? उघडा डोळे वाचा नीट ?
? बौद्ध तत्वज्ञानानुसार पुनर्जन्म, कर्मवीपाक सिद्धांत आणि पतित जनतेला रिपब्लिकन तत्वज्ञानाच्या रुजवणुकीची जाणीव करून देण्यासाठी समाजसेवी कार्यकर्त्यांची अत्यावश्यकता…या अनुषंगाने.. ?
डॉ.बाबासाहेब म्हणतात…
? बौद्ध तत्वज्ञानात पुनर्जन्म मानण्यात येतो असा दाखला लागलीच देण्यात येईल, परंतु त्या सिद्धातांचा आत्म्याशी कोणत्याच अर्थाअर्थी संबंध नाही. बौद्ध पुनर्जन्म सिद्धांत म्हणजे पुनर्निर्मिती. निसर्गाची पुनर्निर्मिती. पित्याच्या आकारासारखा चेहऱ्यामोहऱ्याचा पुत्र होतो म्हणून तो काही संपूर्णपणे पिता नाही. याला बौद्ध तत्वज्ञानात पिता पुत्राच्या रूपाने जन्म घेतो असे म्हटले आहे. परंतु पित्यातील सर्व गुणांचा वास पुत्राच्या ठिकाणी राहू शकत नाही. कारण त्याबाबतीत पित्याबरोबर मातेचे गुण त्यात येतात. शिवाय वातावरणाचा परिणाम होतोच. एका आंब्यापासून दुसरा आंबा निर्माण होतो. त्याच प्रमाणे चाललेल्या जगरहाटीला पुनर्निर्मिती म्हणतात. परंतु जमीन, पाणी, वारा, खत यांचा जोड परिणाम होऊन मूळ आंब्याला जसे मधुर फळ येईल तसेच दुसऱ्या आंब्याला येऊ शकेल असे नाही. कदाचित चांगला परिणाम झाला तर चांगले फळ येईल, वाईट झाला तर वाईट येईल.’शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी’. म्हणूनच एका प्रांतात विशेष फळ-फुल झाडांची वाढ होते. इतरत्र ते जगू देखील शकत नाहीत. जसे चहा-कॉफी आसाम, निलगिरीत होते. नारळ समुद्र किनाऱ्यावरच वाढतात. हापूस आंबा रत्नागिरी जिल्ह्यातलाच चवीला-रसाला चांगला.म्हणून पुनर्निर्मितीच्या कार्यालाच पुनर्जन्म म्हटले आहे. परंतु पुनर्जन्म शब्दाचा आधार घेऊन त्याच बरोबर आत्मा बौद्ध तत्वज्ञानाला मान्य आहे असा गैरसमज पसरविला जात आहे. पण तो गैरसमजच आहे.
? बौद्ध धर्मात ईश्वर नाही. बौद्धधर्मानुसार जगाचे व्यवहार दरएकाच्या कर्माने चालतात. या मुळे बौद्धधर्माने मनुष्यमात्रावर जबाबदारी टाकली आहे. केले तसे भोगावे लागेल अशी ताकीद दिली. याला कर्म विपाक म्हणतात. कर्मवीपाक म्हणजे आमच्या क्रियेपासून निर्माण होणारी फळे. कर्म म्हणजे पूर्वसंचित, पूर्वजन्मी साठवलेले पापपुण्याचे गाठोडे असा अर्थ बौद्ध तत्वज्ञानात नाही. काही कर्म असे असते की, त्याचा परिणाम ताबडतोब भोगावा लागत नाही. त्या कर्माचा, क्रीयेचा परिणाम कालांतराने होतो. परंतु जन्मांतराने नव्हे. कारण पुनर्जन्मच नाही.
? यामुळे बौद्धधर्माने माणसाला स्वतःच्या सद्गुणांची वाढ करण्याला वाव ठेवला आहे. मानवाला स्वतःच्या प्रगती साठी, उन्नतीसाठी स्वतःच झटावे लागेल असा आदेश दिला आहे. ‘ माझ्या कपाळी हे लिहिलं आहे ‘, हे विधिलिखित आहे, ब्रह्मची रेघ आहे’ म्हणून हताश न होता, निराश न होता स्वतःच्या उद्धाराचा राजमार्ग दाखविला आहे. संचित हे एक माणसाला निष्क्रिय करणारे धैर्य खचवणारे थोतांड आहे.
? पूर्वजन्माच्या कल्पनेमुळे पापकर्मे करणाऱ्याला उत्तेजन मिळाले आहे. मागच्या जन्मात साठवून ठेवलेलं पुण्य आहे मग आता पाप करायला काय हरकत आहे असे एखादा खावूनपिऊन बरा असा गृहस्थ आपल्या मनाशी विचार करतो. पण असा माणूस हा मानवजातीला अपायकारक असतो. पतीत दोन प्रकारचे असतात. एक पतीत ज्याला आपण पतीत आहोत याची जाणीव असते व त्याची बोचनी लागलेली असते. दुसरा पतीत ज्याला आपल्या पापकर्मा बद्दल काहीच वाटत नाही.जसा एखादा मारखावू कोडगा असतो तसा.
? ज्या पतिताला आपल्या स्थितीची जाणीव असते व बोचनी लागते तो आपल्या पतीत अवस्थेतून वर येण्यासाठी धडपड करतो. तो या जाणिवेमुळे स्वतःचा उद्धार करू शकतो. परंतु दुसऱ्या प्रकारचे पतीत सुधारुच शकत नाही कारण त्याची मानसिक ठेवनच तशी असते.
? अशा प्रकारे आपल्या अध:पतनाबद्दल खंत वाटणाऱ्यांना मार्ग दाखविण्याचे कार्य करण्यासाठी समाजसेवकांची जरुरी आहे. समाजाला वैचारिक भूमिका देण्यासाठी आणि सांस्कृतिक कार्य करण्यासाठी सेवकांची जरुरी आहे. गरीब समाजाला त्यांना मेहनताना देता येणार नाही. पण त्यांच्या पोटापाण्याची सोय करता येईल. अशा कार्यकर्त्यांना ऐतखाऊ म्हणता येणार नाही. कारण हजार आकर्षणे सोडून समाजसेवा करावी लागते.
बौद्ध भिख्खूची संघटना हि अशाच समाजसेवेसाठी भगवंतांनी निर्माण केली आहे. ते स्वीकारून भगवान बुद्धांनी दाखवून दिलेल्या मार्गाने जाण्याने आज जगाचे कल्याण होईल. मानवतेचे हित होईल.
(संदर्भ vol 18/3 )
??जय भिम??
टीप: हे लक्षात घेऊनच डॉ. बाबासाहेबांनी समाजाला वैचारिक भूमिका देण्यासाठी आणि सांस्कृतिक कार्य करण्यासाठी समाजसेवकांची धम्म प्रचारक-प्रसारक यंत्रणा म्हणजे भारतीय बौद्ध महासभा दिलेली आहे. तिचे रीतसर सदस्य बनून लोकशाही मूल्यांना जगण्यास सुरुवात करु या.)
—– संग्राहक—–
उज्वला इंगोले
समता सैनिक दल, यवतमाळ
(संविधानिक रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध)