रिपब्लिकन विरुद्ध बहूजन (नाकर्त्यांनी उभा केलेला निरर्थक वाद)
:- प्रा. महेन्द्र ज. राऊत
मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘रिपब्लिकन विरुद्ध बहूजन’ असा वाद निर्माण करण्यात आलेला आहे. प्रत्येक विषयावर आपण बोललच पाहीजे असा माझा स्वभाव नाही पण कधीकधी बोलल्यावाचून रहावत नाही. त्याचप्रमाणे माझच मत वाचकांनी स्वीकारावं असा माझा आग्रह ही नसतो पण स्थापित सत्याला सत्य म्हणुन स्वीकारण्याची प्रामाणिकता मित्रांनी दाखवावी अशी विनम्र अपेक्षा मात्र मी निश्चितच करित असतो.
रिपब्लिकन विरुद्ध बहूजन हा वाद अत्यंत निरर्थक, भ्रामक आणि वैमनस्यकारक आहे असं मला वाटते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी जी त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या १०/११ महिण्यानंतर, ३-१०-१९५७ रोजी त्यांच्या तत्कालीन सहकार्यांनी स्थापन केली होती त्या रिपब्लिकन पार्टी च्या भावनात्मक प्रेमापोटी आणि मान्यवर कांशीरामजी यांनी १४ एप्रिल १९८४ साली स्थापन केलेल्या बहुजन समाज पार्टी च्या अविचारी आकसापोटी हा वाद हेतूपुरस्सर रित्या निर्माण करण्यात येत आहे असं माझं ठाम मत आहे. मग पक्षपातपूर्ण मानसिकतेतून “रिपब्लिकन संकल्पना”, तथागत गौतम बुद्धा ची “बहूजन हिताय, सुखाय संकल्पना” आणि कांशीरामजी यांचा “बहूजनवाद” हा सर्व शाब्दिक कत्थ्याकूट आणि वाट्टेल तशी सोयीची व्याख्या करणे क्रमप्राप्त आहे.
रिपब्लिकन पार्टी चा विरोध करणे म्हणजे रिपब्लिकन संकल्पनेचा विरोध करणे असा जर आपण अर्थ लावत असाल तर आपल्या बुद्धिची कीव करावी लागेल. ज्या रिपब्लिकन संकल्पनेतून राजकीय पक्ष स्थापन करण्याचा संकल्प प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता, तसा रिपब्लिकन पक्ष स्थापन झाला काय, हा विचारणीय प्रश्न आहे. याचे उत्तर जर सकारात्मक असेल तर त्या रिपब्लिकन पक्षाची शकले कां पडलीत, तो विलुप्तप्राय: कां झाला आणि बहूजन समाज पार्टी कां निर्माण झाली असे प्रश्न लगेच उत्पन्न होतात. आणि बाबासाहेबांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष स्थापन झाला नसेल तर मग कुठलेच प्रश्न विचारण्याची गरजच रहात नाही.. वादच संपतो.. असं मला वाटतं.
“रिपब्लिकन” या शब्दाचा (Re-Construction सारखा) Re-publican असा संधिविग्रह करता येत नाही. हे खुळचटपणाचे लक्षण आहे. Republic हा मूळ शब्द आहे, ज्याचा उद्गम फ्रेंच Republiqa आणि लैटिन भाषेतील res’publica पासून झालेला आहे. ज्याचा अर्थ किंवा मराठी/ हिंदी पर्याय “गणराज्य/ गणतंत्र” असा आहे. Republic या मूळ शब्दापासुन Republican शब्द तयार झाला आहे. A Representative form of Government अर्थात प्रातिनीधिक पद्धतीचे सरकार याला Republic किंवा गणतंत्र म्हणतात. Republic Democratic अर्थात गणतांत्रिक लोकशाही किंवा Democratic Republic अर्थात लोकतांत्रिक गणराज्य या प्रकारेहीे Republic शब्दाचा वापर केला जातो. Republican म्हणजे “गणराज्यवादी” किंवा “गणतंत्रवादी”. त्यानुसार Republican Party of India चा खरा अर्थ.. ” भारतीय गणराज्यवादी पार्टी किंवा भारतीय गणतंत्रवादी पार्टी असा होतो. ‘गण’ म्हणजे काय..? गण म्हणजे “लोकांचा समूह”. कोणत्या लोकांचा समूह..? “समविचारी” लोकांचा समूह. याला गण म्हणतात. आणि अश्या समविचारी लोकांचा समूह (म्हणजे गण) जेव्हां एकत्रित येवून स्वत:करिता एक शासनव्यवस्था (म्हणजे तंत्र) निर्माण करतो, अंगीकार करतो आणि स्वीकार करतो, त्या व्यवस्थेला “गणतंत्र” अर्थात Republic म्हणतात आणि त्या व्यवस्थेला मानणार्या लोकांना गणतंत्रवादी अर्थात Republican म्हणतात. Republican Party of India स्थापन करण्यामागचा उद्धेश कदाचित हाच असावा की समविचारी समूहाची स्वत:ची प्रातिनीधिक शासनव्यवस्था स्थापन करण्याकरिता संघर्ष करणारा राजकीय पक्ष स्थापन करणे.
