? लोकशाही वरील धोके टाळण्यासाठी आमचे कर्तव्य?
” आपली सर्वसाधारण धारणा आहे की आपणास स्वातंत्र्य मिळाले आहे. ब्रिटीश निघुन गेले आहेत. लोकशाहीला पोषक असे संविधान मिळालेले आहे आणि अर्थातच आपणास यापेक्षा जास्त काय हवे आहे? यापेक्षा जास्त काही न करता आपला कार्यभाग संपलेला आहे असे समजुन आपण आता विश्रांती घेतली पाहीजे. संविधान तयार झालेले असल्यामुळे आपला कार्यभाग संपलेला आहे अशा प्रकारच्या ‘ शिष्टपणाच्या ‘ भावनेविरुध्द मला आपणास ताकीद देने भाग आहे. कर्तव्य संपलेले नाही, त्याला आता कुठे सुरुवात झाली आहे. तुम्हाला याचे स्मरण ठेवावे लागेल की, लोकशाहीचे रोपटे सर्वच ठिकाणी वाढत नाही. ते अमेरिकेत वाढले, ते इंग्लडमध्ये वाढले. काही प्रमाणात ते फ्रान्समध्ये वाढले. खरोखरच इतर ठिकाणी काय घडले हे पाहाण्यासाठी ह्या उदाहरणातुन आपणास काही प्रमाणात धैर्य प्राप्त होईल. तसेच आपणापैकी काही लोकांना हे स्मरण असेल की, पहिल्या महायुध्दाचा परिणाम म्हणून आणी आॅस्ट्रिया-हंगेरिया साम्राज्याचे विभाजन म्हणुन विल्सनने स्वयंनिर्णयाच्या आधारावर आॅस्ट्रियापासुन स्वतंत्र असे वेगवेगळे छोटे देश निर्माण केले. त्याची सुरुवात लोकशाही संविधानाने व लोकशाही शासनाने झाली. आणि त्यांच्या संविधानात मुलभुत अधिकारांचा समावेश देखील होता. हे मुलभुत अधिकार व्हर्साइलच्या शांतता तहाने त्यांच्यावर बंधनकारक केले होते. माझ्या मित्रांनो, त्या लोकशाहीचे काय झाले हे आपणास ठाउक आहे काय? लोकशाहीचा अंश तरी त्या ठिकाणी पाहावयास मिळतो काय? त्या सर्व संपलेल्या आहेत. त्या सर्व नष्ट झालेल्या आहेत. काही दुसरी विद्यमान उदाहरणे विचारात घ्या. सिरियामध्ये लोकशाही शासन होते. फारच थोड्या वर्षानंतर तेथे लष्कराची क्रांती झाली. सिरियाचा प्रमुख कमांडर येथील राजा झाला व लोकशाही लोप पावली. दूसरे उदाहरण घ्या. इजिप्तमध्ये काय घडले? तेथे सुध्दा सन 1922 पासुन सतत 30 वर्षे लोकशाही शासन व्यवस्था होती. परंतु एकाच रात्रीत फारुकला राज्यसत्ता सोडावी लागली व नजीब इजिप्तचा हुकुमशहा झाला. त्याने लगेच तेथील संविधान नष्ट केले.
ही सर्व उदाहरणे आपल्या डोळ्यांसमोर आहेत आणी म्हणुन मला असे वाटते की, आपल्या भवितव्यासंबंधी आपण फारच सावध आणि फारच समजुतदार राहीले पाहीजे. आपली लोकशाही सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या मार्गातील काही दगडधोंडे व शिला दुर करण्याच्या कामी आपण काही ठाम कार्यक्रम घेणार आहोत किंवा नाही याचा आपणास गंभिरपणे विचार करावा लागेल. मी आपणासमोर मांडलेल्या काही विचारांमुळे आपणामध्ये जर काही जागृती निर्माण झाली असेल व या समस्यांबाबत आपण गाफिल राहुन चालणार नाही असे आपणास वाटत असेल तर माझे कर्तव्य मी पार पाडले आहे असे मला वाटते.”
–डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
(संदर्भ: DBAWAS VOL 18, III, Page no. 338 & 339)
संकलन:- सी. पी. उराडे,
समता सैनिक दल,
HQ दिक्षाभुमी, नागपूर
www.ssdindia.org
(संविधानिक रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणी साठी कटिबद्ध)