श्रद्धा कि अंधश्रद्धा


–जनविचारार्थ जारी–

? श्रद्धा कि अंधश्रद्धा?

A post written by
-Prashik Anand-

( The Buddhist Society of India, Nagpur.)

जय भीम मित्रांनो ?

|| बुद्धम सरणं गच्छामी
धम्मम सरणं गच्छामी
संघम सरणं गच्छामी ||

प्रथम ‘बुद्धम सरणं गच्छामी’ भागाविषयी बोलायचे झाल्यास (मी) बुद्धाच्या आश्रयास (refuge) जातो. म्हणजेच प्रज्ञा (सद्सदविवेकबुद्धी) च्या आश्रयास जाणे..आणि ज्याअर्थी आपण सद्सदविवेकबुद्धीच्या आश्रयास जातो त्याअर्थी आपण ‘श्रद्धा’ या भावनेला मानने किंवा त्यावर विश्वास ठेवणे चुकीचे ठरते कारण श्रद्धा हि अंधश्रद्धाच होय. Faith is always blind.
एखाद्या गोष्टीबाबत आपली श्रद्धा असणे म्हणजेच आपली त्याविषयी अंधश्रद्धा असणे होय असे माझे व्यतिगत मत आहे.
बौद्ध धम्मात श्रद्धेला  कशा स्वरूपाचे स्थान आहे, याचे थोडक्यात विवरण करणारे एका पुस्तिकेतील एक उतारा सन्मित्राने लक्षात आणून दिला होता तो पुढीलप्रमाणे..

” विचिकित्सा ( विचिकिच्चा) म्हणजे कुशंका होय. बुद्धाच्या  आणि बुद्धत्वाच्या सत्यतेविषयी आणि ते याच जन्मी स्वप्रयत्नांनी सर्वदु:खमुक्त होऊन बुद्ध झाले याविषयी मनात कोणतीही शंका न राहणे. बुद्धांनी कोणतीही काल्पनिक गोष्ट न सांगता केवळ आपल्या दुःखमुक्तीचा स्वानुभवच जगाला उपदेशिला. तोच त्यांचा धम्म होय. त्याचे पालन केले तर प्रत्येक माणूस बुद्धांसारखाच दुःखमुक्त होऊ शकतो, हे त्यांनी आजमावून पाहण्याची प्रेरणा दिली. ही त्या धम्माची योग्यता आहे. याविषयी मनात कोणतीही शंका न राहणे आणि त्या धम्ममार्गाचे पालन करून जगाला उदाहरण घालून देणाऱ्या तथागत बुद्धांनी निर्माण केलेल्या संघाविषयी कोणतीही शंका मनात न राहणे, याला कुशंकारहित मानसिकता म्हटले आहे. विचिकित्सारहित मानसिकता असे म्हटले आहे. त्यामुळे धम्ममार्गावरील वाटचाल ठाम निश्चयाची बनते. धम्माचरणाला ठोस अधिष्ठान लाभते. थोडक्यात, बुद्ध, त्यांचा धम्म आणि संघ यांच्या सत्यतेप्रती आणि त्यांच्या उपयोगितेविषयी सर्व शंका -कुशंकापासून मुक्त होणे म्हणजे विचिकित्सेपासून मुक्त होणे होय. यातून बुद्ध, धम्म आणि संघाप्रती ठाम अशी डोळस श्रद्धा निर्माण होते. या श्रद्धामय चित्ताच्या अवस्थेला बुद्धांनी मनुष्याचे  सर्वश्रेष्ठ असे श्रद्धा -धन म्हटलेले आहे. (‘सद्धिद्ध वित्तं पुरिसस्स सेट्ठं’). अशा प्रकारे श्रद्धेने योग्य प्रकारे केलेले धम्माचरण सर्वसुखदायी असते, असे सांगितले आहे.”

