स्वतंत्र भारताचे भवितव्य : एक दृष्टिक्षेप


? स्वतंत्र भारताचे भवितव्य : एक दृष्टिक्षेप? ?? स्वातंत्र्य दिना निमित्त ??

A post written by
-Prashik Anand-
( समता सैनिक दल, HQ, दीक्षाभूमी, नागपूर)

–जनविचारार्थ जारी–

जय भीम मित्रांनो ?
आपण सर्व भारतीयांना 70 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक सदिच्छा !! आज देशाला स्वातंत्र्य मिळवून सत्तर वर्षे लोटली आहेत. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आजपासून 97 वर्षापूर्वी 1920 ला सुरु करण्यात आलेल्या आपल्या मूक-नायक मधील लेखात जे वक्तव्य केले होते त्यावरून त्यांच्या दूरदृष्टीची आपणास कल्पना येईल..ते म्हणतात, “भारताला नुसते राजकीय स्वातंत्र्य असणे हे पुरेसे नाही तर भारताला राष्ट्र होण्यासाठी ज्याची गरज आहे ते म्हणजे तिच्या नागरिकांना धार्मिक आणि राजकीय अधिकार असणे होय कि जेणेकरून प्रत्येक व्यक्तीस विकासाची समान संधी असेल.”  (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी साठी लिहिलेल्या जगातील सात सर्वश्रेष्ठ तत्वांपैकी समान संधी हे पहिल्या क्रमांकाचे तत्व होय.*) आजघडीला आपल्या देशाला स्वातंत्र्य जरी मिळाले असले तरी काय आम्ही खरेच सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या या देशात स्वतंत्र झालो आहोत काय यावर प्रत्येकाने नुसते विचारमंथन न करता त्यावर उपाययोजनात्मक दृष्टीने पाऊल उचलणे हि अतिशय महत्वाचे आहे.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या देशाला संविधानिक मार्गाने लोकशाही मुल्ये प्रदान करून बाबासाहेबांनी या देशाची पायाभरणी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय यावर आधारभूत घटनेच्या रूपाने करीत असतांना दि. 25/11/1949 ला संविधान सभेतील आपल्या शेवटच्या भाषणात आम्हास काही महत्वाच्या गोष्टी आवर्जुनपणे अगदीच बजावून सांगितलेल्या आहेत. ते म्हणतात, “भारताला लोकशाही म्हणजे काय हे माहित नव्हते असे नाही. एक काळ असा होता कि, भारत हा गणराज्यांनी (Republic states)  भरगच्च होता आणि जिथे कुठे राजेशाही असेलच तर एकतर निवडलेली किंवा सीमित असायची. त्या प्रणाली कधीही अनिर्बंध नव्हत्या.” पुढे ते सांगतात कि, “बौद्ध भिक्खू संघ हे दुसरे काही नसून संसदच होते आणि आधुनिक काळाला परिचित असलेल्या संसदीय कार्यप्रणालीचे सर्व नियम संघाला माहित होते आणि त्याचे ते पालन करीत होते. बसण्याच्या व्यवस्था, विधेयक मांडण्याचे नियम, ठराव, कामकाजासाठी आवश्यक असलेली किमान संख्या, पक्ष प्रतोदाने आदेश काढणे, मतमोजणी, मत पत्रिकेद्वारे मतदान करणे, कपात सूचना, नियमितता, न्यायव्यवस्था इत्यादीबाबत त्यांच्याजवळ नियम होते. संसदेच्या कामकाजाचे हे नियम बुद्धाने संघाच्या सभेसाठी उपयोगात आणले असले तरी देशात त्याकाळी कार्यरत असलेल्या राजकीय विधिमंडळाच्या नियमावलीतूनच त्यांनी (बुद्धांनी) ते स्वीकारले असले पाहिजेत. हि लोकसत्ताक पद्धती (Democratic system) भारताने गमावली. पुन्हा दुसऱ्यांदा तो ती गमावणार काय ? मला माहित नाही, परंतु भारतासारख्या देशात हे सहजशक्य आहे कि, -लोकशाही प्रदीर्घकाळपर्यंत उपयोगात नसल्यामुळे ती अगदीच नवीन भासण्याची शक्यता आहे-जिथे लोकशाहीने हुकुमशाहीला स्थान देण्याचा धोका आहे. हे सहजशक्य आहे कि, नव्यानेच जन्माला आलेली लोकशाही आपले बाह्य स्वरूप सांभाळेल परंतु प्रत्यक्षात ती हुकुमशाहीला स्थान देईल. जर प्रचंड बहुमत असले तर दुसरी शक्यता वास्तवात येण्याचा मोठा धोका आहे.” हे धोके टाळण्यासाठी बाबासाहेब आपणास तीन उपाय योजना सुचवितात.
