—जनविचारार्थ जारी—
? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत धम्म प्रचार-प्रसाराची नवी यंत्रणा कोणती ? ?
A Post written by,
–Prashik Anand–
जय भीम मित्रांनो,
खरे तर हा विषय धर्मांतरित बौद्धांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आणि जिव्हाळ्याचाच म्हणावा लागेल. जरी आम्ही मुळात इतिहासकाळात बौद्धच होतो तरीही वर्षानुवर्षांच्या मनुवादी गुलामगिरीच्या दडपणाखाली, हिंदू धर्माच्या रोगट जातीयुक्त मानसिकतेतून आमचे मानसिक स्थित्यंतर घडवून आणून बाबासाहेबांनी दि. १४ ऑक्टोंबर १९५६ ला, नागपूरला आम्हास बौद्धधम्माची दीक्षा देऊन जातीच्या महारोगातून मुक्त केले आणि समता, स्वातंत्र्य, बंधुत्वावर आधारित नवी मानवी मुल्ये दिलीत. तेव्हा कित्येक वर्षानंतर बुद्धधम्माची पाळेमुळे या देशात नव्याने अंकुरित झालीत. या समाजाचा एक नवा जन्म (परिवर्तन) झाला आणि या नव्या जन्मासोबत आमच्या खांद्यावर आता नव्या जबाबदाऱ्याही टाकल्या गेल्या आहेत हे आम्ही विसरता कामा नये. या जबाबदाऱ्या कोणत्या बरे असाव्यात असा सर्वसाधारण प्रश्न कोणत्याही धर्मांतरित बौद्ध व्यक्तीस पडणे स्वाभाविकच आहे. बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दीक्षा देऊन बौद्ध हि स्वाभिमानाची जागतिक ओळख दिली आणि सोबतच बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसाराची जबाबदारीही दिलेली आहे. ह्या जबाबदारी विषयक बोलतांना ते म्हणतात, “ बौद्ध धर्मप्रसार साऱ्या विश्वात करून घ्यावयाचा असेल तर पुढील तीन गोष्टींचा गंभीरतेने विचार होणे गरजेचे आहे. पहिली गोष्ट ही कि बौद्ध धर्माचा बायबल सदृश प्रमाणभूत असा ग्रंथ तयार करणे, दुसरी गोष्ट बौद्ध भिक्खू संघाच्या संघटनेत ध्येयधोरणात व कार्यप्रणालीत अमुलाग्र बदल घडवून आणणे आणि तिसरी गोष्ट हि कि आंतरराष्ट्रीय बौद्धसेवा संघ स्थापन करणे.” यावरून हे स्पष्ट होते कि बाबासाहेबांनी आम्हास ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ (The Buddha and His Dhamma) हा बायबल सदृश बौद्धांचा प्रमाणभूत ग्रंथ का बरे दिला असावा. याबरोबरच त्यांनी धम्म प्रचाराची धुरा आता बौद्ध भिक्खूसंघाच्या संघटनेवर अवलंबून न ठेवता त्यात आमुलाग्र बदल करून आम्हा उपासकांच्या खांद्यावर नवीन यंत्रणा निर्माण करून उपासकांच्या संघटनेवर (TBSI) सोपविलेली आहे. असे करण्यामागे त्यांचा फार मोठा दृष्टीकोन होता. कारण बुद्ध काळापासून ते आजवर बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराची जबाबदारी हि भिक्खू संघावरच असायची त्यामुळे धम्माचे भवितव्य हे भिक्खू संघावरच अवलंबून राहत आलेले आहे याविषयी बाबासाहेबांचे निर्वाणीचा इशारा देणारे अतिशय परखड विचार आपण लक्षात घेतलेच पाहिजे. ते म्हणतात, “यदाकदाचित बौद्ध धर्मावर संकट उद्भवण्याचा प्रसंग आलाच, तर बौद्ध राष्ट्रातील भिक्खुनांच जबाबदार धरावे लागेल कारण मला तरी व्यक्तिश: असे वाटते कि ज्या भिक्खूंनी तनमनधनाने आपली कर्तव्ये बाजावयास पाहिजे, ती त्यांनी पाळली नाहीत असाच त्याचा अर्थ असेल. आज कोठे धर्मप्रचार होत आहे? बौद्ध धम्म प्रचाराची