अब्राहिम लिंकंन यांनी लोकशाहीची लोकप्रीय व्याख्या ” By the People, For the people, Of the People ” (लोकांनी, लोकांसाठी, लोकांची शासनपद्धती) अश्याप्रकारे केली ,जी सर्वश्रुत आहे. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी झुंडशाहीला लोकशाही मानण्यास नकार देत, भारतीय संदर्भात लोकशाही ची व्याख्या ” लोकांच्या दैनंदिन जीवनात रक्तपाताशिवाय क्रांतिकारक बदल घडवून आणणारी शासनपद्धती म्हणजे लोकशाही.” अश्याप्रकारे केली आहे. लोकशाही अर्थात Democracy चे हेच उद्धिष्ठ्य गाठण्याकरिता बाबासाहेबांनी Republican Party of India नावाचा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा संकल्प केला होता, जो त्यांच्या हयातीत साकार झाला नाही. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर जो रिपब्लिकन पक्ष स्थापन झाला तो १९५७ पासून १९६८ पर्यंत अवघ्या १०/११ वर्षातच चार गटात विभाजित झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष त्यांच्या सहकार्यांच्या वैयक्तिक नावाने ओळखला जावू लागला. म्हणतात नां… “संविधान कितीही चांगले असले, पण ते वाईट लोकांच्या हातात असेल, तर कूचकामी ठरते” तसेच इथेही झाले. बाबासाहेब कृत रिपब्लिकन पार्टी चे संविधान, त्यांच्या सहकार्यांनी कूचकामी ठरविले. रिपब्लिकन या महान संकल्पनेचा पार धुवा उडवून टाकला. इतर समविचारी समूहांना जोडण्याची प्रक्रिया सुरु होण्यापूर्वीच, जे सोबत होते तेच विभक्त होवू लागले. १९७८ पर्यंत चार चे चौदा गट झाले… राष्ट्रीय दर्जा गेला, चिन्हही गेले तरीसुद्धा प्रत्येक गटाचा गटाधिपती स्वताला अखिल भारतीय नेता म्हणू लागला. येथे एक गोष्ट लक्षात घेणे प्रासंगिक ठरेल की या काळापर्यंत भारताच्या राजकीय पटलावर बहूजनवाद किंवा मूलनिवासीवाद जन्माला आलेला नव्हता. रिपब्लिकन पार्टी च्या -हासाला बहूजनवाद किंवा मूलनिवासीवाद कारणीभूत आहे असा टाहो फोडणार्यांनी आपल्या राजकीय इतिहासाचे नीट वाचन करावे.
आता आपण बहूजन या शब्दाकडे वळूया. हा शब्द २५०० वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धाने वापरला. “चरथं भिक्खवे चारिकं, बहूजन हिताय, बहूजन सुखाय, लोकानुकंपाय ….. … देसेथ भिक्खवे धम्मं आदिकल्याणं, मज्झेकल्याणं परियोसानकल्याणं…. पकासेथ….” या गाथेत “बहूजन” हा शब्द “बहूसंख्यक लोकं” याच अर्थाने आहे याबाबत दूमत होण्याचं कुठलंही कारण नाही. गाथेत या शब्दाला सामाजिक संदर्भ आहे, राजकीय नाही.
मान्यवर कांशीरामजी यांनीही बहूजन या शब्दाला सामाजिक संदर्भातूनच घेतले आहे पण त्याचा वापर मात्र राजकीय उद्धेशासाठी केला आहे. ते म्हणतात, “इस देशमे जातिके आधारपर, ऊँचनीचता के आधारपर लोगोंको तोडा गया है. साडे छह हजार जाति उपजातियोंमे ये समाज बिखरा है. और हर जाति अपने आपमें एक “अल्पजन समाज” है. मै इन जातियोंको तोडकर , इन अल्पजन समाजों को जोडकर बहूजन समाज बनाना चाहत हूँ. मेरी चाहत है कि हम सब लोग अल्पजन से बहूजन बनें और बहूजन बनकर इस देशके हुकुमरान बनें…” कांशीरामजी यांनी आयुष्यभर हे उद्गार काढले. त्यांच्या लेखी मनुवादी व्यवस्थेचा बळी (victim) असलेला भारतातील ८५% समाज (म्हणजे SC+ST+OBC+ Minorities) हा बहूजन समाज आहे. पण तो ६५०० जातींमध्ये विभाजित आहे आणि उच्चनीचतेच्या मानसिकतेत गुरफटलेला आहे. त्यामुळे मनुवाद टिकून आहे. यांच्यातील समानतेचा दुवा एकच आहे की या सर्व जाती मनुवादी व्यवस्थेच्या बळी आहेत पण त्यांच्यापैकी बहूसंख्यक जातींना त्याची जाणीव नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षामुळे