? उघडा डोळे वाचा नीट ?
साम्यवाद (Communism) कि बौद्धवाद (Buddhism) ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणतात…?
साम्यवाद (Communism) जी जीवनप्रणाली सांगते त्या जीवनप्रणालीपेक्षा बौद्धधम्माने (Buddhism) सांगितलेली जीवनप्रणाली उत्कृष्ट व सरस आहे, अशी प्रशंसा जो पर्यंत बौद्ध राष्ट्रातील तरुण पिढी करीत नाही तो पर्यंत बौद्ध धर्माचे भवितव्य उज्वल आहे असे म्हणता येणार नाही. बौद्ध धर्मावरील श्रद्धा दोनएक पिढ्याही तग धरू शकणार नाही. यास्तव बौद्ध धर्मावर ज्यांची दृढ श्रद्धा आहे अशा लोकांनी तरुण पिढीस बौद्ध धर्माची महत्ता पटवून देऊन साम्यवादाला बौद्ध धर्मच पर्याय आहे, कींबहुना बौद्ध धर्मच एकमेव सर्वोत्तम जीवनमार्ग आहे असे सांगणे अत्यन्त आवश्यक आहे. ही गोष्ट पटवून दिल्यावरच बौद्ध धर्म टिकवून धरण्याची आशा बाळगता येऊ शकते. आपण हे हि ध्यानात घेतले पाहिजे की, युरोप मधील बहुसंख्याक लोक व आशिया मधील बहुसंख्याक तरुण असा दृष्टीकोन बाळगतात की आजच्या जगात कार्ल मार्क्स हाच केवळ एक पूजनीय महापुरुष किंवा प्रेषित आहे. त्याचबरोबर ते असाही विचार प्रदर्शित करतात की, बौद्ध भिक्खू संघातील फार मोठा भाग केवळ निरुपयोगीच नव्हे तर एक मोठे पिवळे (Yellow peril) संकट आहे. अशा प्रकारची विचारसरणी कश्याचे द्योतक आहे हे भिक्खुनी लक्षात घेतले पाहिजे. तिच्या मागची पार्श्वभूमी त्यांनी समजून घेतली पाहिजे आणि कार्ल मार्क्सशी तुलना केली जाऊ शकेल अशा प्रकारे स्वतःला घडवून घेण्याची त्यांनी पराकाष्ठा करावयास पाहिजे. तेव्हाच बौद्ध धर्माचे श्रेष्ठत्व शाबीत केले जाऊ शकेल.
बौद्ध तत्वज्ञान व मार्क्सवाद किंवा साम्यवाद यातील ठळक वैशिष्टयपूर्ण मुद्दे कोणते आहे या बद्दल आपणास मी विवेचन करून सांगेन. हे विवेचन बुद्धाचे तत्वज्ञान व मार्क्स चे तत्वज्ञान यांच्या आदर्शतील साम्य व भेद ह्या संबधात असेल. जीवनातील उदिष्ट्ये साध्य करण्यासाठी साम्यवादी जीवनमार्गापेक्षा बौद्ध जीवनमार्ग मानवी जीवनाचे ध्येय हस्तगत करण्यात चिरंतन ठरू शकेल किंवा नाही ह्याचाही त्यात उहापोह असेल. जो जीवनमार्ग अल्पकालीन असेल, रानावनांतून भटकविणारा असेल किंवा अराजकतेकडे घेऊन जाणारा असेल अशा जीवनमार्गाचा पाठपुरावा करणे उचित ठरणार नाही. परंतु तुम्हाला अवलंबण्यास सांगितलेला मार्ग जर मंदगतीचा व लांब पल्याचा असेल. तथापि तो खात्रीचा असून सुरक्षित भक्कम पायावर पोहचविणारा असेल आणि तुमच्या आदर्श तत्वांना साहाय्यभूत ठरविणारा व तुमच्या जीवनाला स्थायीभाव देणारा असेल तर तोच मार्ग चोखाळणे न्यायाचे ठरेल. कमी अंतराचा ‘ शॉर्टकट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काटेरी मार्गा पेक्षा मंदगतीचा लांब पल्ल्याचा मार्गच आक्रमन करीत राहणे केव्हाही रास्त असते. जीवनातले ‘शॉर्टकट’ नेहमीच घातकी असतात. नुसते घातकी नव्हे तर महाघातकी असतात हे सतत ध्यानात ठेवले पाहिजे.