आज काय स्थिती आहे? भिक्खुचे खरे कर्तव्य धम्मप्रसार करणे असे आहे. तो भिक्खू आज काय करतो? आजचा भिक्खू खाऊन पिऊन विहारात स्वस्थ राहतो. तो केवळ एकच वेळ जेवण घेतो यांत शंका नाही. परंतु बहुतांशी त्याचा वेळ निव्वळ आळसातच जातो. थोडेफार तो वाचन करतो. परंतु बहुधा तो झोपाच काढतो. संध्याकाळी स्व:ताचे मन संगीतात थोडे रिझवितो. हा मार्ग धम्मप्रसार करण्याचा खचितच नव्हे.” (संदर्भ Vol १८/३). यावरून बाबासाहेबांच्या सम्यक दृष्टीतून तेव्हाचा हेरलेला भिक्खू आणि आजचा भिक्खु कसा आहे याची तपासणी कोणत्याही उपासकाला करता येणे शक्य आहे. बुद्धाने भिक्खू संघ का स्थापन केला याचे मार्मिक विवेचन करतांना बाबासाहेब सांगतात, “बौद्ध धर्मात सांगितलेल्या आदर्श तत्वप्रणालीप्रमाणे समाज व्यवस्था निर्माण करणे, समाजातील प्रत्येक घटकाला नीतीतत्वांनी वागण्यास प्रवृत्त करणे व प्रापंचिक (संसारिक गृहस्थ) लोकांपुढे स्व:ताच्या आदर्श वागणुकीचा नमुना ठेवणे हे प्रमुख हेतू आदर्श भिक्खू निर्माण करण्यामागे होते. सर्वसामान्य माणसाला बौद्ध तत्वज्ञान आकलन होणारे नाही; याची कल्पना बुद्धाला होती. तथापि ते त्यांनी थोडेफार समजावून घ्यावे व त्यासाठी त्यांच्या नजरेसमोर बौद्ध विचारप्रणालीशी बद्ध असलेला सुसंघटीत बौद्ध भिक्खुंचा आदर्श संच असावा, हे भिक्खू संघाच्या निर्मितीचे कारण होय”… पुढे ते सांगतात, “भिक्खू संघाने निरपेक्षपणे जनसेवा करावी हा प्रमुख उद्देश लक्षात घेऊन भिक्खुने स्व:ताची मालमत्ता बाळगू नये असा बुद्धाने नियम केला होता. मालमत्तेची धारकवृत्ती मनुष्याच्या स्वतंत्र विचार प्रेरणेला आणि विचार प्रवृत्तीला बाधा आणत असते व मोठ्यात मोठा अडथळा निर्माण करीत असते. मालमत्तेची धारकवृत्ती जशी घातक असते तसेच भिक्खुने विवाह करून निरपेक्ष जनसेवा करणे कदापीही शक्य नसते. यास्तव सामाजिक बंधनात गुरफटून न राहता जनसेवेस तनमनधनाने मुक्त राहण्यासाठी भिक्खुने विवाह करू नये असा निर्बंध बुद्धाने घातला होता. या सर्व आदर्शाप्रमाणे आजचा भिक्खुसंघ राहतो काय ?? या प्रश्नांचे स्पष्ट उत्तर नकारार्थी आहे. भिक्खूसंघ लोकांना मार्गदर्शन तर करीत नाहीत, परंतु जनसेवाही करीत नाही. सद्यपरिस्थितीतील भिक्खुसंघ बौद्ध धर्म प्रसारासाठी निरुपयोगी आहे. आज जगभर भिक्खूंची संख्या अफाट आहे. त्यात केवळ साधू आणि संन्याशी वृत्तीनेच राहणाऱ्या भिक्खुंचा भरणा जास्त आहे. ते सगळे आपला वेळ नुसत्या ध्यानात किंवा आळसात घालवितात. लोकांना ज्ञान द्यावे किंवा त्यांची सेवा करावी हि वृत्तीच भिक्खुंत राहिलेली नाही.” असे रोखठोक विचार मांडतांना शेवटी बाबासाहेब म्हणतात कि, “ आज भिक्खू संघ नुसत्या आळशी लोकांचे एक मोठे सैन्यच झाले आहे. आज भिक्खू थोडे असले तरी चालतील, परंतु ते सुशिक्षित आणि कार्यप्रवण पाहिजेत. ते ऐतखाऊ आणि ऐदी नसावेत. ह्या बाबतीत भिक्खुसंघाने जेसुईस्ट ख्रिस्ती पाद्र्यांपासून प्रेरणा घेण्यास कसलीच हरकत नसावी.” (संदर्भ Vol.२०) तेव्हा अस्तित्वातील सुज्ञ भिक्खुसंघाने बाबासाहेबांच्या या सूचनेकडे लक्ष पुरविलयास समाजहिताच्या दृष्टीने योग्य होईल, नाही का मित्रांनो??
तसे पाहता तथागत बुद्धाने बौद्ध धम्मात उपासकांसाठी धम्मदीक्षा विधीची सोय केलेली नव्हती तर केवळ ज्यांना भिक्खुसंघात प्रवेश घेऊन भिक्खू चे जीवनयापन करून समाजाची सेवा करावीशी वाटते केवळ त्यांच्यासाठीच उपसंपदा हा विधी ठेवलेला होता. म्हणजे त्या काळी कोणत्याही साधारण गृहस्थ व्यक्तीस बौद्ध होण्यासाठी केवळ धम्मश्रवण करून, समजून घेऊन त्यास आचरणात आणून बौद्ध होता येत असे एवढेच ! परंतु काळाच्या ओघात मनुवादी गुलामगिरीचे जोखड आमच्या मानगुटीवर बसविण्यात आले होते आणि त्यातून आता आमची मुक्तता झाल्याची भावनिकता आमच्या मनामनात रुजणे आणि काळाची तशी नवी गरज लक्षात घेऊन बाबासाहेबांनी त्यांच्या म्हणण्यानुसार तथागतांनी त्यांच्या धम्मात जी छिद्रे ठेवलीत ती बुजविण्याचे महत्कार्य, बुद्धधम्मात उपासकांसाठी उपासकांकडून धम्मदीक्षा विधीचे प्रयोजन करून पूर्ण केले. ह्याची कल्पना आम्हाला बाबासाहेबांच्या या विधानावरून येते. ते म्हणतात, “भगवान बुद्धाच्या संघटनेत काही त्रुटी राहिल्या. काही छिद्रे राहिली होती. म्हणून त्या छिद्रांद्वारे बाहेरील पाणी आत येऊन बुद्ध धर्माचा प्रवाह थोडा दूषित झाला होता. परंतु आता मी त्या धम्माची डागडुजी करून ती छिद्रे बुजविणार आहे.” (संदर्भ Vol. १८/३). इतकेच नव्हे तर पुढील धम्म प्रचार प्रसाराची रूपरेषा हि त्यांनी आम्हाला आखून दिलेली आहे. आम्हाला आमच्या जबाबदारीची जाणीव करून देतांना बाबासाहेब म्हणतात, “मात्र तुमचीही जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल, मानसन्मान वाटेल, अशी तुम्ही कृती केली पाहिजे. हा धर्म म्हणजे आपण एक गळ्यात मढे अडकवून घेत आहोत असे मानू नका. बौध्द धर्माच्या दृष्टिने भारताची भूमी सध्या शून्यवत आहे म्हणून आपण उत्तम रीतीने धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण आपल्याबरोबर देशाचा, इतकेच नव्हे, तर जगाचाही उध्दार करु. कारण बौध्द धर्मानेच जगाचा उध्दार होणार आहे. जगात जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत शांतता राहणार नाही…हा धर्म कसा आहे? तर “बहुजन हिताय, बहुजन सुखाय, लोकानुकंपाय, धम्म आदी कल्याण, मध्य कल्याण, पर्यासान कल्याण”. त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे तथागताने आपल्या धर्माच्या प्रचाराचा मार्ग तयार केला. आता आपल्यालाही एक नवीन यंत्रणा तयार करावी लागेल म्हणून समारंभानंतर दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी. दरेक बौद्ध माणसाला दीक्षा देण्याचा अधिकार आहे असे मी जाहीर करतो.” (संदर्भ खंड १८/३) या वरील तथागतांच्या विधानांतील बहुजन म्हणजे SC/ST/OBC असा जातींचा झुंड नव्हे तर जगातील बहुसंख्य व्यक्तींच्या समूहाला हितार्थ असणारा, त्यांच्या कल्याणार्थ उद्देशून केलेला तो धम्मोपदेश आहे हे विशेषकरून आंबेडकरी बौद्ध समाजबांधवांनी लक्षात घ्यावे. बाबासाहेबांनी भारतात धम्म प्रचार-प्रसारार्थ ज्या नवीन यंत्रणेविषयी आपणास सांगितले आहे ती नवीन यंत्रणा कोणती? तिची कार्यपद्धती कशी असेल? तथागताने आपल्या धर्माच्या प्रचाराचा मार्ग भिक्खुसंघ स्थापन करून तयार केला होता तेव्हा आता आधुनिक काळात बाबासाहेबांना कोणता नवा मार्ग अभिप्रेत आहे? ‘दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी.’ याचा अर्थ कोणीही बौद्ध मनुष्य कोणालाही दीक्षा देऊ शकतो काय?? असे अनेक प्रश्न आता आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांनी सांगितलेली नवीन यंत्रणा म्हणजे, The Buddhist Society of India (TBSI) हि ती संस्था (संघटना) होय..दुसरे असे कि त्यांच्या ‘दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी.’ या विधानाचा अनर्थ लावल्या गेल्याचे लक्षात येताच बाबासाहेबांनी आदेशपर जाहीर निवेदन ‘प्रबुद्ध भारत’ या आपल्या तेव्हाच्या चळवळीच्या मुखपत्रातून, शनिवार दि. 17 नोव्हेंबर 1956 च्या अंकात केलेले वाचावयास मिळते ते खालीलप्रमाणे,
“धर्मांतराच्या बाबतीत मुंबई व नागपूर या दोन्ही ठिकाणी मोठा गोंधळ माजलेला ऐकिवात येतो आहे. वाटेल तो माणूस वाटेल त्याला धर्म दीक्षा देतो हा अर्थाचा अनर्थ आहे. याला पायबंद घालणे आवश्यक आहे. माझ्या नागपूर येथील भाषणाचा तो अनर्थ आहे. माझ्या बोलण्याचा हा उद्देश नव्हता. मी फक्त दीक्षेकरिता बौद्ध भिक्खूची आवश्यकता नाही, एव्हढेच सांगितले. कोणत्याही माणसाला दीक्षा फक्त अधिकृत पुरुषांनी द्यावी. तसे अधिकृत पुरुष मी नेमले नाहीत, तोपर्यंत माझ्याशिवाय कोणीही धर्मदीक्षा देण्यास पात्र नाही. अनधिकृत पुरुषाने दिलेली दीक्षा अमान्य आहे व जो अशी दीक्षा स्वीकारेल त्याला बौद्ध म्हणून गणले जाणार नाही.” म्हणजे याचा अर्थ बाबासाहेबांना त्यांनी स्थापित केलेल्या संस्थेमार्फतच (TBSI) अधिकृत उपासकांची नेमणूक करून त्यांच्यामार्फतच धम्मदीक्षा घेतली पाहिजे अन्यथा ती अनधिकृत मानल्या जाईल आणि अशा अनधिकृत दीक्षा घेतलेल्या व्यक्तीस बौद्ध म्हणून गणले जाणार नाही असे स्पष्ट संकेत मिळतात. तरीही सर्रासपणे काही बौद्ध भिक्खू उपासकांना अशी अनधिकृत दीक्षा देतांना आजही आपल्या दृष्टीस पडतात जे बाबासाहेबांना मुळातच अभिप्रेत नव्हते. तेव्हा या महत्वाच्या बाबीकडे भारतात बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसारार्थ समाजाने लक्ष पुरविणे अगत्याचे आहे. जगातील दुःखाच्या निवारणार्थ उपासकांनी हे अतिशय महत्वाचे कार्य आता आपल्या शिरावर घेतलेच पाहिजे.
धम्माचा सार म्हणजे दु:खमुक्तीचा मार्ग होय. खरे तर तथागत बुद्धाने जगातील दु:खमुक्तीचा जो मार्ग सांगितलेला आहे तो साध्या सोप्या पद्धतीने जनमानसाला समजेल, त्याला रुचेल, त्याचा स्वीकार करता येईल अशा स्वरूपात त्याची मांडणी करणे गरजेचे आहे जे खरे तर पंचशिल, आर्य अष्टांगिक मार्ग आणि दहा पारमिता यातच सामावलेले आहे म्हणून बाबासाहेब म्हणतात, “ पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग आणि दहा पारमिता दु:ख निरोध करून दु:खाचा नाश करण्यास समर्थ आहेत. जगातील दु:ख निवारण व्हावे हेच बौद्ध धर्माचे सार.” (संदर्भ Vol.१८/३) परंतु आम्हाला बौद्ध धम्माकडे चमत्कारिक दृष्टीने, विशेष आकर्षणापोटी पाहणाऱ्यांची संख्या उतरोत्तर वाढतांनाच दिसते आहे. याला बरीचशी पुस्तकी पंडित अभ्यासू मंडळी तत्वज्ञानाचा गहन अभ्यास म्हणतील तर त्यात आम्हाला नवल वाटता कामा नये. याविषयी बाबासाहेबांचे पुढील विधान फारच मार्मिक आहे. ते म्हणतात, “आम्ही भारतीय आपल्या तत्वज्ञानाचे भारीच अभिमानी. परंतु गेल्या हजार वर्षात एकही तत्वज्ञ अथवा तत्वचिंतक निर्माण झाला नाही. तात्विक विचार करून एखादा सिद्धांत मांडण्यासाठी जी मनोभूमिका विद्वानांची असावयाला हवी होती ती न राहिल्याने विद्वान विचारविनिमयाला आणि देवाणघेवाणाला पारखे झाले. त्यामुळे विद्वानांची बुद्धी कप्याकप्यात बंदिस्त होऊन कुंठीत झाली. त्यामुळे सत्यशोधन आणि सत्यग्रहण करण्याचे कार्य मागे पडून पंडितांऐवजी पुस्तकी पंडितांचा वर्ग निर्माण झाला.” (संदर्भ Vol.१८/३) किती स्पष्ट्वादी भूमिका आहे बाबासाहेबांची तत्वज्ञानाला घेऊन ! तितकीच रोखठोक हि !!
धम्म प्रचार-प्रसार करतांना निर्माण होणारी आणखी एक अडचण अशी कि समाजात काही माणसे किंबहुना पुस्तकी पंडितांचा वर्ग बुद्धाच्या मुख्य सामाजिक शिकवणुकीला हेतुपुरस्पर डावलून व्यावहारिक जीवनाशी ज्याचा काहीएक सबंध नाही अशा बाबींकडे धम्माच्या नावावर समाजाचे लक्ष केंद्रित करून दिशाभूल करू शकतात. म्हणजेच यावरून बुद्ध धम्माविषयी जगात दोन प्रकारची माणसे आढळतात असे अगदीच स्पष्ट होते. तेव्हा या प्रकारची काही माणसे नुसते अभ्यासाच्या वा संशोधनात्मक दृष्टीनेच धम्माकडे बघत ध्यानसाधना, समाधी, विपश्यना इत्यादीवर लेखन करत, त्याचा गाजावाजा करण्यात, त्या मार्गाचा अवलंब करण्यात गुरफटलेली असतात जणूकाही त्यांना बुद्धाच्या सामाजिक संदेशाशी फारसे काही घेणेदेणे नसावे. अशा लोकांना उद्देशून म्हटलेली बाबासाहेबांची खालील विधाने कोणत्याही सुज्ञ उपासकाने लक्षात घेण्याजोगी आहे. ती खालील प्रमाणे नमूद केली आहेत..
बाबासाहेब म्हणतात की, ” या आधुनिक लेखकांनी बुद्धाच्या मुख्य शिकवणुकीला पार गाडून टाकले आहे.” (संदर्भ The Buddha and His Dhamma) आणि दुसऱ्या प्रकारची माणसे म्हणजे ती आहेत ज्यांना बुद्धाच्या सामाजिक संदेशांना समाजात रुजवावेसे वाटते. बाबासाहेब हे या दुसऱ्या प्रकारातील व्यक्तिमत्व आहेत असे ते स्वतःच स्वताविषयी सांगतांत आणि त्यांनी स्वत: निवडलेला नेमका मार्ग कोणता आहे, ते आपल्या समाजबांधवांच्या लक्षात आणून देतात. या त्यांच्या विधानाच्या पुष्टीसाठी खाली त्यांच्या भाषणातील उतारा देत आहे तो वाचकांनी काटेकोरपणे लक्षात घ्यावा..तो येणेप्रमाणे..
” बौद्ध धर्मामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. या धर्माचे संशोधन करण्याचा माझा मार्ग नाही. आपले मुख्य कार्य प्रचार करण्याचे, आम्हाला लोकांना बुद्धिस्ट करून घ्यावयाचे आहे. हेच आमचे कर्तव्य होय.” पुढे ते आम्हाला धम्माच्या प्रचार प्रसारार्थ जी नवीन यंत्रणा देण्याविषयी सांगणार असतात त्याविषयी आम्हाला आधीच पुर्वसुचना देतांना म्हणतात, “ दोन-चार दिवसांपूर्वी आम्ही एक संस्था स्थापून रजिस्टर केली आहे. या संस्थेचे सभासद व्हावे, अशी विनंती आहे. वरच्या वर्गाचे लोक पैसे देतील अशी अपेक्षा नाही. कार्याला सुरुवात तर झाली पाहिजे. तरी सर्वांनी समितीचा मेंबर व्हायला पाहिजे.” (संदर्भ Vol.१८/३). आता यावरून आपल्या हे पक्के लक्षात आले असावे कि समाजातील प्रत्येक स्त्री-पुरुषाने रीतसर कायदेशीररित्या ह्या (TBSI) संस्थेचे सदस्यत्व स्वीकारून आपापली जबाबदारी पार पाडायला हवी अन्यथा अयोग्य लोकांच्या हाती तिची सूत्रे जाऊन, मनमर्जी तसा कारभार करून धम्मविघातक बाबी घडून मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाबासाहेबांना अभिप्रेत धम्म प्रचार-प्रसार यंत्रणा हि काही भिक्खुंच्या खांद्यावर सोपविलेली यंत्रणा नव्हे हे आम्ही चांगले लक्षात घेतले पाहिजे. तर ती उपासकांवर सोपविलेली जबाबदारी होय आणि या उपासकांनी ख्रिश्चन मिशनरीज ज्याप्रमाणे त्यांच्या धर्म प्रचाराचे कार्य करीत असतात अगदी त्याप्रमाणेच बुद्ध धम्माचा प्रचार-प्रसार करण्याचे कार्य हाती घ्यावयास हवे असेही बाबासाहेब आम्हास सुचवितात..ते म्हणतात, ” खिश्चनांनी बौद्ध तत्वज्ञानाची नक्कल केली यात मुळीच वाद नाही. परंतु बौद्ध धम्म प्रसारासाठी खिश्चनांनी स्वीकारलेल्या मार्गाची बौद्धांनी नक्कल करण्यास कसलीच हरकत नसावी. जरी ते मार्ग बहकले तरी बुद्धाचा धम्म त्यांच्या मार्गदर्शनासाठी एखाद्या पोलिसासारखा सदैव उभा आहे. लोकांच्या मनावर हि गोष्ट बिंबविल्याशिवाय बौद्ध धर्माचा ऱ्हास थांबविता येणार नाही. “ (संदर्भ. Vol १८/३). तेव्हा आता मित्रांनो बुद्ध धम्माचे या देशात उज्ज्वल भविष्य आपणास बघावयाचे असेल तर आपण संघटीतरित्या बाबासाहेबांनी सुचविलेल्या मार्गाची कास धरायला हवी. त्यांनी धम्माच्या प्रचार-प्रसारार्थ जन्मास घालून दिलेल्या ‘दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेचे आपण कार्यशील सदस्य झालो पाहिजे आणि जोमाने या कामाला लागलो पाहिजे. यासाठी रीतसर एक आराखडाही बाबासाहेबांनी ‘The Buddhist movement in India : A Blueprint’ या नावाने संदर्भ खंड १७/३ मध्ये वाचावयास मिळतो. त्याचाही आपण बारकाईने अभ्यास करायला हवा.
