धम्मचक्र प्रवर्तन दिन १४ ऑक्टोबर कि अशोका विजया दशमी ??


–जनविचारार्थ जारी—

A post written by,
— Prashik Anand —

? धम्मचक्र प्रवर्तन दिन १४ ऑक्टोबर कि अशोका विजया दशमी???

जय भीम मित्रांनो,
आंबेडकरी बौद्ध समाजात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत नागपूर या नागलोकांच्या भूमीत केलेल्या धर्मांतराच्या आणि त्या अनुषंगाने परत एकदा या देशात घडवून आणलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाविषयी बराचसा संभ्रम उडालेला दिसतो आहे. काहींच्या मते बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेण्यासाठी निवडलेला दिवस हा अशोकाविजया दशमी हा असून सम्राट अशोकाच्या स्मृतींना उजाळा देणारा तो दिन आहे म्हणून त्यांनी तो निवडला असा युक्तिवाद केल्या जातो तर काहींच्या मते तो दिन दरवर्षी येणारा १४ ऑक्टोबर हाच होय. याविषयी निश्चितच अभ्यास करून त्यावर चिंतन मनन आणि संशोधन करून आंबेडकरी बौद्ध जनतेने जगापुढे आधुनिक काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धम्मक्रांतीचा दिवस म्हणून कोणता दिन आपण साजरा केला पाहिजे हे जाणून घेणे अतिशय महत्वाचे आहे. तेव्हा पहिला मुद्दा जो बहुसंख्य विद्वान मंडळी सम्राट अशोकाला केंद्रित करून आपल्यापुढे मांडत असतात तो आधी विचारात घेऊ या ज्या विषयी काही प्रश्न मनात निर्माण होतात ते असे..
सम्राट अशोकाने कोणत्या दिवशी बौद्ध धम्मास अंगिकारले होते? त्याची निश्चित तिथी (त्यावेळेस आज अस्तित्वात असलेला कॅलेंडर अस्तित्वात नव्हता) कोणती?
बाबासाहेबांनी ‘सम्राट अशोकाच्या विजयादशमीलाच मी धर्मांतर करणार आहे’ असे कुठे म्हटलेले वा लिहिलेले आढळते का?
या बाबींचा सखोल अभ्यास केल्यावर आपणास असे आढळून येईल कि एक तर सम्राट अशोकाने ज्या दिवशी बौद्ध धम्माचा अंगीकार केला त्याची नेमकी तारीख स्पष्ट होऊ शकत नाही..कारण तेव्हा चंद्रकलेवर आधारित तिथीचे निर्धारण होत असे. दुसरे असे कि जेव्हा आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य वाचतो तेव्हा सम्राट अशोकाविषयी बाबासाहेबांनी आपली भूमिका अगदीच स्पष्टपणे रोखठोक शब्दांत मांडलेली आहे असे आपल्या लक्षात आल्याखेरीज राहणार नाही. दि. ६ जुन १९५० ला वाय.एन.बी.ए. कोलोंबो, श्रीलंका द्वारा आयोजित विश्व भ्रातृत्व संमेलनात बाबासाहेबांनी कोलंबो च्या भाषणात सम्राट अशोकाविषयी आधी स्तुतीपर भाष्य करतांना म्हटले की,*” भगवान बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर इ.पू.274 पर्यंत बौद्धधर्माची स्थिती कशी होती हे जाणून घेण्याची पर्याप्त साधने उपलब्ध नाहीत. तथापि अशोकाच्या काळात बौद्ध धर्माचा प्रसार विजेच्या गतीने झाला. अशोक आणि चंद्रगुप्तासारखे बलाढ्य सम्राट बौद्ध काळातच झाले आहेत व त्यांनीच भारताबाहेरील राज्यांशी मैत्रीचे संबंध स्थापित केले होते.”*
बौध्दकालीन भारताच्या इतिहासाविषयी, साहित्याविषयी, धम्माविषयी सखोल अभ्यासू इतिहासकार, प्रचंड कोटीचे विद्वान असलेल्या बाबासाहेबांच्या दृष्टीने अवलोकन केलेल्या बाबींविषयी सांगायचे झाल्यास भारतातुन बौध्द धर्म नष्ट होण्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सम्राट अशोकालाही जबाबदार ठरविले आहे. हे त्यांच्या त्याच भाषणातील नंतरच्या विधानामधून तपासता येते. बौद्धधम्म भारतातून लोप होण्यास सम्राट अशोक कसा कारणीभूत ठरला आहे हे सांगताना बाबासाहेब म्हणतात “प्रश्न असा निर्माण होतो कि, जो धर्म इतका श्रेष्ठ होता व ज्याचा प्रसार इतका झाला होता, त्याचा भारतातुन लोप कसा झाला? या प्रश्नाचे उत्तर अनेक असले तरी त्याबद्दल मी सम्राट अशोकाला जबाबदार धरतो. अशोक वाजवीपेक्षा जास्त सहनशील होता. यामुळे मी त्याला दोष देत आहे. सम्राट अशोकाने आपल्या कारकिर्दित बौध्द धर्माशिवाय अशा अनेक धर्मांना प्रचाराची मुभा देवून ठेवली होती कि जे बौध्द धर्माचे कट्टर दुश्मन होते. त्यामुळे बौध्द धर्माच्या विरुध्द असणा-या अधर्मांना आपली शक्ती वाढवण्याची पूरेपूर शक्ती प्राप्त झाली. व हाच बौध्द धर्माला पहीला आघात होय, असे मला वाटते.” (संदर्भ Vol.18/3)