ज्यांना जाणीव झालेली आहे, त्यांचं हे कर्तव्य ठरते की त्यांनी या अज्ञानी जातींपर्यंत जावून त्याचे प्रबोधन करावे, जाणीवा निर्माण कराव्यात आणि त्यांना सोबत घेवून मनुवादी व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करावे, हेच कांशीरामजींनी सांगितले. ६५०० अल्पजन समूह एकत्र आले किंवा यापैकी ५०% जरी एकत्र आले तर बहूजन समाज निर्माण होईल, म्हणुन त्यांनी “जाति तोडो, समाज जोडो” चा नारा दिला. भारतातील लोकशाही ही सार्वजनिक वयस्क मतदानावर आधारित आहे. समदुखी, समविचारी लोकांचा मोठा समूह अर्थात बहूजन समाज निर्माण झाल्यास निवडणुकीत होणार्या मतदानाद्वारे व्यवस्था परिवर्तन निश्चितच होवू शकते, हेच कांशीरामजींचे सांगणे होते. याला कोणी “बहूजनवाद” म्हणत असतील तर तेही मान्य आहे… पण हा बहूजनवाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिपब्लिकन संकल्पनेच्या विरोधात कसा असू शकतो.? कृपया याचे स्पष्टिकरण द्यावे. कांशीरामजी यांनी बाबासाहेबांच्या रिपब्लिकन संकल्पनेला कसा, कुठे व केव्हां विरोध केला हे ही स्पष्ट करावे. फक्त “रिपब्लिकन” नाव असलेल्या परंतु “रिपब्लिकन संकल्पनेशी” कुठलीही प्रामाणिकता न बाळगणार्या रिपब्लिकन पार्टीच्या गटांना व त्यांच्या गटाधिपतींना विरोध करणे हा जर गुन्हा असेल तर कांशीरामजी निश्चितच गुन्हेगार आहेत. परंतु मग प्रश्न उपस्थित होतात की कांशीरामजींनी काय करायला हवं होतं. १) असंख्य तथाकथित आंबेडकरवाद्यांसारखं स्वस्थ बसायला हवं होतं कां? २) रिपब्लिकन पार्टी च्या एखाद्या गटात सीमिल व्हायला हवं होतं कां.? ३) रिपब्लिकन पार्टी (कांशीराम) नावाने नवीण गट काढायला हवा होता कां.? काय करायला हवं होतं कांशीरामजींनी.?
ज्या अल्पजन समाजघटकांना जोडून बहूजन समाज बनविण्याचा ध्येय कांशीरामजी यांनी आपल्या डोळ्यांसमोर ठेवला होता, त्याच नावाने त्यांनी राजकीय पार्टी स्थापन केली हाच त्यांचा सर्वात मोठा गुन्हा आहे. त्यांनी फुले, शाहू, पेरीयार, नारायणा गुरू सारख्या समाज क्रांतिकारकांना बाबासाहेबांच्या सोबत जोडून आंबेडकर भक्तांच्या (अनुयायांच्या नव्हे) फाजिल अहंकाराला धक्का दिला हा कांशीरामजी यांचा गुन्हा आहे. जयभिम चा नारा गल्ली पासून दिल्ली पर्यंत पोहचविला हा कांशीरामजींचा गुन्हा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नीळा झेंडा आणि हत्ती चिन्ह स्वीकारून बहूजन समाज पार्टी नावाचा एक राजकीय पक्ष स्थापन केला आणि अवघ्या दहा वर्षात त्याला राष्ट्रीय दर्जा मिळवून दिला हा कांशीरामजींचा गुन्हा आहे. आणि या सर्व गुन्ह्यांसाठी आम्ही तथाकथित आंबेडकरवादी लोकं, कांशीरामजींना मरणोत्तर सूळावर चढवीत आहोत… फक्त हे सिद्ध करण्यासाठी की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिपब्लिकन संकल्पनेचा एकमेव मारेकरी कांशीराम आहे, हा सर्व उपद्व्याप सुरू आहे…! वा रे आंबेडकरवादी.!
रिपब्लिकन संकल्पना आणि बहूजन समाज निर्माण करण्याचा संकल्प वा प्रयत्न यात विरोधाभास कुठे आहे.? रिपब्लिकन संकल्पना ही एक आदर्श सामाजिक आणि राजकीय जीवनशैली स्थापन करू पाहणारी संकल्पना आहे. या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी समविचारी लोकांचे संख्याबळ आवश्यक नाही काय.? कुठलीही संकल्पना मग ती कितीही योग्य आणि आदर्श असो, व्यापक आणि परिणामकारक जनसमर्थनाशिवाय यशस्वीपणे लागू करता येवू शकते काय..? अश्याप्रकारचे जनसमर्थन मिळविण्याचा मार्ग कोणता आहे..? याचा थोडातरी विचार “रिपब्लिकन विरुद्ध बहूजन” हा वाद रंगविणारे विद्वान करतील काय.?
