयी बोलतांना बाबासाहेब त्यांच्या भाषणात म्हणतात कि, “महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने करण्यात आली.” म्हणजेच महाडच्या चवदार तळ्याचा जो सत्याग्रह करण्यात आला तो प्रामुख्याने या देशात ‘समान न्याय’ प्रस्थापित करण्याच्या उदात्त ध्येयाने प्रेरित होता. आम्हीही माणसेच आहोत आणि आम्हालाही इतरांसारखेच माणूस म्हणून स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे हे प्रस्थापित व्यवस्थेला त्या सात्याग्रहातून निक्षून सांगितल्या गेले. याविषयी बाबासाहेब त्यांच्या भाषणात म्हणतात, “ या देशात जे अनेक धर्मीय समाज आहेत त्यात हिंदू समाजात अस्पृश्यांचा समावेश होत असल्यामुळे आणि या हिंदू समाजातील स्पृश्य बांधवांकडून अस्पृश्य मानलेल्या समाज बांधवांवर होणाऱ्या अन्याय, जोर-जुलूम, विषमतेची शिकवण व वागणूक वगैरे अनिष्ट आणि घातुक प्रकारांना आळा बसविण्यासाठी या दलाची प्रामुख्याने स्थापना करण्यात आली. ज्या समाजात माणुसकीने जगता येत नाही, नैसर्गिक हक्कांचा जिथे जिथे समतेने उपभोग घेता येत नाही; ज्या धर्मावर विषमतेचा कीट चढला आहे तो धर्म झुगारून देऊन खरी माणुसकी जाणणारा धर्म निर्माण करण्याकरिता जे कार्य करावे लागत आहे, त्या पवित्र आणि उज्वल कार्यासाठी या दलाची स्थापना झालेली आहे.” यावरून हे अगदीच स्पष्ट आहे कि समता सैनिक दलाचे कार्य हे मोठे उज्वल तत्वांचे लढे लढण्याकरिताच करण्यात आली आहे.

