बुद्धधम्मातील आर्यसत्ये किती ?


? बुद्धधम्मातील आर्यसत्ये किती? ?

मित्रांनो,
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शास्त्रशुद्ध, तर्कबुद्धीवर तपासलेल्या बौद्धांच्या पवित्र ‘The Buddha and His Dhamma’ या धर्मग्रंथाच्या ‘परिचय’ भागात बुद्धधम्माविषयी एकूण चार प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या चार प्रश्नांपैकी जो दुसरा प्रश्न आहे तो आर्यसत्यांविषयी आहे. याविषयी बाबासाहेबांचे स्वतःचे काय मत आहे ते आपण आधी जाणून घेऊ या म्हणजे चार आर्यसत्यांविषयी प्रश्न का उपस्थित केल्या गेला असावा हे समजण्यास मदत होईल. बाबासाहेब म्हणतात, ” दुसरी समस्या चार आर्यसत्यांनी निर्माण केली आहे. बुद्धाच्या मूळ शिकवणुकीत त्यांचा अंतर्भाव होता काय? हे सूत्र बौद्ध धम्माच्या मुळावरच आघात करणारे आहे. जीवन म्हणजे दुःख, मृत्यू म्हणजे दुःख आणि पुनर्जन्म म्हणजेही दुःख तर सर्वकाही संपलेच म्हणावे लागेल. मग धम्म किंवा तत्वज्ञान माणसाला या जगी सुख प्राप्तीसाठी सहाय्यक होऊच शकणार नाही. जर दुःखापासून कधीच मुक्ती नसेल तर धम्म काय करणार? अबौद्धांनी बौद्ध धम्म ग्रहण करण्याच्या मार्गात हि चार आर्यसत्ये म्हणजे मोठी बाधाच होय. कारण ही चार आर्यसत्ये माणसाला आशावाद नाकारतात. हि चार आर्यसत्ये बौद्ध धम्माला निराशावादी धम्माच्या रूपाने प्रस्तुत करतात.” यावरून ही बाब आपल्या लक्षात येते की, जागतिक पटलावर बुद्धाने मान्य केलेल्या दुःखाच्या बाबतीत अतिशयोक्तीपूर्ण (नुसते दुःखच दुःख) मांडणी बुद्धधम्माच्या नावे करण्यात आल्याने त्यावर विवेचन करतांना पुढे बाबासाहेब हे प्रश्न उपस्थित करतात की, ” काय हि आर्यसत्ये मूळ धम्मात अंतर्भूत आहेत अथवा भिक्खुंनी ती मागाहून प्रक्षिप्त (जोडलेली-accretion) केली आहेत?”
मित्रांनो, आता बाबासाहेबांनी हा जो?वरील प्रश्न उपस्थित केला आहे तो आपण नीट लक्षपूर्वक समजून घ्यायला हवा. त्यावर सूक्ष्म अभ्यास केल्यास, चिंतन केल्यास आपणांस असे लक्षात येईल कि चार आर्यसत्ये ही काही बुद्धांनी स्वतः प्रतिपादिलेली नाहीत असे बाबासाहेबांचे मत वरील विधानावरून अगदीच स्पष्ट होते आणि ज्याअर्थी ती बुद्धांनी सांगितलेली नाहीत तरीदेखील बुद्धधम्माचा ते भाग आहेत असे सार्वत्र म्हटल्या जाते आणि म्हणूनच बाबासाहेबांनी हा प्रश्न उपस्थित केला की, “काय हि आर्यसत्ये मूळ धम्मात अंतर्भूत आहेत अथवा भिक्खुंनी ती मागाहून प्रक्षिप्त (जोडलेली) केली आहेत?”
जर बाबासाहेबांना ती चार आर्यसत्ये मान्य असती तर त्याविषयी प्रश्न उपस्थित करण्याची गरजच नव्हती. परंतु ती त्यांना अमान्य होती हे त्यांनी ” ही चार आर्यसत्ये धम्माला निराशावादी म्हणून प्रस्तुत करतात असे सांगून अमान्य केलेली आहेत.”