या त्यांच्या वरील विधानातील ” अशोक वाजवीपेक्षा जास्त सहनशील होता. त्यामुळे मी त्याला दोष देत आहे. सम्राट अशोकाने आपल्या कारकिर्दीत बौद्ध धर्मांशिवाय अशा अनेक धर्मांना प्रचाराची मुभा देऊन ठेवली होती की जे बौद्ध धर्माचे कट्टर दुश्मन होते. त्यामुळे बौद्ध धर्माच्या विरुद्ध असणाऱ्या अधर्मांना आपली शक्ती वाढविण्याची पुरेपूर संधी प्राप्त झाली व हाच बौद्ध धर्माला पहिला आघात होय. असे मला वाटते.” यावरून बाबासाहेबांची त्याच्याविषयी असलेली उदासीनतेची भूमिका अगदीच स्पष्ट होते.
बाबासाहेबांची भूमिका कधीच वाजवीपेक्षा जास्त सहिष्णू (जसा सम्राट अशोक होता) असण्याची नव्हती हे त्यांच्या एका भाषणातील खालील विधानावरून स्पष्ट होईल…
“कुंभ मेळ्यात नागव्या साधूंच्या पायाखाली हजारो नागरिक तुडवून मेले. हि घटना काय दर्शविते? मी मंत्री असतो आणि अधिकार माझ्या स्वाधीन असते तर मी या साधूंना सेना पाठवून हाकून लावले असते. अवश्य असते तर गोळीबारही केला असता.” (संदर्भ vol 18/3)
वरील विधानात बाबासाहेब अवश्य असते तर नागव्या साधूंवर गोळीबार ही केला असता म्हणतात..कारण सहिष्णूतेला मर्यादा असाव्या लागतात. किती प्रचंड कोटीचे कणखर महामानव होते ना बाबासाहेब..!!
म्हणजे बाबासाहेबांनी अहिंसेच्या तत्वाला पुरेपूर जाणले होते आणि मनुष्याने कितपत सहिष्णू (सहनशील) असावे आणि कुठे सहिष्णुता संपायला हवी ह्याचे बुद्धधम्मानुसार पुरेपूर आकलन केले होते. जे कदाचित सम्राट अशोकाच्या बाबतीत बाबासाहेबांना दिसले नाही..कारण सम्राट अशोकाने बौद्ध धम्माच्या विरुद्ध असणाऱ्या कट्टर अधम्म दुश्मनांना (कोणताही धर्म जरी तो अधर्म असला तरीही वाढविण्याचे स्वातंत्र्य) त्यांची पुरेपूर शक्ती वाढविण्याची मुभा दिली होती त्यामुळे पुढे बुद्ध धम्माचा भारतातुन ऱ्हास होण्याला ते एक कारण ठरले असे बाबासाहेब सांगतात. ज्या श्रीलंकेत सम्राट अशोकाने अनेक महान बौध्द भिक्षु आणि स्वताचा मुलगा आणि मुलगी धर्म प्रचारार्थ पाठविले होते त्या भुमीत हे वरील विचार बाबासाहेबानी व्यक्त केले आहेत..म्हणजे सरळसरळ याद्वारे सम्राट अशोकाला बाबासाहेबानी जबाबदारच धरले आहे, नाही का?
बाबासाहेबांनी दि.13 ऑक्टोम्बर 1935 ला येवला येथे धर्मांतराची घोषणा केली होती आणि नंतर तब्बल 21 वर्षांनी दि. 14 ऑक्टोम्बर 1956 ला नागपूर येथे धम्म दीक्षा घेतली. अनेक लोक असे म्हणतात कि बाबासाहेबांनी 14 ऑक्टोम्बर हा दिवस सम्राट अशोकाशी संबधित होता म्हणुन निवडला. त्यासाठी पुरावा म्हणुन त्या प्रसंगी जे काही Pamphlets, जाहिरात पत्रके काढण्यात आली होती ती पुढे करण्यात येतात..खरे तर त्यात वेगवेगळा मजकूर आढळतो..काहींत धम्म चक्र प्रवर्तन दिन, काहींत दसरा, काहींत अशोका विजयादशमी…म्हणजे त्यातही एकवाक्यता नाही..हे विशेष !!
दि.१४ आक्टोबर या दिवशी अशोका विजयादशमी होती असे जर आपण गृहीत धरले तर पुन्हा एक कोडे उपस्थित होते. ते म्हणजे दि. १५ आक्टोबरला जेव्हा बाबासाहेबांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली तेव्हा सुरुवातीलाच ते म्हणाले की “कालचा दिवस आज आणि आजचा दिवस काल आला असता तर बरे झाले असते”. (संदर्भ Vol.18/3) याचा अर्थ धम्मदीक्षेसाठी नेमकी १४ तारीखच त्यांनी काही विशेष कारणास्तव (अशोका विजयादशमी) निवडली असावी या म्हणण्याला आधारच शिल्लक राहत नाही.