सर्वात शेवटी एक मात्र अतिमहत्वाचे सांगावेसे वाटते ते असे कि हे धार्मिक कार्य करीत असतांना बरीचशी अतिविद्वान मंडळी आपणास मोफत सल्ला देतील कि आम्ही धर्मकारण करीत असतांना राजकारणाकडे पाठ फिरविली पाहिजे, राजकारणाकडे मुळीच लक्ष देता कामा नये, धर्मकारण आणि राजकारण यांची भेसळ करू नका इत्यादी इत्यादी..तेव्हा या विद्वान मंडळींना आपण बाबासाहेबांचे खालील विधान वारंवार कथन करावे ज्यात ते बजावून सांगतात, “ मी बौद्ध धर्मात गेल्याने काही लोक म्हणतील, पॉलिटिक्स मधला किडा गेला ! पण हा पॉलिटिक्स मधला किडा जाणार नाही. राहणार आहे. या लोकांना घेऊन राहणार आहे.” (संदर्भ. Vol.१८/३) एवढेच नव्हे तर ते त्यांच्या पुढील उतरोत्तर भाषणातही याचा पुनर्रउल्लेख करतांना आढळतात आणि अभिमानाने आवर्जून सांगतात कि, “ बौद्ध झाल्यावर राजकारण मात्र सोडणार नाही. फक्त शेड्युल्ड कास्टस फेडरेशनच्या (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या आमच्या नव्या पक्षाला जन्मास घालण्यापूर्वीचा आमचा राजकीय पक्ष) तिकिटावर उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार नाही. मी आपल्या स्वतःच्या हिमंतीवर निवडणूक लढवीन. मग माझा विजय होवो अथवा पराभव होवो. त्याची मला किंचितही पर्वा नाही.” (संदर्भ. Vol.१८/३) मित्रांनो या सर्व विवेचनावरून आपण बाबासाहेबांनी जन्मास घातलेल्या तिन्ही संघटना ( SSD, RPI, & TBSI) त्यांच्या त्यांच्या संविधानानुसार अंमलबजावणी करून, त्यांना सशक्त करून बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या बुद्धाच्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय नीतीतत्वांची म्हणजेच समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय यांची या देशातच नव्हे तर जगाच्या पाठीवर रुजवणूक करून जगाची पुनर्रचना करण्याचे फार मोठे जबाबदारीचे काम पार पाडण्यासाठी, आपण सर्व समाजबांधवांनी कंबर कसून पुढाकार घ्यावा. हेच बाबासाहेबांना यातून अपेक्षित होते, अभिप्रेत होते. तेव्हा आता आपण स्वतःच ठरवावे कि काय आम्ही बाबासाहेबांची लेकरे म्हणविणारे अनुयायी यासाठी पुढाकार घेणार आहोत कि नाही??
प्रशिक आनंद
समता सैनिक दल,
HQ, दीक्षाभूमी, नागपूर.
www.ssdindia.org