आमची खरी चळवळ कोणती ??


—जनविचारार्थ जारी—

?? आमची खरी चळवळ कोणती ????

A post written by,
–Prashik Anand–

जय भीम मित्रांनो,
एक प्रश्न नेहमी माझ्या मनात येत असायचा तो असा कि या देशात आम्ही जी काही चळवळ राबवित असतो ती नेमकी चळवळ तरी कोणती?? कारण चळवळीचे बरेच नामकरण विविध मंडळी कडून होत आलेले आपण बघत असतो. उदा. दलित चळवळ, बहुजन चळवळ, मूलनिवासी चळवळ, रिपब्लिकन चळवळ इत्यादी. यापैकी आजकाल बहुतांश चळवळीतील मंडळी विशेषतः बहुजनवादी माणसे आपल्या विचारधारेला ‘फुले शाहू आंबेडकर विचारधारा’ संबोधत असतात तेव्हा मला हि गोष्ट विचार करायला भाग पाडते कि काय बाबासाहेबांच्या हयातीत आमच्या चळवळीला ‘फुले शाहू विचारधारेवर’ आधारित चळवळ म्हटल्या जायचे आणि मग बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यात आंबेडकर हे नाव जोडून त्याला ‘फुले शाहू आंबेडकर विचारधारा’ असा नामविस्तार करण्यात आला?? भविष्यात नव्या पिढीला कदाचित कांशीराम यांच्या मृत्यूमुळे त्यांचेही नाव जोडून ‘फुले शाहू आंबेडकर कांशीराम विचारधारा’ नावाची नवीन चळवळ विषयक विचारप्रणाली समाजात दिसू लागली तर त्यात आम्हाला नवल वाटता कामा नये, नाही का मित्रांनो??
पण तत्पूर्वी आम्ही जरा इतिहासातही डोकावून तपासायला हवे म्हणजे खऱ्या खोट्याची शहानिशा होईल..
इतिहासाची पाने चाळली तर आपल्या असे निदर्शनास येते कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र आमच्या चळवळीला ‘अस्पृश्यांची चळवळ’ (Movement of untouchables) असे संबोधले आहे आणि हि चळवळ आजकालची नसून काँग्रेसइतकीच(1885) नव्हे तर त्यापेक्षाही जास्त जुनी आहे असे ते आवर्जून सांगतात (संदर्भ Vol.18/3).
यावरून हे अगदीच स्पष्ट आहे कि कदाचित भीमा कोरेगावचा युद्धसंग्राम (इ.स.1818) म्हणजे आमच्या ‘अस्पृश्य चळवळी’ चा अविभाज्य भाग म्हणून त्यांना निश्चितपणे यातून उद्धृत करायचे असावे...आणि म्हणूनच त्यांनी अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाच्या उद्धारासाठी ‘बहिष्कृत हितकारिणी सभेपासून’ केलेली सुरुवात नंतर स्वतंत्र मजूर पक्षाच्या (ILP) टप्प्यातून तिचे रूपांतरण होऊन Scheduled Caste Federation (SCF) या राजकीय पक्षाला जन्म दिला होता..पुढे या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर, या देशाची राज्यघटना तयार करून या देशाला घटनेनुसार ‘रिपब्लिक ऑफ इंडिया’ चा दर्जा मिळवून दिल्यामुळे आणि माणसामाणसांत भेदाभेद करणाऱ्या हिंदू धर्माला कायमची लाथ मारून समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि मैत्री करुणा शिकविणाऱ्या बुद्धधम्माला दि.14 ऑक्टोबर 1956 ला कवटाळले..आणि त्याआधी दि. 30 सप्टेंबर 1956 ला दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी SCF च्या केंद्रीय कार्यकारिणी समक्ष तेव्हाची आमची ‘अस्पृश्यांची चळवळ’ अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक करून संबंध भारतीयांना एकसूत्रात बांधून त्यांना मानवमुक्तीचा लढा देण्यासाठी आणि या देशाला खरे रिपब्लिकन राष्ट्र बनविण्यासाठी बाबासाहेबांनी जगातील सर्वश्रेष्ठ अशी सात रिपब्लिकन तत्वे (Great Republican Principles) लिहून ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ ला जन्म दिला आणि चळवळीला नवे नाव दिले ती म्हणजे ‘रिपब्लिकन चळवळ’ (Movement of Republicans) होय…जी बुद्धाच्या काळात या देशात प्रस्थापित होती..ज्याचा उल्लेख बाबासाहेब प्रामुख्याने त्यांच्या ‘The Buddha and His Dhamma’ या ग्रंथात पहिल्याच प्रकरणात आवर्जूनपणे करतात आणि आम्हास कळवितात कि The Buddha was born Republic. It was Republic of Sakyas and they ruled in turns. तेव्हा आता तरी अज्ञानरूपी अंधारात खितपत पडून राहण्यापेक्षा ज्ञानरूपी प्रकाशाची किरणे बौद्धमनात डोकावू द्या आणि आमची चळवळ कोणती असे कुणी विचारल्यास तर ती फक्त आणि फक्त ‘रिपब्लिकन चळवळ’ होय असे मोठ्या गर्वाने, अभिमानाने सांगत रिपब्लिकन चळवळीचे खरे वाहक असणारे आम्हीच ते नागवंशीय आहोत हे जरा इतिहास न विसरता जगाला छाती ठोकून कळू द्या म्हणजे या रिपब्लिकन चळवळी ने आमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही.
जय भीम ?

प्रशिक आनंद
समता सैनिक दल,
HQ, दीक्षाभूमी, नागपूर.
www.ssdindia.org

(संविधानीक रिपब्लिकन पार्टी च्या पुनर्बांधणी साठी कटिबद्ध)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.