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचे निकट सहकारी असलेल्या नेत्यांनी रिपब्लिकन संकल्पनेची आणि चळवळीची कशी वाट लावली, याला वेगळे सांगण्याची गरज नाही. पण त्याला बाबासाहेबांचा किंवा त्यांच्या रिपब्लिकन संकल्पनेचा पराभव म्हणता येईल का.? मुळीच नाही. तश्याच प्रकारे कांशीरामजी यांच्या निधनानंतर त्यांच्या बहूजन समाज निर्माण करण्याच्या संकल्पाची धूळधान होत असेल आणि त्यांनी स्थापन केलेल्या बहूजन समाज पार्टीचे तीनतेरा नऊअठरा वाजत असतील तर तो कांशीरामजी यांचा पराभव म्हणता येणार नाही. हा पराभव आमचा आहे, आमच्या नाकर्तेपणाचा आहे पण हे आम्ही मान्य करित नाही. आम्ही आपल्या अपयशाचे खापर नेहमी दुसर्यांच्या डोक्यावर फोडू पाहतो. “रिपब्लिकन विरुद्ध बहूजनवाद” सारखा निरर्थक वाद उपस्थित करून समाजात भ्रम आणि वैमनस्य पसरविण्याचे कार्य करणार्या महापुरूषांना एवढीच विनंती आहे की त्यांनी आपली ऊर्जा विध्वंसात्मक कार्यात वाया न घालवता रचनात्मक कार्यात लावावी…. तूर्त एवढेच..!
? फक्त रिपब्लिकनवादच का ?? (कर्त्यांनी दिलेले स्पष्टीकरण)
A post written by: Prashik Anand
बुडत्याला काठीचा आधार म्हणावे तसे बहुजनांना दिलासा देणारी एक पोस्ट बहुजनवाद्यांच्या मनाचा चांगलाच ठाव घेऊन त्यांच्या बुडत्या, बिनबुडाच्या पोकळ विचारधारेला श्रेष्ठत्वाच्या मार्गावर नेण्याच्या केविलवाण्या प्रयत्नात दिसते आहे. खरं तर बरेच दिवसांपासून बहुजनवादावर लिहिण्यासारखं काहीच नसल्या कारणाने उगाच ऊर्जा, वेळ वाया घालवण्याची गरजच भासत नव्हती. परंतु म्हणतात ना की अधेमधे हुकी येणाऱ्यांचे काही खरे नसते. त्यांच्यासाठी वेळोवेळी काही उपाययोजनाही करणे गरजेचेच ठरते. त्याचाच एक भाग म्हणून हा लेख ! रिपब्लिकन विरुद्ध बहुजन या आधारशून्य मुद्द्याला हात घालून आपण जे आपलं मन मोकळं केलं त्याबद्दल आपलं प्रथम अभिनंदन ! मात्र ते यासाठी करावेसे वाटते की बहुजनवादी बनून प्रत्यक्षात मरणाऱ्यांनाही आणि जगणाऱ्यांनाही विषयांची इतकी सुरेख मांडणी जमली नसावी तितकी मुद्देसूद मांडणी आपण निश्चितच केलेली आहे यात मुळात वाद नाही.
रिपब्लिकन विरुद्ध बहुजन हा वाद अत्यंत निरर्थक, भ्रामक आणि वैमनस्यकारक आहे असे जे आपले मत आहे ते अगदीच खरे आहे. कारण विश्वव्यापी रिपब्लिकन तत्वज्ञानापुढे तत्वज्ञानशून्य पोकळ बहुजनवाद तुलनात्मक दृष्ट्या हाताळण्यास घेणे म्हणजे शुद्ध मूर्खपणाच होय. तेव्हा तो आपणांस निरर्थक, भ्रामक, वैमनस्य निर्माण करणारा वाटत असेल तर त्यात नवल ते काय ! नाही का? आपल्या मुद्द्यांनाही मुद्देसूद उत्तर देण्याचा एक लहानसा प्रयत्न.
आपल्या लेखात नमूद केल्याप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ही आपणांस डॉ. बाबासाहेबांची संकल्पना वाटते जी त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या महापरिनिर्वाणोपरांत दि. ३/१०/१९५७ ला स्थापन केली म्हणून ! मी आपल्या या सामान्य ज्ञानाविषयी (GK) प्रश्नचिन्ह निर्माण करावा इतका मोठा मुळीच नाहीये. परंतु काही प्रश्न मात्र उपस्थित करण्याइतपत लहानपण नक्कीच आहे. त्या अनुषंगाने आपणास विचारावेसे वाटते ते असे की पक्षाची स्थापना होणे म्हणजे नेमके काय? किंवा पक्षाची स्थापना करण्याची पद्धत नेमकी असते तरी कशी? याची उत्तरे आपण द्यायला प्रत्यक्षात समोरासमोर असते तर बरे झाले असते. परंतु तसे नसल्यामुळे एक जिज्ञासा म्हणून ती उत्तरे कोणी शोधावयास हाती घेतली तर बाबासाहेबांनी आम्हाला संकल्पना दिली की रिपब्लिकन पार्टीची स्थापना करून तिच्या तत्वज्ञानासकट ती आम्हाला दिली ही बाब आपल्याला स्पष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आपल्या म्हणण्यानुसार, ” मग कुठलेच प्रश्न विचारण्याची गरजच राहत नाही..वादच संपतो.”