१.  सदैव संविधानिक मार्गाचाच अवलंब : आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संविधानिक मार्गाचीच कास धरली पाहिजे. क्रांतीचा रक्तरंजित मार्ग आपण दूर सारला पाहिजे. कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह या मार्गांना आपण दूर ठेवले पाहिजे. हे असंविधानिक मार्ग असून ते अराजकतेचे व्याकरण आहे.
२.  स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी राजकारणात व्यक्तिपूजा वा विभूतीपूजा यापासून अलिप्तता : लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये. तसेच त्याच्यावर इतका मोठा विश्वास ठेवू नये कि जेणेकरून त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उध्वस्त करण्यासाठी उपयोग करेल. भारतात भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो किंवा विभूतीपूजा हि जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात दिसणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्ती हि आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल. परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा हि अध:पतन आणि अंतिमत: हुकुमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.
३.  राजकीय लोकशाहीचे सामाजिक लोकशाहीत परिवर्तन करणे : आपण नुसते राजकीय लोकशाहीवर (राजकारणात समता असणे व प्रत्येक व्यक्तीस एक-मत, एक-मूल्य (one man, one vote, one value) हे तत्व कायद्याने लागू असणे होय.) समाधान न मानता आपल्या राजकीय लोकशाहीचे सामाजिक लोकशाहीत परिवर्तन करायलाच (must) हवे. सामाजिक लोकशाही म्हणजे असा जीवनमार्ग जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना जीवनतत्वे म्हणून मान्यता देतो. हि तिन्ही जीवनतत्वे एकमेकांपासून विभक्त करणे, फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देशच पराभूत करणे होय. समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांचे बहुतांश लोकांवर प्रभुत्व निर्माण करणे होय; स्वातंत्र्याशिवाय समता हि वैयक्तिक कर्तुत्वाला मारक ठरेल. बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता स्वाभाविकरीत्या अस्तित्वात राहणार नाही.
या तिसऱ्या धोक्याविषयी आपण अधिक अभ्यासात्मक दृष्टीने समजून घेणे गरजेचे आहे. बाबासाहेब म्हणतात कि, “राजकीय लोकशाही च्या प्रस्थापनेसाठी राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र, सामजिक आणि आर्थिक संरचनेमुळे प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्व आपण नाकारीत राहणार आहोत. असेच जर आपण अधिक कालपर्यंत नाकारीत राहिलो तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. हि विसंगती आपण शक्य तितक्या लवकर दूर केली पाहिजे.” म्हणजे आपल्या देशात सामाजिक लोकशाही नाकारीत न राहता तिच्या प्रस्थापनेसाठी अविरत प्रयत्नरत राहणे हि आपली पहिली गरज होय असे त्यातून स्पष्ट होते. पुढे ते म्हणतात, “आपल्याला गरज असलेली दुसरी बाब म्हणजे बंधुत्वाचे तत्व मान्य करणे ही होय. (The second thing we are wanting in is recognition of the principle of fraternity.) बंधुत्व म्हणजे काय? जर भारतीय लोक एक असतील तर सर्व भारतीयांमध्ये बंधुत्वाची समान भावना असणे हे होय. हे तत्व सामाजिक जीवनाला एकता आणि एकजिनसीपणा प्राप्त करून देते.” बाबासाहेब