बामसेफ : प्रतिक्रांतीचे एक षडयंत्र


 ⁠⁠⁠? बामसेफ : प्रतिक्रांतीचे एक षडयंत्र ?

जयभीम मित्रांनो,
बामसेफविषयी आमचे स्वतःला बहुजन, मुलनिवासी म्हणविणारे मित्र बराच उहापोह करतात की हे संघटन कसे मुलनिवासी लोकांसाठी आहे व बाह्यनिवासी अर्थात विदेशी लोकांशी कसा संघर्ष करीत आहेत हे सुध्दा दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सोबतच ह्या लढ्यात या संघटनेला कामगारांचे संघटन असल्यामुळे काही मर्यादा आहेत. हे सुध्दा दाखविण्याचा प्रयत्न करतात. यामुळे हे संगठन राजकीय लढा न लढता सामाजिक लढा लढत आहे असे भासवण्याचा प्रयत्न सतत करीत राहतात.

वरील सर्व बाबींचा व बाबासाहेबांनी आम्हाला दिलेल्या संघटनाचा व त्यानी दाखविलेल्या मार्गाचा विचार केल्यास आपणाला समजेल की खरेच बामसेफ (BAMCEF) हे संगठन बाबासाहेबांनी दाखविलेल्या दिशेने कार्य करीत आहे कींवा नाही. तसेच हे संघटन कामगारांच्या नावावर, कामगारांचे संघटन असल्यामुळे हे संघटनेने कामगारांसाठी काही उपलब्धी  प्राप्त करुन दिल्या कींवा नाही याचाही विचार करावा लागेल. तसेच हे संघटन खरेच बाबासाहेबांनी दिलेल्या दिशानिर्देशानुसार कामगार संघटन आहे काय यावर विचार केले तर त्या संघटनेचे उद्देश्य व कार्यावरुन ते खरेच कामगार संघटन आहे काय हेही समजण्यास सोपे जाईल.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिस्कृत हितकारीणी सभेपासुन आपल्या राजकीय व सामाजीक जिवनाला खर्‍या अर्थाने चळवळीच्या रुपाने सुरुवात केली म्हटल्यास अतिशोक्ती होणार नाही. तसे तर बाबासाहेब स्वतःच 1920 पासुन आपल्या राजकीय जिवनाची सुरुवात मानतात. 20 जुलै 1924 ला बहिस्कृत हितकारीणीच्या स्थापनेनंतर खर्‍या अर्थाने अस्पृश्य समाजात त्यांच्या माणुसकीच्या हक्काविषयी जागृती करण्यास जोर वाढला होता व तसे कार्य ही सुरु होतेच परंतु अस्पृश्य समाजातील बहुसंख्य लोक वेगवेगळ्या कारखान्यात व गिरण्यात काम करीत होते. त्यांचे अस्पृश्य म्हणुन अधिक शोषण होत होते हे बाबासाहेबांनी बघितले त्यामुळे त्यांना वाटले की कामगारांचा एक पक्ष असल्यास तसेच त्यांचे काही प्रतिनिधि निवडुन विधिमंडळात  गेल्यास कामगार हिताचे काही कायदे करता येईल म्हणुन 1936 साली ‘ स्वतंत्र मजुर पक्ष ‘ या नावाने राजकीय पक्षाची स्थापना केली व कामगारांच्या हितासाठी राजकीय लढा सुरु केला.