हि गोष्ट अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट होण्यासाठी सिद्धार्थ गौतमाचे नेमके कोणते प्रश्न होते हे जाणून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण प्रथम खंड भाग चार, ‘बुद्धत्वप्राप्ती’ (Ref.TBHD) यांवर लक्ष केंद्रित करू या. यातील शेवटच्या नवव्या क्रमांकातील ओळींमध्ये लिहिल्याप्रमाणे, चवथ्या सप्ताहाच्या अंतिम दिनी रात्रप्रहरी त्याचे (सिध्दार्थाचे) चित्त प्रकाशमान झाले. त्याच्या चित्तात प्रकाशकिरणे प्रस्फूटित झाली. त्याला अनुभूती झाली की या जगात दोन समस्या आहेत. प्रथम समस्या हि कि, या ‘जगात दुःख आहे. दुसरी समस्या हि कि, हे ‘दुःख निवारण’ करून मानवमात्राला सुखी कसे करता येईल? आणि पुढे बुद्धाने जगातील ज्या मानवी दुःखावर सत्यभाष्य केले त्या दुःखाबाबत इतर लोकांनी अतिशयोक्ती करून ‘मानवी जीवन हे जणूकाही नुसते दुःखाचे महासागरच आहे’ अशी मांडणी केलेली दिसते आहे. वास्तविक पाहता बुद्धाने एका प्रवचनात ‘मनुष्य जन्म हि एक अमोल देण होय’ (life is a precious thing.–Ref. TBHD) आणि मानवी दुःख हे मनुष्य-मनुष्यातील गैर व्यवहारामुळे निर्माण होते असे सांगितले आहे. तेव्हा दुःख अस्तित्वास (Existence of suffering) प्रथम आर्यसत्य म्हटले गेले आहे. ज्याअर्थी जीवन हि अमूल्य देण (Precious thing) आहे आणि म्हणूनच ते अधिकाअधिक सुंदर रीतीने जगता यावे म्हणून बुद्धाने ‘अरियं अष्टांगिक मार्ग’ (Ariyan Eightfold path–Ref. TBHD) सांगितला आहे. जो ‘दुःखमुक्ती’ चा मार्ग होय ज्याला दुसरे आर्यसत्य म्हटले आहे. तेव्हा बुद्धाने सांगितलेले दुःख हे इतर साहित्यिकांनी, भाषा शास्त्राच्या विद्वानांनी ‘अतिशयोक्तीपूर्ण करून सांगितल्यामुळे धम्म निराशावादी भासतो’ असेही पुढे बाबासाहेब त्याच ग्रंथात म्हणतात. याचा अर्थ बुद्धापुढे एकूण दोनच बाबी होत्या ज्यावर बुद्धाने संशोधन केले. तेव्हा त्या दोन बाबी म्हणजे (प्रथम विषय दुःख आणि दुसरा विषय दुःखमुक्तीचा मार्ग) बुद्धाच्या धम्माची दोन आर्यसत्ये होत. TBHD ग्रंथातील ‘बुद्धत्वप्राप्ती’ या प्रकरणात आपणांस ते वाचता येईल की बुद्धाचे फक्त दोनच प्रश्न होते आणि म्हणून मग बाबासाहेबांनी असे म्हटले की, “काय हि चार आर्यसत्ये नंतर धम्मात भिक्खुंनी मागाहून तर जोडलेली नाहीत ना?” कारण त्यांना शंकात्मक प्रश्न पडला की अबौद्ध लोकांना बौद्ध धम्म निराशावादी का बरे वाटत असावा?”…तेव्हा त्यांनी याचा शोध घेतला आणि आपल्या तर्कबुद्धीवर हे स्पष्ट केले की चार आर्यसत्ये हि काही धम्माचा भाग नव्हेत. मात्र कुठलीही बाब स्वीकारतांना तर्कबुद्धीच्या कसोट्या लावायला हव्यात त्याप्रमाणे बाबासाहेबांनी या चार आर्यसत्यांबद्दल कसोट्या लावून त्याबद्दल त्याचे मार्मिक आणि तार्किक विवेचन TBHD- Book VI, Part III यांतील Charge of Preaching Virtue and creating gloom मध्ये (3) रे प्रकरण ‘Is Buddhism Pessimism?’ यांत करून बुद्धाच्या आर्यसत्याविषयी प्रकाश टाकला आहे आणि त्यातील पहिले आर्यसत्य जे बुद्ध मांडतात कि मानवी जगात ‘दुःख’ आहे. परंतु दुःख या बाबीस, जगातील विचारवंतांनी मात्र बुद्धाने मांडलेल्या सर्वसाधारण वैश्विक अस्तित्वास डावलून अगदीच अतिशयोक्ती वर नेऊन मांडले आहे. त्यामुळे अबौद्ध जनतेद्वारे बुद्धाच्या धम्माविषयी निराशावादी दृष्टिकोनातून बघितले जाते असे बाबासाहेब स्पष्ट करतात.