दि. १४ आक्टोबरला बाबासाहेबांनी आपल्या नागवंशिय अस्पृश्य (बहुसंख्य महार) बांधवासोबत बौध्द धम्माची दिक्षा घेतली. त्यांनी बुध्दाला अभिवादन केले, सम्राट अशोकाला मात्र अभिवादन केलेले नाहीये. हि बाब देखील सुज्ञ आंबेडकरी बौद्ध अनुयायांनी लक्षात घेण्यासारखी आहे. दि. १५ आक्टोबरला बाबासाहेबांनी जनतेसमोर जवळपास दोन तासाचे भाषण केले, त्या *आपल्या भाषणात बाबासाहेबांनी सम्राट अशोकाविषयी एक शब्दही काढला नाही. असे त्यांनी का केले असावे?? सम्राट अशोकाचा बौध्द धर्माच्या प्रसार आणि प्रसारात फार मोठा वाटा आहे, हे लक्षात घेवुन बाबासाहेबांनी सम्राट अशोकाचे थोडेतरी गुणगाण केले असते, पण तसे केले नाही. साधारणतः एखाद्या व्यक्तिच्या कर्तृत्वाशी वा त्याच्या जीवनाशी निगडित एखादा दिवस वा घटना असेल तर त्या दिवसाची आठवण भाषणातून, कार्यक्रमातून करण्याची समाजाची रीत आहे..मग असे असतानाही बाबासाहेबांनी मात्र त्यांच्या भाषणात तसे का केले नसावे…कदाचित 14 ऑक्टोम्बर चा संबंध अशोकाशी नसलेच म्हणूनच ना, नाही का??
बाबासाहेबांनी दि. १४ ऑक्टोबर हि धम्मदीक्षे साठी तारीख निवडण्या अगोदर धर्मांतराचा सोहळा हा मुंबईत घेण्याचे योजिले होते याचा अर्थ अशोका विजया दशमीच्या अनुषंगानेच तो घेण्यात आलेला आहे असे म्हणणे फोल ठरते..खरे तर त्यांनी दि. २४ सप्टेंबर १९५६ च्या आपल्या पत्रात नमूद करतांना बाबासाहेब म्हणतात, I have decided to have my conversion about the Dassehra Holidays. म्हणजे.. मी दसऱ्याच्या सुट्यांदरम्यान (About = दरम्यान , जवळपास, सुमारास) माझे धर्मांतर करण्याचे ठरविले आहे. इतका अगदीच स्पष्ट उल्लेख त्या पत्रात बाबासाहेबांनी केला आहे..इतकेच नव्हे तर Dassehra या शब्दाला त्यांनी अशोका विजया दशमी वगैरे असे काहीही न म्हणता फक्त दशहरा (Dassehra) याच अर्थाने शब्दप्रयोग केलेला आहे. हे आम्ही सुज्ञ आंबेडकरी बौद्ध अनुयायांनी लक्षात घेण्यासारखे आहे.
त्यावेळी बहुतांश लोकांना असे वाटत होते कि नागपूर हे RSS चे ठिकाण (गड) असल्यामुळे बाबासाहेबांनी धम्मदीक्षेसाठी नागपूर निवडले असावे. या आरोपांचे खंडन करतांना बाबासाहेब त्यांच्या दि. १५ ऑक्टोबर १९५६ च्या सकाळच्या भाषणात स्पष्टच सांगतात की, “आपले नाक खाजवून दुसऱ्याला अपशकुन करण्यासाठी मजजवळ वेळ नाही.” (संदर्भ-vol 18/3) आणि खरे कारण म्हणजे नागपूर हे नागवंशीय लोकांची वस्ती असून त्यांनीच गतकाळात बौद्ध धम्माचा भारतात प्रचार प्रसार केला…असे ते अभिमानाने सांगतात परंतु हे सांगतांनाहि त्यांनी सम्राट अशोकाचा उल्लेख केलेला नाही…हेही आम्ही लक्षात घेतले पाहिजे..
बाबासाहेबांनी प्राचिन भारताच्या इतिहासाला घेवुन ‘प्रचिन भारतातील क्रान्ति आणि प्रतिक्रांति’, ‘शुद्र पुर्वी कोण होते?’, ‘अस्पृश्य मुळचे कोण’, ‘जातिव्यवस्थेचे निर्मुलन’, ‘हिन्दुधर्मातील कोडे’, ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ इत्यादी ग्रंथसंपदा लिहिली. ज्यांनी ज्यांनी हे साहित्य वाचले असेल त्यांना त्यात सम्राट अशोकाची किंवा त्याच्या स्वताच्या राजवटीची बाबासाहेबांनी स्तुती केलेली कुठेही दिसत नाही वा आढळत नाही किंवा सम्राट अशोकावर बाबासाहेबांनी कुठेतरी एखादा लेख लिहुन ठेवला आहे, असेही दिसत नाही. असे त्यांनी का बरे केले याचाही आपण विचार करायला हवा..