यासाठी SCF या आपल्या राजकीय पक्षाची स्थापना कशी झाली हे थोडक्यात समजून घेऊ या म्हणजे पक्षाची स्थापना कशी केल्या जाते हे आपल्या लक्षात येईल. अखिल भारतीय बहिष्कृत वर्गाची परिषद ( The All India Depressed Classes Conference ) दिनांक १८, १९, २० जुलै १९४२ रोजी मोहन पार्क (सध्याचे कस्तुरचंद पार्क मैदान) नागपूर येथे भरविण्यात आली होती. त्यातील १८ जुलै १९४२ चा मजकूर खालीलप्रमाणे लिहिलेला आहे. The Subjects Committee of the Third All-India Depressed Classes Conference, consisting of all the delegates, met at 9 p.m. in the hall of the Mohan Par Hotel, with the President, Rao Bahadur N. Shivraj in the Chair and discussed the draft resolutions. After a session lasting for four hours, the Subjects Committee unanimously agreed upon the resolutions to be placed before the open session of the conference. याचा अर्थ कार्यकर्त्यांच्या बैठकीत आधी काही ठराव पास केल्या गेलेत. त्याला Subjects Committee’s Sittings असे संबोधल्या गेले.. ती बैठक रात्री ९ वाजता सुरु झाली आणि ४ तास चालली..म्हणजे मध्यरात्री १ वाजेपर्यंत…आणि त्यातून काही निश्चित असे ठराव पास करण्यात आले. हे अगदीच स्पष्ट होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ जुलै १९४२ ला सकाळी १० वाजता राव बहादूर एन शिवराज याच्या चेअरमनपदी ( In the Chair) परिषदेची सुरुवात झाली. त्यांनी घोषणा केली कि, Subjects Committee ने एकूण पाच ठराव पास केलेले आहेत..जे परिषदेतील जनतेपुढे मांडण्यात आले आणि त्यातील ५ व्या क्रमांकाचा ठराव हा खालीलप्रमाणे आहे…Resolution V : Establishment of All-India Scheduled Castes Federation. ( उर्वरित ठरावातील मजकूर खंड 17, भाग 3 मध्ये वाचून घ्यावा.)…याला ‘पक्षाची जनतेसमक्ष घोषणा’ असे संबोधल्या जाते …यानंतर या पक्षाची निवडणूक आयोगाकडे पक्षघटना सादर करून रीतसर नोंदणी झाली. ….हे आपणा सर्वांना सुपरिचितच आहे तरीही आपण मात्र SCF ची स्थापना १९ जुलै १९४२ ला झाली असेच म्हणण्याचा प्रघात आहे. ह्याच धर्तीवर बहिष्कृत हितकारिणी सभेचेही आहे. (दि.९ मार्च १९२४ ला ठराव आणि दि.२० जुलै १९२४ ला जाहीर घोषणा करणे) अगदी तसेच ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ विषयी सुद्धा त्याच परीने झालेले आहे.
मित्रांनो एक गोष्ट मला नेहमीच बोचणारी आहे ती अशी कि, “बाबासाहेबांची RPI हि एक संकल्पना होती.” असे म्हणणे किती मूर्खपणाचे आहे…अरे बाबासाहेबांनी स्वतः आपल्या SCF च्या कार्यकारिणीच्या बैठकीत (ज्या कार्यकारिणीतील बाबासाहेबांच्या तालमीत वाढलेल्या 17 सदस्यांपैकी एकाही व्यक्तीच्या पायाच्या धूळचीही साधी बरोबरी चांगले-चांगले करू शकले नाहीत आजवर हे विशेषत्वाने लक्षात न घेता उदोउदो करणाऱ्यांनो हे विसरू नका.) त्यांच्यासमक्ष दि. 30 सप्टेंबर 1956 ला SCF ला बरखास्त करून RPI ला जन्म दिला. हा इतिहास जिवंत असतांनाही आम्ही अज्ञानीपणा डोक्यात घेऊन कुठपर्यंत बोलत राहणार.. तेव्हा ती फक्त संकल्पना होती असे म्हणणे बालीशपणाचेच होणार नाही काय?
कुठल्याही पक्षाच्या स्थापनेची एक निश्चित पद्धत असते..
1)सर्वप्रथम केंद्रीय कार्यकारिणी चा ठराव होतो. (दि. 30 Sept 1956)
2) नंतर तिची रीतसर जनसभेमध्ये जाहीरपणे घोषणा होत असते. (दि. 3 Oct 1957 दीक्षाभूमी नागपूर)
आता वरील विवेचनावरून हे स्पष्ट होईल कि ज्या दिवशी जनसभेपुढे पक्षाची घोषणा केल्या जाते त्या दिवसाला पक्ष स्थापना दिवस म्हणण्याचा प्रघात आहे…तेव्हा ३ ऑक्टोंबर १९५७ हा लोकमान्यतेनुसार त्यास पक्ष स्थापना दिवस म्हणण्याचा प्रघात सुरू झाला. हे सुज्ञ व अभ्यासू जनतेने लक्षात घ्यावे. आमचे दुर्दैव असे कि त्या दिवशी बाबासाहेब हयात नव्हते. परंतु त्यांच्या रिपब्लिकन तत्वज्ञानाने ते आमच्यात सदैव वास करीत आहेत. तेव्हा रिपब्लिकन पार्टी ची स्थापना झाली की नाही या संभ्रमात असणाऱ्यांच्या बुद्धीची खरोखरच कीव करायला हरकत नाही.