आजघडीला आपण इतरत्र अवलोकन केले तर आपणास समाजाचे जे काही विस्कळीत चित्र दिसते आहे त्याला एक प्रमुख कारण म्हणजे बाबासाहेबांना अपेक्षित तत्वे या समाजात अजूनही त्याप्रमाणात रुजलेली दिसत नाहीत किंबहुना ती तत्वे नेमकी कोणती आहेत, त्या तत्वांचा आमचा आयुष्याशी काय सबंध हेही पुरेसे कळलेले दिसत नाहीये आणि म्हणूनच बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी साठी लिहिलेली जगातील सर्वश्रेष्ठ सात तत्वे फारच कमी लोकांना ज्ञात असल्याचे दिसते. त्यांचा प्रचार प्रसार हि होतांना फारसा दृष्टीस पडत नाही. म्हणजेच एकंदरीत रिपब्लिकन तत्वांना या समाजात रुजविण्याची फार मोठी जबाबदारी जी प्रामुख्याने समता सैनिक दलाच्या खांद्यावर बाबासाहेबांनी सोपविलेली आहे ती पार पाडण्यासाठी समाजातील तरुण वर्गाने पुढाकार घेणे हि काळाची गरजच नव्हे तर आपली नैतिक जबाबदारी आहे. यास्तव बाबासाहेब म्हणतात, “समता सैनिक दलाचा सैनिक म्हणजे समाजसेवेसाठी तळहातावर शीर घेऊन लढण्यासाठी सज्ज झालेला निर्भय योद्धाच म्हटला पाहिजे.” सद्यपरिस्थित बाबासाहेबांनी जी रिपब्लिकन तत्वप्रणाली आपल्या लेकरांना या समाजात रुजवायला दिली ती आम्ही प्रामाणिकपणे या देशात रुजविण्यासाठी सैनिकी बाण्याने अविरत संघर्षरत राहिले पाहिजे. बाबासाहेब समता सैनिक दलाच्या सैनिकांना उद्देशून सांगतात कि, “सैनिक हा शब्द मोठा आहे. आपण खात्रीने बाजारबुणगे नाहीत, हे सिद्ध करणारा हा शब्द आहे. आपले कार्य करीत असतांना तुम्ही सर्वजण प्रत्यक्ष फलटणीतच आहात, हि भावना मनात बाळगली पाहिजे.”
बाबासाहेबांनी समता सैनिक दलाची नाळ आमच्या राजकीय पक्षाशी जोडलेली आहे हे बहुतांश लोकांना आजघडीला न पचणारेच दिसते म्हणूनच कि काय रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणी विषयी ते काहीसे उदासीन दिसत आलेले आहेत. परंतु जोवर आम्ही आमचा पूर्वेतिहास समजून घेणार नाही तोवर नवा इतिहास घडविणे कठीणच, नाही का? नागपूर येथे दि. २० जुलै १९४२ ला समता सैनिक दलाला उद्देशून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भाषणात आवर्जूनपणे हे सांगितले आहे कि आपल्या चळवळीच्या ध्येय धोरणाबरोबर समता सैनिक दलाच्या ध्येय धोरणातही बदल झालेला आहे आणि त्यात ते राजकीय समतेसाठी स्वतंत्र राजकीय हक्कांची आवश्यकता प्रतिपादित करतात. १९४४ ला कानपूर येथील भाषणात बाबासाहेबांनी जे सांगितले आहे ते आम्ही विशेषत्वाने लक्षात घ्यायला हवे ज्यात ते म्हणतात, “ स्वयंसेवकांच्या संघटनेच्या (SSD) आवश्यकतेवर माझा पूर्णतः विश्वास आहे. हि संघटना चालू ठेवावी एवढेच नव्हे तर प्रत्येक प्रांतात तिच्या शाखा उघडाव्या व दलित वर्गातील प्रत्येक तरुण तिचा सभासद होईपर्यंत तिचा विस्तार करण्यात आला पाहिजे.” यावरून समता सैनिक दलाची अनन्यसाधारण आवश्यकता आपल्या लक्षात येते. आमच्या रिपब्लिकन चळवळीचा समता सैनिक दल हा कणा होय. असे असतांनाही समाजातील स्वताला विद्वान समजणारे काही महापंडित अलिप्ततावाद स्वीकारून समाजाची दिशाभूल करण्यात अग्रेसर आहेत आणि चळवळीची दिवसागणिक उद्ध्वस्थावस्था करण्याकडेच यांचा कल आहे तेव्हा समाजबांधवांनी वेळीच सावध होऊन आपल्या चळवळीची योग्य दिशा समजून घेऊन त्याच दिशेने मार्गक्रमण करणे हितावह होईल. समाज प्रबोधन करणाऱ्या विद्वानांनी दलाकडे बघण्याची दृष्टी बदलवून त्यांना बौद्धिकदृष्ट्या सक्षम करून वैचारिक लढवैय्ये तयार करण्याच्या उदात्त कार्यात पुढाकार घ्यायला हवा. कारण आता आमचे युद्ध वैचारिक जास्त आहे. समाजविघातक विविध विचारसरणी आपले तोंड बाहेर काढू इच्छित आहेत तेव्हा रिपब्लिकन विचारधारा अधिकाधिक भक्कमपणे या देशात रुजविण्यासाठी सामजिक आणि राजकीय लढा मजबूत करणे गरजेचे आहे. आम्ही राजकीय दृष्ट्या कमजोर दिसतो आहे त्याला प्रमुख कारण म्हणजे समता सैनिक दलाची झालेली उपेक्षाच होय असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही राजकीयदृष्ट्या शक्तिशाली असण्यासाठी जो हुकुमवजा आदेश दिला आहे तो आम्ही पक्का ध्यानात ठेवला पाहिजे. ज्यात ते म्हणतात, “समता सैनिक दल हे आपल्या राजकीय पार्टीचे सामर्थ्य आहे. लढणाऱ्या सैनिकांशिवाय कोणतीही पार्टी सामर्थ्यवान होणार नाही. आपल्याला तर मोठमोठ्या संस्थांशी टक्कर द्यावयाची आहे. म्हणून समता सैनिक दल वाढविणे हे प्रत्येक पुढाऱ्याचे कर्तव्य आहे.” तेव्हा आपापल्या जबाबदाऱ्या ओळखून प्रत्येकाने रिपब्लिकन चळवळीशी इमाने इतबारे कार्यरत असले पाहिजे. समता सैनिक दलात तरुणांनी अधिकाधिक संख्येने भाग घेऊन शिस्त, संघटना आणि स्वार्थत्याग हा बाणा अंगिकारला पाहिजे. दुसऱ्या व्यक्तीच्या जीवावर आता समाज परिवर्तनाची स्वप्ने पाहणे म्हणजे स्वतच स्वताची गुलामगिरीकडे वाटचाल करवून घेणे होय. कोणी एकटा माणूस समाज परिवर्तन करणार नाही तेव्हा समाज परिवर्तनाच्या लढाईत प्रत्येकाने सहभाग घेतला पाहिजे. मरणाच्या तयारीनेच परत आता रणांगणात आम्ही उतरलो पाहिजे. याशिवाय दुसरा अन्य कोणताही मार्ग आपणापुढे नाही.

समता सैनिक दलाची बांधणी करतांना तिच्या घटनेची पूर्ण जाण ठेवून तिच्या अंमलबजावणीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध असलो पाहिजे. रिपब्लिकन पार्टी च्या उभारणीसाठी प्राणप्रणाने लढण्यासाठी तळहातावर शीर घेऊन निर्भय योद्ध्याची भूमिका बजावण्याची वेळ आता आलेली आहे. समता सैनिक दलाचे कार्यकर्ते सैनिक या उदात्त कार्यात कुठेही कमी पडणार नाहीत या दुर्दम्य आशावादासहित रिपब्लिकन चळवळीच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनपूर्वक सदिच्छा !!! ???

प्रशिक आनंद
(National Coordinator)

समता सैनिक दल
(गाव तिथे शाखा, घर तिथे सैनिक)

JOIN SSD?8655582188
JOIN SSD?9324127909
www.ssdindia.org

(रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणीसाठी कटिबध्द)


Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.

One thought on “समता सैनिक दल: काळाची गरज