भीम स्तुती कि भीम-स्तोत्र ??


*भीम स्तुती कि भीम-स्तोत्र ??*

भीम-स्तुती ह्या कवितेस “प्रार्थनेचा” दर्जा देणे योग्य आहे का? जर “नाही” तर विहारांमध्ये होणारे याचे पठण थांबवायला नको का ??

वि. तु. जाधव लिखित कविता
हि कविता धार्मिक विधी-प्रसंगी म्हणण्यात येते…

दिव्य प्रभरत्न तू, साधू वरदान तू – आद्य कुलभूषण तू, भिमराजा |

सकल विद्यापती, ज्ञान सतसंगती – शास्त्र शासनमती, बुद्धितेजा |

पंकजा नरवरा, रत्त स्वजन उद्धरा – भगवंत अमुचा खरा, भक्त काजा |

चवदार संगरी, शस्त्र धरता करी – कापला अरि उरी, रौद्ररूपा |

मुक्तीपथ कोणता, जीर्ण स्मृती जाळीता – उजाळीला अगतीका मार्ग साजा |

राष्ट्रघटना कृती शोभते भारती – महामानव बोलती, सार्थ संज्ञा |

शरण बुद्धास ये, शरण धम्मास ये – शरण संघास ये, मानवा |

पुढे मी काही प्रश्न उपस्थित करणार आहे – वाचकांच्या मनास वेदना होतील त्या बद्दल क्षमस्व परंतु माझा उद्देश फ़क़्त एवढाच आहे कि चुकीच्या रूढी-परंपरा समाजात तळ ठोकू नये. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मातील चुकीच्या परंपरांचा त्याग केला. आपण सर्वांनी आपल्यातील चुकीच्या परंपरांचा त्याग करायला नको काय ?


प्रश्न-१: “दिव्य” हा शब्द प्रयोग योग्य आहे का? दिव्य शब्दाचा अर्थ “आसमानी”/”स्वर्गीय/दैवी” असा होतो.
कवी ने फ़क़्त उपमा दिली असली तरी – डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मातील सर्व “दिव्य” कल्पनांची (Riddles in Hinduism, Revolution and Counter-Revolution, Who were Shudras etc) उकल करून खरा इतिहास पुढे आणला. आणि आपण डॉ.आंबेडकर यांनाच “दिव्य / स्वर्गीय / दैवी ” उपाधी द्यायची हे कितपत योग्य आहे?

प्रश्न-२: “साधू वरदान तू” – डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे काय कोणत्या साधू च्या वरदानामुळे जन्मास आले होते ? महापुरुषांच्या जन्मा संदर्भात कथा “काल्पनिक” रचल्या जातात – हे वाक्य देखील तितकेच “काल्पनिक” आहे.
अथवा कोणीही “डॉ बाबासाहेब आंबेडकर” ह्यांच्या जन्माचे श्रेय कोण्या “साधू” ला देणार नाही. ह्या एका वाक्या-मुळे हि पूर्ण कविता अयोग्य ठरवाविशी वाटते.

प्रश्न-३: “आद्य कुलभूषण तू” — डॉ.बाबासाहेब यांनी जात-निर्मुलनासाठी काम केले – आणि आपण त्यांनाच कुळ/वंश-वादाचा भाग बनवणे योग्य आहे का ?
शिवाय ह्या वाक्याचा अर्थ “कुळाचे आद्य भूषण” किंवा “आद्य कुळाचे भूषण” – कसा लावावा ?

प्रश्न-४: “भगवंत अमुचा खरा, भक्त काजा ” ह्या वाक्याचा अर्थ काय? कोणास भक्त म्हटले आहे ? काय डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी “भक्ती” चा मार्ग स्वीकारला? काय त्यांना वाटेल कि आपण “बुद्धीचा” मार्ग सोडून निव्वळ “भक्ती”चा मार्ग घ्यावा ?

प्रश्न-५: “राष्ट्रघटना कृती शोभते भारती” – भारती म्हणजे काय? आपल्या देशाचे नाव “भारत/India” असे आहे. मनुवादी विचारधारेच्या सर्वांचे प्रयत्न आहेत कि हे नाव बदलावे. त्यासाठी ते सतत “हिंदुस्तान” ह्या शब्दाचा मारा प्रसारमाध्यमांच्या-करवी करीत असतात.
“भारती” हे सरस्वतीची एक नाव आहे (किंवा नंतर दिले गेले आहे) मुळात भारत देशाचे नाव अशोक कालीन “भारतवर्ष” या संदर्भावरून आले आहे. तो इतिहास बदलण्याचा प्रयत्न “भारती” ह्या नावात होतो. कवी देखील ह्या डाव-पेचाला बळी पडलेला दिसतो.

प्रश्न-६: “रत्त स्वजन उद्धरा” – काय बाबासाहेबांनी फ़क़्त स्वजनांचा उद्धार केला?
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी फ़क़्त स्वतःच्या समाजाचे नाही तर समस्त वंचित समाजाचे (SC/ST/OBC/SBC/NT/VJ) आणि समस्त भारताचे “माय-बाप” बनून संविधानात सर्वांना समान संधी दिल्या.
मनुस्मृती ने पतित मानल्या जाणाऱ्या उच्च-वर्णीय (OPEN category) महिलांना पुरुषांच्या इतकेच अधिकार दिले.
त्यांना “स्वजन उद्धारा” असे म्हणून कमी लेखण्या सारखे नव्हे काय ?

प्रश्न-७: “शस्त्र धरता करी – कापला अरि उरी, रौद्ररूपा” – (अरि: शत्रू) (रौद्र रूपा: भयानक रूप)
डॉ आंबेडकर यांनी “शस्त्र” हाती धरले नाहीत – ते “रौद्र-रुपी” कदापि नाहीत. डॉ.बाबासाहेब यांनी रक्ताचा एक थेंब न सांडता महान क्रांती घडवून आणली.अशा महामानवास “रौद्ररूपा” म्हणणे योग्य आहे का?

आपण सर्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल असीम भावनिक आहोत – आपल्या पैकी अनेक जणांना वरील उपस्थित केलेले प्रश्न चुकीचे वाटतील -पण काय आपण “एका कवितेला” (जिचा अर्थ चुकीचा लावला जाऊ शकतो) “प्रार्थनेचे” स्वरूप देणे योग्य आहे का ?हि कविता आज फ़क़्त एक कविता नसून एक “परंपरा” बनली आहे.काय आपण देखील (चुकीच्या) रूढी-परंपरा पुढील पिढीला देणार आहोत ? काय आपण एक अशी नवी कविता तयार करू शकत नाही का ज्यात महामानवाचेे गुण वर्णिले जातील, त्यात बाबासाहेबांचा उदात्त मानवतेचा विचार मांडला जाईल. TBSI-भारतीय बौद्ध महासभा यांच्या सर्व पदाधिकारी यांना विनंती आहे कि त्यांनी ह्या संबंधी काही योग्य-पावले उचलावी

नमो बुद्धाय * जय भीम

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.