आता खरे तर आपण मांडलेल्या लेखातील पुढील मुद्द्यांवर काही बोलण्याची, लिहिण्याची गरजच नाहीये परंतु नंतर परत हुकी येण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून काही बाबींचा खुलासा करावासा वाटतो.
रिपब्लिकन (Republican) म्हणजे गणराज्यवादी किंवा गणतंत्रवादी या अर्थांने आपण जो त्याचा अर्थ मांडलेला आहे तो खरे तर तेवढ्यापुरताच मर्यादित नसून खऱ्या अर्थाने वरवर भासणाऱ्या जगातील इतर रिपब्लिकन म्हणविणाऱ्यांपेक्षा बाबासाहेबांना अभिप्रेत अतिशय व्यापक आणि मानवी जीवन दुखमुक्त करण्याच्या तत्त्वज्ञानावर आधारित असलेला त्यांच्या सम्यक दृष्टीतील रिपब्लिकनवाद होय. हे आपण विसरता कामा नये. ज्याप्रमाणे जगाच्या पाठीवर अब्राहिम लिंकंन यांनी लोकशाहीची केलेली व्याख्या ” Of the People, By the people, For the People ” (लोकांची, लोकांसाठी, लोकांद्वारे चालविली जाणारी शासनपद्धती) अश्याप्रकारे केली आहे जी सर्वश्रुतच आहे. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवी जीवनाला खरा आयाम देणारी लोकशाहीची जी समर्पक व्याख्या केली आहे ज्यात ते म्हणतात ” लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात रक्तपाताशिवाय क्रांतिकारक बदल घडवून आणणारी शासनपद्धती म्हणजे लोकशाही.” अश्याप्रकारे केली आहे. या दोन महापुरुषांच्या व्याख्यांकीत बाबी जरी आपण उदाहरणादाखल तपासल्यात तर आपल्या असे लक्षात येईल की या दोन्हीही व्याख्या जरी लोकशाहीच्याच असल्या तरीही बाबासाहेबांनी लोकशाहीची केलेली व्याख्या ही सर्वसमावेशक आहे, व्यापक आहे, मानवी जीवनाच्या दुःखाला हात घालणारी आहे. अगदी त्याचप्रमाणे रिपब्लिकनवादाची मांडणी करतांना बाबासाहेबांनी त्याला जो तत्वज्ञानाचा आधार दिला आहे त्या रिपब्लिकनच्या सात तत्वांना (समान न्याय, स्वविकास, स्वातंत्र्य, समान संधी, दास्यत्व- भूक-भय यांपासून मुक्ती, पिळवणूक व दडपणूकशाही यांपासून मुक्ती, संसदीय लोकशाही) जोवर आम्ही समजून घेणार नाही, त्यास मानवी मूल्य म्हणून स्वीकारणार नाही, त्याप्रमाणे जगणार नाही तोवर रिपब्लिकनवाद उमगणे जरा कठीणच आहे. सर्वसामान्य जनतेत आपल्या म्हणण्यानुसार रिपब्लिकनवाद म्हणजे प्रातिनिधिक पद्धतीचे सरकार चालविण्यासाठी समविचारी लोकांचा समूह एकत्रित येऊन स्वतःकरिता एक शासन व्यवस्था निर्माण करतो, अंगीकार करतो त्यालाच रिपब्लिकनवाद समजणे हे साहजिकच आहे. जसे अब्राहम लिंकन च्या लोकशाही च्या व्याख्येचे आहे तसेच रिपब्लिकनवादाविषयी सुद्धा सर्वदूर असलेला समज म्हणून त्यास कदाचित मान्यताही देता येईल परंतु बाबासाहेबांनी मांडलेला सर्वसमावेशक, मानवी दुखमुक्तीचा राजमार्ग म्हणून ज्याला म्हणता येईल त्या तत्वज्ञानाधारीत रिपब्लिकनवादात आणि सर्वसामान्य जनतेत समज असलेला रिपब्लिकनवाद कसा अंतर राखून आहे हे आपल्याला त्या सात तत्वांच्या सूक्ष्म अवलोकनातून ज्ञात झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आपल्या मुखातून जर त्याच्या सर्वश्रेष्ठत्वाचे चार शब्द पडत नसतील तर झोपेचे सोंग घेतल्याच्या अवस्थेची आम्हास आठवण झाल्याशिवाय राहणार नाही..रिपब्लिकन पार्टी साठी बाबासाहेबांनी लिहिलेली ती सात तत्वे म्हणजे जणू काही रिपब्लिकनवादाचे ते सप्तरंगच होत !