बाबासाहेबांच्या दि. 4 डिसेंबर 1954 रोजी रंगून येथे तिसऱ्या जागतिक बौद्ध धर्माच्या अधिवेशनात दिलेल्या भाषणातील खालील दोन उतारे अशोकचक्राला धरून लक्षात घेण्यासारखे आहेत ते असे…
‘मी पार्लमेंटमध्ये असताना बौद्ध धर्माच्या पुनरूत्थानाविषयी काही गोष्टी करून टाकल्या आहेत. भारताच्या घटनेचा मी शिल्पकार आहे. मी ती घटना तयार केली. तीत पाली भाषेच्या उत्थानाची मी योजना करून ठेवली आहे, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्राध्यक्षाच्या राजवाड्यावर गौतम बुद्धाच्या शिकवणुकीतील पहिलेच चरण – धम्मचक्र परिवर्तन – घातले असून ते मी ब्रम्हदेशाचे अध्यक्ष डॉ. जी. पी. मलालशेखर यांच्या दृष्टोत्पत्तीस आणले आहे. हे पाहून त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले. तिसरी गोष्ट म्हणजे भारतीय पार्लमेंटच्या निशाणावर अशोकचक्र हे भारत सरकारचे प्रतिक म्हणून घटनेत मान्य करून घेतले आहे. हे सर्व करताना मला हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन व पार्लमेंटच्या इतर सभासदांचा विशेष विरोध झाला नाही. इतके स्पष्ट नि मद्देसूद विवेचन मी पार्लमेंटमध्ये केले होते.”
हे वरील बाबासाहेबांचे विधान लक्षात घेतांना ज्याला बाबासाहेब अशोकचक्र म्हणतात ते खरे तर धम्मचक्र होय हे त्यांना चांगलेच ठाऊक होते यांत कुणालाही शंका घेण्यासारखं काहीच नाहीये तरीपण मग बाबासाहेबांनी संविधानात त्याचा अशोकचक्र म्हणून भारत सरकारचे प्रतीक म्हणून का नमूद केले असावे, धम्मचक्र म्हणून का म्हटले नाही? असे सर्वसाधारणपणे आपल्याला प्रश्न पडेल त्याचे उत्तर बाबासाहेबांच्या विधानातच आपणास मिळते ते असे की, अशोकचक्र म्हणून भारत सरकारचे प्रतीक करण्यास तत्कालीन हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन इत्यादी व पार्लमेंटच्या इतर सदस्यांचा तितकासा विरोध झाला नाही कारण बाबासाहेबांनी त्या प्रतीकांचा नेमका अर्थ त्या लोकांना पटवून सांगितला होता..म्हणजे विरोधकांचा सुरवातीस विरोध होता.. पण बाबासाहेबांनी त्या विरोधाची तीव्रता आपल्या विद्ववत्तेने मुद्द्याला पटवून देऊन कमी केली होती. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे..