पुढे म्हणतात कि, “मी या मताचा आहे कि, आपण एक राष्ट्र आहोत यावर विश्वास ठेवणे म्हणजे जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आहे असा समज बाळगण्यासारखे होईल. हजारो जातींमध्ये विभागलेल्या लोकांचे राष्ट्र कसे बनू शकेल. सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या अजूनही आम्ही एक राष्ट्र नाही याची आम्हाला जेवढ्या लवकर जाणीव होईल तेवढे ते आमच्या हिताचे ठरेल. त्यानंतरच एक राष्ट्र होण्याच्या गरजेचे महत्व आम्हाला कळेल आणि आमच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कोणत्या मार्गाचा आणि उपायांचा अवलंब करावा याचा आम्ही गांभीर्याने विचार करू शकू. भारतात समाज जीवनात अस्तित्वात असलेल्या जातींमुळे समाजाची विभागणी झालेली आहे ज्यामुळे जाती जातींमध्ये मत्सर व तिरस्काराची भावना निर्माण होते आणि हि भावना राष्ट्रविरोधी आहे. आम्हाला वास्तवात जर राष्ट्र व्हायचे असेल तर या सर्व अडथळयांवर आम्ही मात केलीच (must) केलीच पाहिजे. राष्ट्र निर्मिती नंतरच बंधुत्व वास्तवात पहावयास मिळेल. बंधुत्वाशिवाय असलेली समता आणि स्वातंत्र्य म्हणजे रंगाच्या वरवरच्या थरांसारखा केवळ बाह्य देखावा असेल…

तेव्हा जीवनाच्या सर्व क्षेत्रात समता आणि बंधुत्व प्रस्थापित करण्यानेच हे शक्य होणार आहे.” स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तिन्ही एकमेकास पूरक तत्वांची सांगड घातल्याशिवाय लोकशाहीला अर्थ उरणार नाही हे त्यांच्या विधानांवरून अगदीच स्पष्ट होते. आपल्या भाषणाचा समारोप करतांना बाबासाहेबांनी जो शेवटचा मुद्दा मांडलेला आहे तो या देशाचे भवितव्य ठरविणारा आहे. हा मुद्दा आम्ही वारंवार वाचवा, तो समजून घ्यावा त्यावर चिंतन मनन करावे..त्यादृष्टीने आम्ही आपली जबाबदारी ओळखून योग्य वाटचाल करावी. नाहीतर या देशात वाईट घडल्याशिवाय राहणार नाही असे त्यातून अगदीच स्पष्ट संकेत बाबासाहेबांनी आम्हा जनतेस दिलेले आहेत. ते म्हणतात, “ स्वातंत्र्य हि फार आनंदाची बाब आहे. याबद्दल शंका नाही. परंतु या स्वातंत्र्याने आपल्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत याचा आपण विसर पडू देता कामा नये. या स्वातंत्र्यामुळे कोणत्याही वाईट गोष्टीसाठी आपल्याला आता इंग्रजावर दोषारोपण करता येणार नाही. यापुढे जर काही वाईट घडले तर त्यासाठी आपल्याशिवाय इतर कुणालाही दोषी धरता येणार नाही. अनुचित घटना घडण्याचा मोठा धोका आहे. काळ वेगाने बदलतो आहे. आपले लोक सुद्धा नवनवीन विचारप्रणालींचा मागोवा घेत आहेत. लोकांच्या राज्यांचा आता त्यांना कंटाळा येवू लागला आहे. आता त्यांना लोकांसाठी राज्य हवे आहे आणि राज्य लोकांचे व लोकांनी निवडलेले आहे किंवा नाही याची चिंता ते करणार नाहीत. ज्या संविधानात आपण लोकांचे, लोकांकरिता निवडलेले शासन या तत्वाचे जतन केले आते ते जर आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल, तर आपल्या मार्गात कोणते अडथळे येणार आहेत ते आपण ओळखले पाहिजेत कि जेणेकरून लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकारला लोक प्राधान्य देण्याकडे वळतील, यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्बल ठरत कामा नये. देशाची सेवा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. दुसरा अधिक चांगला मार्ग मला माहित नाही.”