मार्क्सच्या साम्यवादी विचारसरणीचा मुलारंभ असा आहे की, ह्या जगात ‘पिळवणूक’ चालली आहे. हि पिळवणूक धनिकांकडून गरिबांची होत आहे. कारण धनिकाला संपत्तीची हाव आहे. त्यांना अधिकाअधिक मालमत्ता हवी आहे आणि त्यासाठी ते जनसमुदाय गुलाम करीत आहेत .हि गुलामगिरी शेवटी यातना, दुःख व गरिबी यांच्या निर्मितीस कारणीभूत होत आहे. हेच मार्क्स वादाच्या प्रारंभाचे मूळ आहे. मार्क्स ह्याने ‘पिळवणूक’ या शब्दाचा उपयोग केला आहे . ही पिळवणूक नष्ट करण्यासाठी मार्क्स ने कोणती उपाययोजना सांगितली आहे ? पिळवणूक होणाऱ्या ह्या एका वर्गाचे दैन्य व दुःख नष्ट करण्यासाठी वैयक्तिक मालमत्तेवर प्रतिबंध घातला पाहिजे असे मार्क्स चे सांगणे आहे. व्यक्तिशः कोणीही मालमत्ता बाळगू नये किंवा धनसंचय करू नये. कारण कार्ल मार्क्स च्या तांत्रिक भाषेत सांगावयाचे झाल्यास असे म्हणता येईल की, कामगारांच्या किंवा मजुरांच्या श्रमशक्ती पासून उत्पादित झालेले अतिरिक्त धन स्वतःच घेणारा किंवा स्वतःच गिळंकृत करणारा हा खाजगी मालमत्तेचा एक मालक बनतो. कामगार आपल्या निढळाच्या घामाने उत्पादन वाढवतो व अतिरिक्त धन मिळवून देतो. परंतु ह्या अतिरिक्त धनावर त्या कामगारांचा कोणताच अधिकार राहत नाही. त्याला त्यामधून काहीही हिस्सा मिळत नाही. ते सारे अतिरिक्त धन केवळ मालकच बळकावून बसतो. ही बाब लक्षात घेऊन काल मार्क्सने असा प्रश्न उपस्थित केला की, कामगार आपल्या श्रमशक्तीच्या जोरावर निर्माण केलेल्या अधिक उत्पादित धनावर मालकाने काय म्हणून हक्क सांगावा? मार्क्स च्या मतानुसार अतिरिक्त धनावर मालकाचा केव्हाही अधिकार असता कामा नये. अतिरिक्त धनावर केवळ राज्याचाच अधिकार असावा : आणि हे राज्य सुद्धा कामगारांचे असावे. याच कल्पनेवर *मजुरांच्या किंवा कामगार वर्गाच्या हुकूमशाहीचा सिद्धांत मार्क्स ने प्रस्थापित केला. मार्क्सने जे सिद्धांत प्रस्थापित केले, त्यातील हा एक तिसरा सिद्धांत आहे. कामगार वर्गाची हुकूमशाही ह्याचा अर्थ मार्क्स असा करतो की, शासन हे शोषिकांचे म्हणजे कामगारांची पिळवणूक करणाऱ्याचे नसावे. ते शोषितांचे म्हणजे पिळवणूक होत असलेल्या कामगारांचे असावे. अशा प्रकारचे कार्ल मार्क्सचे मूलभूत सिद्धांत आहेत.
