# चळवळीचा वृक्ष वाढवावयाचा असेल तर #
Post by : Prashik Anand
मी आधी मुळं की झाड यावर विचार केल्यावर मला असे आढळले की ज्याला आपण वृक्ष (tree) म्हणतो त्यात एकंदरीत दोन भागांचा समावेश होतो..एक अधोगामी (downward-intangible) दिशेने होणारी वाढ ज्याला आपण मुळे (roots) म्हणतो तर दुसरे ऊर्ध्वगामी (upward-tangible) दिशेने होणारी वाढ ज्याला आपण पालवी-खोड (leaves-trunk) असे म्हणतो. ही दोन्ही दिशेने होणारी वाढ एकमेकांना पूरक असते. नुसती मुळे वाढत असतील पण पाने-खोडे मात्र अजिबात वाढत नसतील तर ती एकंदरीत वृक्षाची वाढ होते आहे असे म्हणता येणार नाही. याऊलट जितकी सुदृढ वाढ मुळांची होत असेल तर तितकीच ती पानांची-खोडाचीही व्हायलाच हवी. तसे होत नसेल तर तो वृक्ष खुंटणार.. माझ्या माहितीप्रमाणे नुसता मुळांवर प्रयोग करून काही माळी (gardener) वृक्षांचा बोन्साय करतात. आपल्या चळवळीचाही बोन्साय होऊ नये यास्तव आपल्या चळवळीच्या मुळांना, पान-खोडांना दोन्ही दिशांनी नैसर्गिक रित्या वाढू देण्यातच चळवळीचा वटवृक्ष होण्याची परिपूर्ण शक्यता आहे. फक्त ती मुळे आणि पाने-खोडे यांनी एकमेकांशी योग्यरीतीने समन्वय साधून आदानप्रदान-जसे पानामुळांच्या बाबतीत पाणी, जीवद्रव्य इत्यादी (संघटनेच्या बाबतीत सहकार्य व साहचर्य) करून आपापल्या सुदृढ वाढीकडे लक्ष द्यायला हवे. ज्यांना चळवळीत मुळांची भूमिका वठवावी असे वाटते त्यांनी निश्चितच ती भूमिका वठवावी आणि ज्यांना पानांची-खोडांची भूमिका वठवावीशी वाटते त्यांनी ती वठवावी.
मुद्दा असा आहे की पाने-खोडांची भूमिका वठविणाऱ्यांनी हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे की मुळांकडून जोवर पाणी त्यांच्या पर्यंत पोहोचणार नाही तोवर ते हरितद्रव्य-अन्न (chlorophyll) तयार करू शकणार नाही आणि मुळांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की जोवर त्या वृक्षाला फुले-फळे लागण्यासाठी त्यांचा उपयोग होणार नाही तोवर त्यांच्या असण्याला काहीच अर्थ उरणार नाही. तेव्हा चळवळीचा वृक्ष वाढवावयाचा असेल तर त्याच्या दोन्ही बाजूंचा सारखाच विचार समांतर परीने व्हावयास हवा. ह्यातच बुद्धाच्या नैसर्गिक सिद्धांताचाही समावेश असलेला आपणांस दिसेल. शरीर (tangible) व मन (intangible) या दोन्ही बाबी अनुक्रमे सुदृढ व सुसंस्कृत (अष्टांगिक मार्गाने) असल्यास दुखमुक्तीकडे निश्चित वाटचाल होणारच यांत शंका घेण्यासारखे काहीही असू शकत नाही. फक्त एकाच बाजूने वाढ होण्याकडे लक्ष पुरविणे एकंदरीत (pychosomatic) आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते. एवढंच याप्रसंगी मला येथे नमूद करावेसे वाटते. लेखनाच्या मर्यादा लक्षात घेता हा विषय मला येथे व्हाट्सअप्प वर आपणांस लेखनातून फारसा पटवून देता येत नसल्यास त्याबद्दल क्षमस्व !
धन्यवाद. जयभीम?