रिपब्लिकन पार्टी च्या घटनेला या समाजात रुजविण्यात आंबेडकर अनुयायी मागे पडलेत आणि त्याचाच परिणाम असा झाला की एका उच्च कोटीच्या तत्वज्ञानापासून हा समाज आजवर दूर सारल्या गेला. जसे भन्ते नागसेन यांनी धम्माच्या ऱ्हासाची जी तीन कारणे दिलीत त्यातील एक कारण असे की जर का धम्म तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करणारी विद्वान माणसे नसतील तर त्याचा ऱ्हास होतो. अगदी त्याच धर्तीवर रिपब्लिकन तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करणारी प्रशिक्षित कार्यकर्ते मागील पिढीद्वारे हव्या त्या प्रमाणात निर्माण न होऊ/करू शकल्या कारणाने एका सर्वश्रेष्ठ अशा तत्वज्ञानाला ऱ्हासाची झळ लागली आणि त्याचीच परिणीती म्हणचे वरवर रिपब्लिकन पार्टी ची म्हणविणारी आणि अंतर्गत हुकूमशाहीचा पुरस्कार करणारी काही शकले आपण उद्धृत केलेली आहेत. तेव्हा आम्ही आपणांस हेच सांगू इच्छितो की रिपब्लिकन पार्टी ची गाडी चालविणारी माणसे अयोग्य असू शकतात परंतु ती रिपब्लिकनची गाडी मात्र भक्कम व मजबूत अशा तत्त्वज्ञानाच्या तांत्रिक पायावर आधारभूत आहे. तेव्हा आज ना उद्या अशा सोंगाड्या गाडी चालकांना (नेत्यांना) हा समाज त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही आणि तिची सूत्रे आपल्या हाती घेतल्याशिवाय राहणार नाही एवढा आत्मविश्वास मात्र आम्हाला तरी निश्चितच आहे.
बहुजनवादाविषयी बोलायचे झाल्यास एक मात्र हमखास ते असे की बहुजनवादाचा उदोउदो करणाऱ्या मंडळींना आवर्जूनपणे बुद्धाची आठवण झाल्यावाचून/केल्यावाचून ते राहत नाही. असे असतांनाही बुद्धाने सांगितलेला धम्ममार्ग कितीही योग्य असला तरी तो प्रत्यक्षात अंगिकारण्याची ताकद मात्र यांच्या मनगटात का निर्माण होत नसावी हे एक मोठेच न सुटणारे कोडेच झाले आहे. याला काही अल्पजन अपवाद असू शकतात पण बहुजन मात्र नक्कीच नाहीत. असेच खेदाने म्हणावे लागते. बुद्धधम्म अनुसरून करण्यासाठी बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे हिंदू धर्माच्या रोगट जातीय मानसिकतेला त्यागून धर्मांतराद्वारे आपण आपल्या आयुष्याची दुखमुक्त-स्वाभिमानी वाटचाल करावी हे तत्व तर फार दूर परंतु साधे राजकारणात समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाचे तत्व मान्य आहे असे म्हणणाऱ्यांनी बुद्धाला आपलेसे करू नये..बुद्धाला राजकारणात जागा देऊ नये आणि बहुजनवादाचा उगम बुद्ध तत्वज्ञानात आहे असे भासवून समाजाची शुद्ध फसवेगिरी करावी हे कोणत्या आंबेडकरी अनुयायांस योग्य वाटत असावे हेच कळेना. ज्या बहुजनवादाचा मुळात पायाच जातिआधारीत आहे आणि बाबासाहेबांचे Caste is the mother of all the problems असे स्पष्ट सांगणे असतांनाही आम्ही तिलाच अधिकाधिक बळकट करण्यासाठी जाती जोडो च्या माध्यमातून धडपडतो ह्यास शोकांतिका म्हणू नये तर आणखी काय म्हणायचे?