दिनांक 12 व 13 फेब्रु. 1938 ला मनमाड येथे रेल्वे कामगारांच्यासमोर भाषण देताना बाबासाहेब म्हणाले की, कामगारांचे दोनच दुश्मण आहेत एक ब्राम्हणवाद व दूसरा भांडवलवाद. बाबासाहेब पुढे म्हणतात, ‘ ब्राम्हणवादचा अर्थ कोणीही असा समजु नये की ब्राम्हण जातीत जन्मलेला. ब्राम्हणवादचा अर्थ माझ्यामते विषमतेला मानणारा. जो स्वातंत्र, समता, बंधुता व न्याय याचा विरोध करतो. या तत्वाचा जन्मदाता जरी ब्राम्हण असला तरी हा रोग आज आपल्या समाजातही दिसतो आहे.’ जर या दुश्मणाविरुध्द लढा द्यायचा असेल तर त्यानी आपले कामगार संघटन अर्थात ट्रेड युनियन शक्य तितक्या लवकर बनविले पाहीजे.’ बाबासाहेब अस्पृश्य कामगारामध्ये त्यांच्या अधिकाराविषयी स्वतंत्र मजुर पक्षाद्बारे जागृती करीत होते. यानंतर लगेच आलेल्या निवडणुकीत अवघ्या पाच वर्षातच या पक्षाने घवघवीत यश मिळविले व आपले 14 उमेदवार निवडुन आणले. ही स्वतंत्र मजुर पक्षांची यशस्वी घोडदौड चालु असतानाच गोलमेज परिषदेत झालेल्या घडामोडीत बाबासाहेबांना अस्पृश्याचा नेता न मानता कामगार नेता मानल्यामुळे आपल्या अस्पृश्य बांधवांच्या समस्या इंग्रज सरकारसमोर कशा मांडाव्यात हा त्यांच्यासमोर यक्ष प्रश्न उपस्थित झाला. तरीसुध्दा आपली बुध्दी व चातुर्य पणाला लावुन अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघ मिळविण्यात यश मिळविले परंतु नंतर गांधीजीच्या आमरण उपोषणामुळे मिळालेल्या अधिकारावर पाणि फेरावे लागले व राखीव जागावर समाधान मानुन तडजोड करावी लागली. भविष्यात अशाप्रकारची वेळ अस्पृश्यांच्या हिताच्या संबंधाने कार्य करताना आड येउ नये म्हणुन बाबासाहेबांनी 1942 साली आपणाला अतिप्रिय असणारा, मजुरांच्या हितासाठी लढणारा ‘ स्वतंत्र मजुर पक्ष ‘ बरखास्त करुन त्याच नोंदणी क्रमांकाने नवा ‘ शेड्युल कास्ट फेडरेशन ‘ (SCF) नावाचा पक्ष स्थापन केला. दरम्यानच्या काळात बाबासाहेबांनी महाडचा पाण्याचा सत्याग्रह व काळाराम मंदिर सत्याग्रह केले होते. त्यात आपल्या लोकांवर अमानुष हल्ले झाले होते. त्यासाठी आपणाला एक स्वरक्षणासाठी तरुणाचे संगठीत व प्रशिक्षित संगठनाची आवश्यकता भासली. त्यामुळे याच काळात *बाबासाहेबांनी 1927 साली ‘ समता सैनिक दला’ ची स्थापना केली होती परंतु त्याला सुयोग्य चाकोरीबध्द करण्यासाठी त्या संघटनेला कोणतेही संविधान किंवा घटना नसल्यामुळे त्या संघटनेला निट चालवण्यासाठी त्याचे संविधान बनविण्याचे ठरविले व 1944 रोजी या समता सैनिक दलाचे संविधान बनवुन अस्तित्वात आले ज्यात समता सैनिक दल हे त्या संविधानातील कलम नं.1(ब) नुसार आपल्या राजकीय पक्षाशी ( तेव्हाचा SCF, बरखास्ती नंतर आजचा RPI) संलग्न राहील अशी तरतूद केल्या गेली. बाबासाहेबांनी SCF च्या नावावर येणार्‍या बर्‍याच निवडणुका लढविल्या परंतु त्यांना स्वतंत्र मजुर पक्षासारखे यश मिळाले नाही. याच काळात संपुर्ण भारतात स्वातंत्र्याच्या मागणीसाठी अनेक लढे झाले होते व ब्रिटीशानी सुध्दा भारताला स्वातंत्र्य देण्याचे ठरविले मान्य केले होते परंतु भारतात स्वातंत्र्यानंतर येणारा राज्यकारभार कोण व कसा सांभाळेल हा मूख्य प्रश्न ब्रिटीशांसमोर होता. त्यासाठी भारताचे संविधान बनविण्याचे ठरले. संविधान बनविन्याची जबाबदारी इच्छा नसताना सुध्दा काँग्रेसने मजबुरीने बाबासाहेबांवर दिली व या संधीचे बाबासाहेबांने सोने केले. भारतातील असंख्य अस्पृश्य, मागासलेल्या जाती जमातीना SC, ST & OBC अशी नवी ओळख दिली. या समाजाच्या व महिलांच्या हिताचे कायदे केले व तशा तरतुदी संविधानात केल्या. स्वातंत्र्याप्राप्ती नंतरसुध्दा बाबासाहेबांनी SCF च्या नावाने संपुर्ण भारतात निवडणुका लढविल्या व बरेच यश संपादन सुध्दा केले परंतु एवढे काही करताना सुध्दा हिंदु समाजातील स्पृश्य वर्गाच्या मानसिकतेवर जराही परिणाम होताना दिसला नाही व आपल्या अस्पृश्य बांधवाना माणुसकीची वागणुक देताना दिसले नाही त्यामुळे बाबासाहेबांचे मन अतिशय कळवळत होते. मी जीवंत असताना माझ्या समाजाचे हे हाल होत असतील तर माझ्या मरणानंतर या समाजाचे कसे होईल हा विचार बाबासाहेबांना सतत चिंताग्रस्त करीत असे.