वरील एका पुस्तिकेतून विशद केलेल्या विचिकित्सा (विचिकिच्चा) म्हणजेच कुशंका याला धरून हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे कि बुद्ध, बुद्धत्व, धम्म आणि संघ या सर्व बाबी बुद्धांनी दुखमुक्तीचा मार्ग म्हणून स्वानुभवावर आधारीत सांगितलेला आहे, जगाला उपदेशिला आहे आणि तोे जगप्रसिद्धही आहे. तेव्हा आम्ही त्या सर्व बाबी स्वानुभवाने तपासून न बघता फक्त बुद्धांनी सांगितल्या आहेत, त्यांनी दुखमुक्ती अनुभविली आहे म्हणून आम्हीही त्यांचेप्रती फक्त श्रद्धाभाव आहे म्हणून अनुसरण करणे हि माझ्या मते अंधश्रद्धा होय. कारण तथागत बुद्धांनी स्वत: याविषयी कालामांना केलेल्या धम्मोपदेशात असे सांगितले आहे कि, ” फक्त मी म्हणतो म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका, तर त्या सर्व बाबी तर्क लावून बुद्धीच्या कसोटीवर तपासून पहा आणि जर त्या खऱ्या उतरल्यात आणि आपल्या भल्यासाठी वाटत असतील तरच त्याचा स्वीकार करा.*” यावरून हे स्पष्ट होते कि तपासणी करण्यापूर्वीची मानसिकता हि संभ्रमावस्थेची असते. हि मानसिकता, हि भावना सांशक असते म्हणजेच दुसऱ्या शब्दात  तपासणी न करता एखादी गोष्ट मान्य करणारा ‘श्रद्धाभाव’ होय. केवळ श्रद्धेपोटी एखाद्यास झालेला फायदा अगर तोटा आपणासही होईलच असे गृहीतक धरणे योग्य नवहे. इतकेच नव्हे तर बुद्धांनी आम्हास एक नवा शब्द दिलाय…शोध ! श्रद्धा नव्हे, शोध…Discovery..श्रद्धेचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीतील सत्य शोधण्यापूर्वी तिला मानायला सुरुवात करणे..श्रद्धेचा अर्थ होतो मानने प्रथम, शोधणे नंतर..परंतु बुद्ध म्हणतात, जर का आधीच मानून घेतलंय तर मग शोध कसा घेणार? असे असेल तर मग ते मानने हेच एक अडथळा म्हणून पुढे येईल आणि शोधणे चा अर्थ तर हा आहे की आमचे डोळे उघडे असावेत, कुठलीच मान्यतेची धारणा मनात असू नये, कुठलाच पक्ष अपक्ष न मानता ! शोध याचा अर्थबोध तर फक्त इतकाच असावा कि मला माहित नाही आणि मी माहित करून घेण्यास इच्छुक आहे.

जोवर त्याच्या सत्यासत्येची तपासणी व्यक्तिपरत्वे होत नाही तोवर ती श्रद्धा हि अंधश्रद्धाच असते असे माझे स्पष्ट मत आहे. आणखी महत्वाचे असे कि बुद्धकाळापासून आजवर झालेल्या एकूण जवळपास २५०० वर्षापेक्षाही अधिकच्या कालखंडात बुद्धधम्म आणि त्यातील तत्वज्ञान यांत बरीच भेसळ, सरमिसळ झालेली आपणास पहावयास दिसते आणि म्हणूनच बाबासाहेबांनी तब्बल पाच वर्षे खर्ची घालून बुद्धीच्या कसोटीवर तपासून, तर्काधारीत लिहिलेला ‘The Buddha and his Dhamm.’ हा शास्त्रशुद्ध ग्रंथ समाजास दिला आणि त्यात दिशानिर्देशीत केल्याप्रमाणे बुद्धांचा खरा धम्मोपदेश कोणता हेही प्रतिपादित केलेले आहे. वाचकांनी त्या ग्रंथाकडे वैज्ञानिक दृष्टीने, बाबासाहेबांसारख्या सम्यक नजरेतून त्याकडे बघायला सुरुवात केली की आपणांस सत्याचा मार्ग गवसल्याखेरीज राहणार नाही एवढे मात्र निश्चित !
दि. 13/08/2016 (पुनर्लेखन).

(टीप: विचिकित्सा याविषयी एका पुस्तकातील मजकूर मला विशद केलेल्या आदरणीय सन्मित्राचे आभार.)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.