या शेवटच्या त्यांच्या विधानांना बारकाईने लक्षात घेतले तर हि आमच्यासाठी बाबासाहेबांनी दिलेली धोक्याची सूचना आहे कि संविधानातील लोकांचे, लोकांसाठी, लोकांकडून चालविले जाणारे शासन (संसदीय लोकशाही)  ज्याला इंग्रजीत “ Form of Government Of the people, by the people, for the people.” असे व्याख्यांकित केलेले आहे. (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी साठी लिहिलेल्या जगातील सात सर्वश्रेष्ठ तत्वांपैकी शेवटचे सातव्या क्रमांकाचे तत्व सांगितले आहे ते ‘संसदीय लोकशाही’ चा अवलंब करणे होय. कारण इतर कोणत्याही राज्यपद्धतीपेक्षा ‘संसदीय लोकशाही’ व्यक्ती आणि समाज या दोहोंच्या कल्याणाच्या दृष्टीने सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ राज्यपद्धती होय असे ते सांगतात.) तेव्हा हे उलथून टाकून फक्त लोकांसाठी (Government for the people only where there is no need to consider whether it’s of the people and by the people)  एकप्रकारे हुकुमशाहीला जन्म देणारे सरकार जे व्यक्ती आणि समाज या दोहोंच्या कल्याणाच्या दृष्टीने आणि भारत देशाच्या दृष्टीने घातक राज्यपद्धती होय असे ते आम्हास सूचित करतात आणि सद्यपरिस्थित जनता यालाच प्राधान्य देण्याकडे वळते आहे. तेव्हा मित्रांनो वेळीच जागे व्हा आणि बाबासाहेबांनी डिसेंबर 1955 ला औरंगाबाद येथे सांगितल्याप्रमाणे या “भारत देशाची राज्यघटना खऱ्याखुऱ्या अर्थाने राबविण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष राहणार असून पक्षाचे मुख्य ध्येय समानता, स्वातंत्र्य व बंधुभाव असे राहणार आहे.” असे जगजाहीर करून, त्यासाठी जगातील सर्वश्रेष्ठ रिपब्लिकन ची सात तत्वे (Republican Principles) लिहून दि.30 सप्टेंबर 1956 ला दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी तेव्हाच्या आमच्या श्येडयुल्ड कास्ट फेडेरेशन (SCF) या राजकीय पक्षाला बरखास्त करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आपल्या केंद्रीय कार्यकारिणी समक्ष घेऊन रिपब्लिकन पार्टी ला (RPI) जन्मास घातले कि जेणेकरून त्यांची भारतीय लेकरे या भारत देशाला भविष्यातील उद्भवणाऱ्या धोक्यांपासून वाचविण्यात यशस्वी होतील. परंतु दुर्दैव असे कि आम्ही आमच्या मुक्तीदात्या बापाने आमच्याच भल्यासाठी रिपब्लिकन तत्वज्ञानाची भक्कम पायाभरणी केलेल्या, आमच्या उद्धारासाठी दिलेल्या आपल्या राजकीय पक्षाला पायदळी तुडवून, तिच्या घटनेच्या अंमलबजावणीकडे पाठ फिरवून, जणूकाही लोकशाही मूल्यांना पायदळीच तुडवीत आहोत आणि आपल्या मुक्तीदात्या बापाचा क्षणोक्षणी अपमानच करतो आहोत हे जोवर आमच्या लक्षात येणार नाही तोवर आमच्या स्वातंत्र्याला काहीही अर्थ उरणार नाही. तेव्हा सध्याच्या या दिशाहीन अवस्थेतील मानसिक गुलामगिरीच्या परिघाबाहेर निघून माझ्या समाजबांधवांनी ( विशेषतः बुद्धीजीवी वर्गाने Intellectual  class ने) रिपब्लिकन तत्वज्ञानाची कास धरून या देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यास पुढाकार घ्यावा एवढेच या दिनी आम्हास अपेक्षित !!
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयास हार्दिक सदिच्छा ! ????
दि.15/08/2016
जय भीम जय भारत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.