याला राजकारणातील मुत्सद्देगिरी (statesmanship) म्हणतात जी बाबसाहेबांमध्ये भरकसपणे होती..म्हणून ते कदाचित त्यास अशोकचक्र म्हणाले असावेत…धम्मचक्र म्हणाले असते तर प्रस्थापित ब्राह्मण्यग्रस्त लोकांनी आक्षेप घेतला नसता का त्यांच्यावर?? की भारताचे संविधान तर Secular आहे मग secular देशात धम्मचक्र (धर्माचे स्थान) कसे?? तेव्हा हे सगळं हाताळण्यासाठी बाबासाहेब tactfully उत्तरे द्यायचे..बुद्धाने Tactfully जीवन जगायला सांगितले आहे. (Ref-TBHD). ज्याला व्यवहार चातुर्य म्हणतात..म्हणून बुद्ध जगातील सर्वश्रेष्ठ विचारवंत होता असे बाबासाहेब मोठ्या अभिमानाने म्हणायचे..

अशोकचक्र की धम्मचक्र ?? याविषयीचा संभ्रम खालील स्पष्टीकरणातून अगदीच स्पष्ट होण्यास मदत होईल..
बुध्दाने प्रवर्तित केलेल्या धम्मचक्राला समजून न घेतल्याने, त्या चक्राला अशोकचक्र म्हणून संबोधण्याची तशीच एक चूक झाली. शाक्यसिंह बुध्दाने केलेल्या धम्मचक्र प्रवर्तनाच्या घटनेचे महत्व लक्षात घेऊन सम्राट अशोकाने सारनाथ येथे सिंहनादाची प्रतिकृती व धम्मचक्र अंकीत असलेला स्तंभ तयार केला. पायाभूत २४ आयाम असलेल्या धम्मचक्रातील तत्वज्ञानाला एका चक्राच्या प्रतिकृतीत शिल्पबध्द करून धम्मचक्राला अजरामर करण्यात सम्राट अशोकाच्या ध्येयवादाला जगात तोड नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी भारताचे राष्ट्रपती व लोकसभा अध्यक्ष यांच्या आसनावरसुध्दा ‘ धम्मचक्र प्रवर्तनाय ‘ असे अंकित केलेले आहे; ‘ अशोकचक्र प्रवर्तनाय ‘ नव्हे. यास्तव त्या चक्राला ‘ अशोकचक्र ‘ म्हणून संबोधणे योग्य ठरत नाही कारण सम्राट अशोकाप्रतीचा अत्याधिक आदर व्यक्त करण्याची भावना त्यात असली तरी त्याला अशोकचक्र म्हणुन संबोधल्यास धम्मचक्रात अंतर्भूत २४ मुद्दयांना कालांतराने दुय्यम दर्जा दिला जाण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही धम्मचक्राला अशोकचक्र हे समानार्थी किंवा पर्यायी संबोधन दिले तर धम्माच्या मुळ तत्वज्ञानवर पांघरून घातले जाण्याची भीती कायम राहते धम्मचक्र हे धम्मचक्र म्हणुनच संबोधले जावे, अशोकचक्र म्हणून नव्हे.
एकंदरीत बाबासाहेबांनी आधुनिक जगाच्या इतिहासात जी महान धम्मक्रांती या देशात घडवून आणली तो दिवस म्हणजे दि. १४ ऑक्टोबर सुवर्ण अक्षरात नोंदण्यासारखा असतांना काही विद्वान मंडळी इतर दिवसांचा आग्रह करून कदाचित बाबासाहेबांचे महत्व तर कमी करण्याचा प्रयत्न करीत नाहीत ना?? या बाबीकडे येत्या धम्म चक्र प्रवर्तनाच्या दिनानिमित्त बाबासाहेबांच्या खऱ्या बौद्ध अनुयायांनी गांभीर्याने बघणे गरजेचे आहे.
?जय भीम नमो बुद्धाय ?

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया,
नागपूर.
www.buddhist-society.org
www.ssdindia.org

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.