1935 साली येवला येथे बाबासाहेबांनी घोषणा केली होती की, ‘ मी हिंदु धर्मात जन्मलो याला माझा नाईलाज होता परंतु मी हिंदु म्हणुन कदापीही मरणार नाही.’ बाबासाहेबांची ही घोषणा पुर्ण करण्याची वेळ आली व त्यांनी बौध्द धम्म स्विकारण्याची घोषणा व तारीख घोषित  केली. 14 आॅक्टो. 1956 ला नागपुरला आपल्या लाखो अनुयायासह दिक्षा घेण्याचे निश्चित झाले. बाबासाहेबांचा जातीआधारीत शेड्युल कास्ट फेडरेशन (SCF) अजुनही जिवंत होता. परंतु बाबासाहेबांनी आता जातीविहीन समाजरचना निर्माण करण्याच्या दिशेने पाऊल टाकले होते व मानवतावादी बौध्द धम्माची दिक्षा घेणार होते. त्यामुळे SCF फेडरेशनचे कोणतेही पद ते अधिकृतरित्या भुषवु शकत नव्हते. त्यामुळे आता बाबासाहेबांना संपुर्ण भारतीयांसाठी सर्वसमावेशक एक राजकीय पक्ष निर्माण करण्याची निकड भासु लागली. त्यावेळी पुन्हा बाबासाहेबांना बुध्दकाळातील रिपब्लिकन संस्कृतीची आठवण झाली. व त्यांनी बुध्दाच्या रिपब्लिकन संस्कृतिला जपणारा रिपब्लिकन पक्ष स्थापन्याचे ठरविले. त्यासाठी भारतातील सर्व मानवतावादी नेत्यांना खुले पत्र लिहुन या पक्षाच्या बांधणीत हातभार लावण्याचे आवाहन केले. दिनांक 30 सप्टे.1956 ला आपल्या दिल्ली येथील निवासस्थानी त्यांच्याच अध्यक्षतेखाली SCF च्या केंद्रिय कार्यकारीणीची बैठक झाली व दिवसरात्र विचारविनिमय करुन SCF बरखास्त करण्याचा व रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (RPI) नावाचा पक्ष स्थापण्याचा ठराव पारीत झाला. SCF चीच घटना काही तुरळक बदल करुन स्विकारण्यात आली त्यातील रिपब्लिकन तत्वे मात्र फार पूर्वीच म्हणजे दि. 3 ऑक्टोबर 1951 लाच बाबासाहेबांनी लिहून प्रकाशित केली होती. हे विशेष ! बाबासाहेबांच्या धम्मदिक्षेनंतर ब्राम्हण समाज अतीशय खळवळला व अल्पावधितच बाबासाहेबांचा संशयीत मृत्यु झाला. त्यानंतर बाबासाहेबांच्या तत्कालीन अनुयायानी अगदी तुर्तास आलेली 1957 ची निवडणुक काही कार्यालयीन तांत्रिक अडचणीमुळे SCF च्याच नावाने लढविली व 3 आॅक्टो 1957 ला रितसर RPI ची घोषणा केली. RPI ने आपल्या प्रवासकाळात बरीच शिखरे गाठली. एकेकाळी हा पक्ष संसदेत दुसर्‍या नंबरचा पक्ष होता. परंतु हा पक्ष जिवंत राहिला तर एकदिवस संसदेत सत्तेवर येईल ही काँग्रेसला भिती होती. त्यामुळे काँग्रेसनी RPI च्या काही लालची, अप्रामाणिक व अस्वाभिमानी नेत्यांना हाताशी धरुन, वेगवेगळी आमिशे देउन RPI चे तुकडे केले व आजही करत आहेत. रिपब्लीकन पार्टीच्या संविधानात कामगार चळवळ चालविने हे सुध्दा आहे परंतु तत्कालिन RPI च्या नेत्यानी अपरिपक्व राजकारणाकडे जास्त लक्ष दिल्यामुळे कामगार चळवळीची पोकळी तयार होत गेली. नंतर RPI च्या संविधानानुसार कार्य न केल्यामुळे या पक्षाचे अनेक गट-तट निर्माण झाले व ही कामगार चळवळीची पोकळी तसीच राहुन गेली.