इतकेच नव्हे तर ते पुढे म्हणतात की, “कार्ल मार्क्स ने सुद्धा जगात शोषण आहे असे म्हटले आहे.” परंतु त्याच्या सिद्धांताला मात्र कोणीही निराशावादी आहे असे म्हणत नाहीत. हि बाब बाबासाहेबांना वाचकांच्या विशेष लक्षात आणून द्यावयाची असल्यामुळेच बाबासाहेबांनी ‘कार्ल मार्क्स ने सुद्धा’ असा शब्दप्रयोग हेतुपुरस्पर केलेला आहे. त्यातून त्यांना हेच सांगावयाचे आहे की दु:खाच्या अस्तित्वाची मान्यता एकट्या बुद्धांनीच केली नाहीये तर कार्ल मार्क्स देखील ‘दुःखाचे शोषणात्मक अस्तित्व’ मान्य करतो. मात्र कार्ल मार्क्स कडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोण भिन्न स्वरूपाचा का बरे असावा? तेव्हा एकट्या बुद्धाकडे दुःखाचा गोषवारा मांडणारे व्यक्तिमत्व म्हणून बघू नका तर कार्ल मार्क्स सुद्धा दुःखाचे अस्तित्व मान्य करणारा आहे. हे बाबासाहेबांनी कार्ल मार्क्स च्या बाबतीत ‘सुद्धा’ हा शब्दप्रयोग करून स्पष्ट केले आहे. अन्यथा ‘सुद्धा’ हा शब्दप्रयोग करण्याची त्यांना खरे तर गरजच नव्हती. पुढे बाबासाहेब बुद्धाने मांडलेल्या दु:खाविषयी म्हणतात की, “जे भाषातज्ञ, भाषाशैलीत पारंगत विद्वान (Rhetoric) हे जाणतात कि हि एक कलात्मक अतिशयोक्ती मात्र आहे आणि जे वाङ्मय-साहित्यकलेत निष्णात आहेत ते प्रभाव उत्पन्न व्हावा यासाठी अशा प्रकारची भाषा उपयोगात आणतात.” यावरून असे दिसते की, भाषाशास्त्रातील निष्णात विचारवंत लेखक, साहित्यकार हे दुःखाचे अस्तित्व (पहिले आर्यसत्य- जगात दुःख आहे) मान्य करतांना अतिशयोक्तीच्या स्वरूपात त्याची मांडणी करतात. बाबासाहेब मात्र बुद्धाने मांडलेल्या दुःखाच्या अस्तित्वास अतिशयोक्तीच्या स्वरूपात नव्हे तर ‘सर्वसाधारणपणे दुःखाच्या मानवी आकलनाच्या स्वरूपातील ते एक वैश्विक सत्य होय’ या अर्थाने त्यास स्विकारतात जसे बुद्धाने त्याच्या तत्वज्ञानात ते प्रतिपादित केले आहे अगदी तसेच ! पुढे बाबासाहेब दुसऱ्या आर्यसत्यावर भाष्य करतांना म्हणतात, ” बुद्धाचे दुसरे आर्य सत्य असे म्हणते कि, दुःखाचा नाश झालाच पाहिजे. दुखः नाशाच्या कर्तव्यावर भर देण्यासाठीच बुद्धाने दु:खाच्या अस्तित्वाची चर्चा केली.”
यावरून हे स्पष्ट होते की बुद्धाने दुःखावर चर्चा का केली? कारण पहिले आर्यसत्य ‘दुःखाचे अस्तित्व’ असणे म्हणजेच मानवी जीवनात ‘दुःख’ असल्यामुळे त्यातून स्वतःची मुक्ती करण्यासाठी काही कर्तव्ये करणे गरजेचे ठरवते. तेव्हा दुसरे आर्यसत्य हे ‘दुःख विनाशासाठी कर्तव्य’ करण्याचे सुचविते म्हणजेच त्याद्वारे ‘दुखमुक्ती’ शक्य आहे याची शाश्वती देते. एकंदरीत या दोनच बाबींवर (दुःख आणि दुखमुक्ती) धम्माचे सत्य दडलेले आहे, धम्म आधारलेला आहे. ज्यास बाबासाहेबांनी दोनच आर्यसत्ये म्हणून मान्य केले आहे हे त्यांच्या बुद्ध धम्माबाबत केलेल्या सूक्ष्म विवेचनातून निष्पन्न होते.

(मूळ लेखन दि.११/०८/२०१६
व पुनर्लेखन बुद्धजयंती दि.३०/४/२०१८)

?जय भीम?

प्रशिक आनंद,
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, दीक्षाभूमी नागपूर.

(रिपब्लिकन चळवळीच्या घटनात्मक पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.