डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या चळवळी


डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या चळवळी

सप्रेम जय भीम मित्रांनो??
डॉ. बाबासाहेबांनी आपल्या चळवळी ( त्यांनी जन्मास घातलेल्या संघटना इतर संघटना नव्हेत हे विशेष) सदोदित शक्तिशाली ठेवण्यासाठी तीन मुख्य बाबींची गरज असल्याचे सांगितले आहे..त्या म्हणजे पैसा, वेळ आणि बुद्धी या तीन बाबी होत ज्याच्या आधारावर चळवळ उभी राहते. तेव्हा समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या परीने या तिन्ही पैकी किंवा तिन्ही गोष्टी चळवळ भरभराटीत सुरू ठेवण्यासाठी देणे क्रमप्राप्त ठरते आणि हे देत असतांना त्यात कोण्या एकाचे अधिपत्य वा उपकार होता कामा नये याची विशेष दखल घेणे गरजेचे ठरते. (उदा. एखाद्या श्रीमंत व्यक्तीने मी 500 रुपये कार्यक्रमास योगदान देतो म्हटले तर त्यावेजी त्याकडून 499 रुपये घेऊन निदान 1 रुपया इतर समाजबांधवाने त्यात द्यावा आणि एकूण दोन सदस्यांचे मिळून 500 रुपये वर्गणी झाली असे जाहीर करावे. यामुळे त्या कार्यक्रमाला लोकशाहीत्मक स्वरूप प्राप्त होईल अन्यथा मक्तेदारी आणि मी म्हणेल तसा कारभार होतांना दिसू शकतो. तेव्हा जनतेने याची खबरदारी घ्यावी.)

या तिन्ही बाबींपैकी बाबासाहेबांनी दि. 15 ऑक्टोम्बर 1956 ला आपल्या नागपूर येथील भाषणात तर आम्हा जनतेस अशा स्पष्ट सुचनाच दिलेल्या आहेत की, प्रत्येकाने आपल्या मिळकतीचा 20 वा भाग (म्हणजेच उत्पन्नाचा 5 % भाग) हा आपल्या चळवळीस दिला पाहिजे. परंतु गेली काही दशकांपासून अज्ञानापोटी आपले समाजबांधव चुकीच्या चळवळीच्या नादी लागून चुकीच्या संघटनांना या तिन्ही गोष्टींचा पुरवठा करतांना दिसताहेत हि फार मोठी शोकांतिका होय. खरे तर ती एक प्रकारची बाबासाहेबांच्या संघटनांप्रति प्रतिक्रांती म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण बाबासाहेबांच्या पुण्याईने कमावलेले धन आणि मिळविलेली विद्वत्ता, ज्ञान आपला अमूल्य वेळ इतर चुकीच्या संघटनांना देऊन त्यांना मोठे करण्यात जर महानता मिळविल्याचा अविर्भाव असेल तर तो पोकळ भ्रम उराशी बाळगून जगणे म्हणजे बाबासाहेबांच्या चळवळीशी करण्यात येणारी एकप्रकारे बेइमानीच होय असे माझे स्पष्ट मत आहे. तेव्हा बाबासाहेबांनी लिहिलेल्या संघटनेच्या घटनेप्रमाणे सांगायचे झाल्यास असे वर्तन म्हणजे बेशिस्तपणाचे लक्षण होय. तेव्हा मित्रांनो आपण योग्य-अयोग्याची शहानिशा केल्याशिवाय असे कोणतेही पाऊल उचलू नये ज्यामुळे आपल्या मुक्तिदात्या पित्याने चालविलेल्या चळवळीची (बाबासाहेबांनी आम्हास दिलेल्या तिन्ही संघटना- SSD, RPI & TBSI.) आपल्या हातून हत्या होण्यास मदत होईल.
जय भीम.

–समाजहितार्थ जारी–

द्वारा: समता सैनिक दल,
HQ, दीक्षाभूमी, नागपूर.
www.ssdindia.org

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.