दरम्यानच्या 1970-80 च्या काळात काही उच्चपदस्थ सरकारी नोकर वर्गानी बाबासाहेबांच्या रिपब्लिकन चळवळीत, कामगार चळवळीची निर्माण झालेली पोकळी हेरली व कामगार चळवळीविषयी अपुर्ण ज्ञान मिळवुन ‘ BAMCEF ‘ नावाचे कर्मचार्‍यांचे संघटन बनविले. मी त्यांचे अपुर्ण ज्ञान यासाठी म्हणतो की बाबासाहेबांनी 12 व 13 फेब्रु. 1938 च्या मनमाडच्या भाषणात स्पष्ट सांगतात की, आमच्या लोकांनी आता कामगारांचे ट्रेड युनियन बनविले पाहिजे व ट्रेड युनियन बनवुन सरकारला नियंत्रित करायला पाहीजे व संधी मिळताच सत्तेवर ताबा मिळविला पाहीजे परंतु या ज्ञानी लोकांनी 1926 च्या ट्रेड युनियन अॅक्ट नुसार ट्रेड युनियन न बनविता BAMCEF नावाचे संघटन बनविले. व जे वाक्य बाबासाहेबांनी कधीही म्हटले नाही ते वाक्य म्हणजे ‘ मुझे पढ़े लिखे लोगोने धोखा दिया ‘ हे बाबासाहेबांचे वाक्य म्हणुन अपप्रचार केला व कर्मचारी वर्गावर दबाव आणला की जर तुम्हाला धोखेबाज व्हायचे नसेल तर आम्हाला बाबासाहेबांनी दिलेल्या निर्देशानुसार कमाईचा विसावा हिस्सा द्यावा. बाबासाहेबांवर निष्ठा ठेवणारी भोळीभाबळी कर्मचारी जनता आपले नाव धोखेबाज म्हणुन येउ नये या खातिर या संघटनेला अमाप पैसा दिला. परंतु या संघटनेनी कधीही कामगारासाठी धरणे, आंदोलन केले नाही. त्यांनी कधीही संसदेवर कींवा विधानभवनावर मोर्चे नेले नाहीत. त्यानि कधीही कामगारांच्या समस्या जाणुन घेतल्या नाही त्यामुळे त्यावर उपाययोजना करने दुरच राहीले. केवळ अधिवेशन व सम्मेलने करण्यातच धन्यता मानले याचा परिणाम असा झाला की ब्राम्हणवादी कामगार संघटना मजबुत झाल्या व बाबासाहेबांनी अति मेहनतीने झगडुन मिळविलेले न्यायिक अधिकार आम्ही गमावुन बसत आहोत. जी तत्व प्रणाली बाबासाहेबांनी सांगीतली नाही तीची ‘बहुजन’, ‘मुलनिवासी’ यासारखे नाव वापरुन तिचे बामसेफच्या ज्ञानी लोकांनी  प्रतिक्रांतित रुपांतर करीत आहेत. बाबासाहेब स्वतः म्हणतात की भारतात कोणताही वंश शुध्द नाही. आज पंजाब कींवा मद्रास मधील अस्पृश्य व ब्राम्हण समाजाच्या व्यक्तीसंबंधात कोणताही विशेष फरक दिसत नाही. त्याना हा अस्पृश्य व हा ब्राम्हण म्हणुन त्यांच्या शरीर व रंगावरुन ओळखता येत नाही. बाबासाहेबांनी भारतातील संपुर्ण समाजाच्या हितासाठी रिपब्लीकन चळवळ दिली. परंतु काही अतीहुशार व्यक्तीनी बामसेफ हीच बाबासाहेबांची खरी चळवळ आहे म्हणुन अपप्रचार केला. व लोकांना खर्‍या आंबेडकरी अर्थात रिपब्लीकन चळवळीपासुन दुर नेले. म्हणुन BAMCEF हे संगठन बाबासाहेबांच्या चळवळीला मुख्य उद्देश्यापासुन परावृत करणारे षडयंत्र होय असे म्हटल्यास अतिशोक्ति होणार नाही. हे संगठन ‘बहुजन’, ‘मुलनिवासी’ या नावाने अनेक पक्ष काढणार्‍यांना मदत करुन बाबासाहेबांनी दिलेल्या रिपब्लिकन चळवळीला बर्बाद करण्याचा चंगच बांधलाय असे दिसते. अशा संघटनेला बाबासाहेबांचे मिशन पुर्ण करणारे संघटन म्हणावे की मिशनला परावृत करणारे संघटन म्हणावे हा अनेकासमोरचा प्रश्न आहे.