कार्ल मार्क्स ने उपस्थित केलेल्या मूलभूत विचारसरणीच्या बाबतीत बुद्धाचे काही म्हणणे आहे का हे ही पाहणे आवश्यक आहे. मार्क्सने गरिबीच्या संबंधी किंवा कामगारांच्या पिळवणुकीसंबंधी प्रश्न उपस्थित करून आपल्या मार्क्सवादाची किंवा साम्यवादाची उभारणी केलेली आहे. बुद्ध काय म्हणतात ? बुद्धाने कोठून सुरुवात केलेली आहे ? बुद्ध तत्वज्ञानाची किंवा बुद्धाच्या धम्माची इमारत कोणत्या पायावर उभारलेली आहे? कार्ल मार्क्स प्रमाणे बुद्धानेही 2500 वर्षापूर्वी कार्ल मार्क्स च्या कित्येक वर्षे अगोदर हीच गोष्ट सांगितली आहे. बुद्धाने म्हटले ” जगात दुःख आहे”. बुद्धाने कार्ल मार्क्स प्रमाणे ‘पिळवणूक ‘ हा शब्दप्रयोग उपयोगात आणला नाही. मात्र पिळवणूक मधून जे दुःख , दैन्य निर्माण होते त्याच दुःखाची कल्पना देऊन बुद्धाने आपल्या तत्वज्ञानाची, आपल्या धम्माची उभारणी केली. ‘ ‘जगात दुःख आहे ‘ हे जगतमान्य सत्य आहे असे सांगून बुद्धाने दुःखाची परिभाषा निरनिराळ्या अर्थाने केली. दुःख म्हणजे पुनर्जन्म, दुःख म्हणजे जीवनमरणाचा फेरा असाही अर्थ बुद्धाने केलेला आहे. परंतु ह्या अर्थाशी मी सहमत नाही. दुःख हा शब्द दारिद्र्य, गरिबी या अर्थानेही उपयोगात आणला गेला असल्याचे बौद्ध वाङ्ममयातून दिसून पडते. तेव्हा बौद्ध तत्वज्ञानाचा मूलभूत पाया व कार्ल मार्क्स च्या तत्वज्ञाचा मूलभूत पाया यात काहीही फरक आढळत नाही. याचाच अर्थ असा की कार्ल मार्क्स ने प्रस्थापित केलेला सिद्धांत हाही नवीन नाही. तेव्हा जीवनाचा मुलभूत पाया शोधण्यासाठी कोणत्याही बौद्ध बांधवास कार्ल मार्क्स चे दार ठोठावण्याची काहीही गरज नाही. बुद्धाने तो पाया केव्हाचाच अगदी उत्तम प्रकारे प्रस्थापित करून ठेवलेला आहे आणि तो त्यांनी आपल्या पहिल्या प्रवचनातील उपदेशात केलेला आहे. हे प्रवचन बौद्ध वाङ्मयात ‘ धम्मचक्रप्रवर्तन सुत्त’ या नावाने ओळखले जाते. ज्या लोकांच्या मनावर कार्ल मार्क्स च्या विचारांचा पगडा बसलेला आहे त्यांना-त्यांना मला हेच सांगावयाचे आहे की तुम्ही, धम्मचक्राप्रवर्तन सुत्ताचा अभ्यास करा व बुद्धाने काय म्हटले आहे ते समजून घ्या. मला खात्री आहे की, तुम्हाला त्यात मानवी जीवनसंग्रामाचे उत्तर खचितच आढळेल. बुद्धाने आपल्या तत्वज्ञानची किंवा धम्माची उभारणी ईश्वर ,आत्मा, किंवा अशाच अनाकलनीय अति मानवी बाबींवर केव्हाही केलेली नाही. त्याने मनुष्याच्या वास्तव जीवनाकडेच अंगुलीनिर्देश करून आपले सारे तत्वज्ञान विशद केलेले आहे. मनुष्य यातना, दुःख यांनी पिडलेला असतो, हि मानवी जीवनाची वास्तवता आहे. केवळ मार्क्सनेच ह्या गोष्टीचा उहापोह केला असे नव्हे तर त्याच्या जन्माअगोदर दोन हजार वर्षांपूर्वी बुद्धाने ह्या गोष्टी जाणल्या व त्यावर उपायसुद्धा सांगितले, हे एक विशेष आहे. ते तुम्ही समजून घेतले पाहिजे. या प्रमाणे गरिबीच्या संदर्भात बुद्धाच्या तत्वप्रणालीत व कार्ल मार्क्स च्या तत्वप्रणालीत कमालीचे साम्य आहे हे तुम्हास कळून चुकेल.
(संदर्भ Vol. 18 /3 )
?? जय भिम??
——संग्राहक——
उज्वला इंगोले
समता सैनिक दल ,यवतमाळ
www.ssdindia.org
( संविधानिक रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणी साठी कटिबद्ध )
ज्या प्रमाणे मार्कस ने सुचवलेल्या उपाय योजना नमुद केल्या तशा बुद्धाने सुचवलेल्या उपाय योजना नमूद करने गरजेचे आहे