बरं, बुद्धाने सांगितलेल्या बहुजन हिताय बहुजय सुखाय बद्दल बोलतांना बहुतेक आमच्या आकलनाचा कल हा बहुसंख्य लोक याकडेच जातो..एका अर्थाने ते बरोबर असेलही परंतु काय बुद्धाला स्वतः बहुसंख्य लोक असा त्यातून अर्थ अभिप्रेत असावा काय? ज्या बुद्धाने जगात दुःख आहे (There is suffering in the world-Ref.The Buddha & His Dhamma) आणि दुःखमुक्ती साठी मार्ग (अष्टांगिक) आहे हे शोधून काढले. तेव्हा बुद्धाचा कल हा जगातील सर्व मानवप्राण्यांच्या दुःख मुक्ती साठी काय मार्ग असू शकतो यांकडे नव्हता असे कोणी म्हणू शकेल काय? की फक्त जगातील बहुसंख्य लोकांनाच दुःख असते आणि इतर अल्पसंख्य लोकांना मात्र ते नसते असे कोणी समजावे काय? याबाबतीत बाबासाहेब धम्माचे महत्व पटवून देतांना म्हणतात की, “श्रीमंत माणूस दुःखी जरी नसला तरी तो असुखी असतो.”(Vol.18/3) याचा अर्थ बुद्धाने सांगितलेला दुःखमुक्तीचा मार्ग हा गरीब-श्रीमंत, दिनदुबळ्या दुखी साऱ्या मानवजातीच्या हितासाठी आहे. त्यातच सर्व मानवप्राण्यांचे हित व सुख (बहुजन हिताय बहुजन सुखाय) सामावलेले आहे. तेव्हा बहुजन या शब्दाची व्याप्ती ही जगातील सर्व मानवजातीला कवेत घेणारी आहे. ती काही फक्त बहुसंख लोकांपुरतीच मर्यादित नाहीये. यांवर अधिक प्रकाश पडण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेल्या पाली शब्दकोषाचाही आपणांस आधार घेता येईल ज्यात पाली शब्द बहुजनो (बहु+जन) : most people, multitude, The world, mass of people, crowd. (संदर्भ Vol.16/page 68) या अर्थाने स्पष्ट केले आहे. तेव्हा बुद्धाने सांगितलेला बहुजन हिताय बहुजन सुखाय हा जगातील सर्व मानवजातीच्या हितासाठी, सुखासाठी आहे. तो काही फक्त विशिष्ट वर्गसमूहासाठी नाही. हे लक्षात घेतल्यास आजघडीला बहुजनवादाचा उदोउदो करणाऱ्यांनी बुद्धाने उपदेशिलेल्या जगव्यापक शब्दाला संकुचित करून जाती आधारित मानसिकतेला (SC+ST+OBC=85% चे गणित मांडून) कसा दुजोरा दिला आहे हे सुज्ञ आंबेडकरी बौद्ध अनुयायांच्या लक्षात आल्याखेरीज राहणार नाही.
दुसरे असे की बहुजन या शब्दाविषयी सांगायचे झाल्यास ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर चळवळीचा अभ्यास करतांना ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मणेतर चळवळ खांद्यावर घेणाऱ्या लोकसमूहाचा जो विशेषकरून भरणा आहे त्यांना बहुजन म्हटल्या जाते आणि अशा ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मणेतर बहुजनांनी चालविलेली चळवळ ही बहुजनांची चळवळ होय. यासाठी भारतीय जनता पार्टी चे सरचिटणीस राहिलेले स्मृतिशेष प्रमोद महाजन यांनी 2005 ला दिलेल्या एका वृत्तवहिनीतील (E-tv मराठी channel-Youtube) मुलाखतीचे बारकाईने निरीक्षण केले तर आपणांस अधिक खुलासा होऊ शकेल. सांगण्याचे तात्पर्य असे की बहुजनवादाला आंबेडकरी अनुयायांच्या गळी उतरवून त्यांची मागील चार दशकांपासून जी फसवणूक सुरू आहे, जी दिशाभूल करण्यात येत आहे त्यापासून रोखण्यासाठी या फसव्या बहुजनवादाची त्यांना जाणीव करून देणे (शिकवा, चेतवा आणि संघटीत करा) हे एक आंबेडकरी बौद्ध अनुयायी म्हणून समाजबांधवप्रति असलेल्या कर्तव्याखातर प्रत्येक जाणकार सुज्ञ व्यक्तीने ती इतरांना करून देणे अगत्याचे आहे.
वरील विवेचनावरून आपण उपस्थित केलेल्या प्रश्नाचे आपणास उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही ज्यात आपण रिपब्लिकन संकल्पना (आपल्या म्हणण्यानुसार) आणि बहुजन समाज निर्माण करण्याचा संकल्प वा प्रयत्न यात विरोधाभास कुठे आहे? अशी विचारणा केली होती. आता आपणच स्वतः हे ठरवावे की आम्हाला ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मणेतरांची बहुजन चळवळ पुढे राबवायची आहे की बाबासाहेबांनी दिलेली बुद्धकाळातील तत्वज्ञानाधारीत वैचारिक रिपब्लिकन चळवळ राबवायची आहे? बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणोपरांत उभ्या राहिलेल्या गौरवशाली रिपब्लिकन चळवळीला उतरती कळा लागलेली असतांना बघून तिला सावरण्यासाठी पुढाकार न घेता उलट रिपब्लिकन चळवळीच्या द्वेषावर आणि गोबेल्सच्या खोट्या मुद्यांबाबत वारंवारितेने करण्याच्या प्रचार तंत्राचा वापर करून ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मणेतरांची बहुजन चळवळ उभी करू इच्छिणाऱ्यांचे आजच्या त्यांच्या उध्वस्त झालेल्या वास्तविकतेवरून चांगलेच डोळे उघडले असावेत आणि आपण केलेल्या पापाचे किमान प्रायश्चित म्हणून त्यांनी आतातरी रिपब्लिकन चळवळीकडे मार्गक्रमण करून परिमार्जन करण्यात धन्यता मानली तर बरे होईल. अशी आमची त्यांना समाजबांधव म्हणून नम्र विनंती आहे. गरज भासल्यास पुन्हा लेखणी चालवूच ! तूर्तास एवढ्यावर आपले समाधान होईल या अपेक्षेने..
जय भीम जय रिपब्लिक भारत
आपला नम्र,
प्रशिक आनंद
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया,
दीक्षाभूमी नागपूर.