अशाप्रकारचा खेळ यापुर्वीही आमच्या चळवळीसोबत खेळण्यात आला आहे. विषमतावादी लोकांनी आमच्यातीलच काही लालची लोकांना हाताशी धरुन कामगार संघटन न बनविता असोशिएन बनविण्याचा मार्ग दाखविला व भारतातील बहुसंख्य कारखाने व उद्येागक्षेत्रात, असंगठीत क्षेत्रात ट्रेड युनियन न बनवता असोशिएशन बनवुन आमच्या कामगाराला जाती आधारीत व दिशाहीन मार्ग दाखवण्याचे पातक केले व त्यांच्या न्यायिक अधिकाराच्या मोबदल्यात स्वतःचेच हित साधले.

आज काळाची गरज आहे की बाबासाहेबांनी दिलेल्या तिनि संघटनांची (SSD, BSI & RPI) संवैधानिक पुनर्बांधणी करुन समाजाला योग्य दिशा दाखविने हे प्रत्येक आंबेडकरी व्यक्तीचे ध्येय असावे. हीच खरी बाबासाहेबांनी दिलेली चळवळ आहे असे मला वाटते.

?जय भीम?
??जय रिपब्लिकन भारत??

सी पी उराडे, नागपूर
www.ssdindia.org

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.