घटनेला प्राणप्रिय मानून तिच्या अंमलबजावणीसाठी कटिबद्ध व्हा ! लोकशाहीला प्रत्यक्षात जगायला शिका !


 ⁠⁠⁠? उघडा डोळे वाचा नीट ?

? घटनेला प्राणप्रिय मानून तिच्या अंमलबजावणीसाठी कटिबद्ध व्हा ! लोकशाहीला प्रत्यक्षात जगायला शिका ! ?

बाबासाहेब म्हणतात—
भारताची राज्यघटना अंमलात येऊन पाच वर्षे झालीत. ही घटना चालते याचा विचार करावयास पाहिजे. बाह्यत्कारी असे दिसेल की, आपली व इंग्लंड मधील राज्ययंत्रणा, काही भाग सोडला तर बहुतांशी सारखीच आहे. तिकडे प्रौढ मतदान पद्धतीने निवडणुका होतात, आपल्या देशातही तशाच निवडणुका होतात. त्या देशात पार्लमेंट आहे, आपल्या देशातही पार्लमेंट आहे. त्या देशातील पार्लमेंट मध्ये बहुमताने निर्णय घेतात, आपल्या देशातील पार्लमेंट मध्ये ही बहुमताने निर्णय घेतात. असे असले तरी त्या देशातील राज्यकारभारात एक विलक्षण फरक दिसून येतो. इंग्लंडमध्ये प्रजातंत्रात्मक पद्धती आहे. आणि आपल्या येथे डिक्टेटरशीपचा उदय झालेला दिसत आहे. आपल्या देशातील कारभारात दिसायला एक व वागायला दुसरे असा प्रकार चालला आहे. तुम्ही या गोष्टी बाबत आपल्या देशाची राज्यघटना कशी काम करते व ती कशी राबविली जाते याचा विचार करता की नाही मला माहित नाही. लोकांनी आता राज्यकारभाराबाबत व राज्यघटनेबाबत जागृत राहिले पाहिजे. भारताच्या नव्या संविधानाचा आद्यकर्ता मी आहे हे मी अभिमानाने सांगतो असे नाही. पण मी तरी तिचा आद्यकर्ता असल्यामुळे तसा आद्य विचार करीत असतो आणि विचार करतांना या देशाचे  भविष्यात होईल तरी काय असे भयानक चित्र माझ्या डोळ्या पुढे उभे राहते.
मला निवडणुकीची आता मोठी आवड नाही. राजकारणाचा उपयोग घेऊन पहिला आहे. जातीपातीच्या भेदामुळे या देशातील राजकारण असे बनले आहे की, अल्पसंख्य असलेल्या जमातींना जीवनासाठी तरणोपाय राहिलेला नाही. तरी पण मी काही राजकारण सोडणार नाही. जातिभेदामुळे अनेकवेळा अपयशच आले तरी झगडणार आहे. मी माझे राजकारण चालूच ठेवणार आहे. मी बॅट सोडून तंबूत जाणार नाही.
आपल्या कडे मतदाराला उमेदवार निवडण्याचा हक्क दिसत नाही. इंग्लंडमध्ये  मतदारच उमेदवारांची निवड करतात. त्यांच्या मतदारसंघातील जे मतदार असतील त्यांना त्यांच्यामधील कोणता उमेदवार कसा आहे, त्याचे शिक्षण काय, त्याचे चरित्र कसे आहे, त्याची समाजसेवेची वृत्ती कशी आहे याची चांगली कल्पना असते व त्यानुसार तेथील मतदारच आपला उमेदवार कोण असावा हे ठरवितात. आपल्या देशात याबाबतची तऱ्हा काही निराळीच आहे. कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार उभा करावा याचे स्वातंत्र अजूनही मतदारांना नाही.
उमेदवार निवडण्याचा अधिकार त्या त्या मतदारगटाचा आहे. असे जर झाले नाही तर याला लोकशाही म्हणता येणार नाही. इंग्लंड मध्ये पक्षच नेत्याची आणि मंत्र्याची निवड करतो. आपल्या कडे मात्र नेता आपले सहकारी निवडण्याचे हक्क मागतो आणि ते राजरोस बजावतोही. ही उघड-उघड हुकूमशाही आहे. ज्या रीतीने येथील कारभार चालतो व तुम्हीच इतर पक्षाच्या हातात  सूत्रे देता या वरून तुम्ही मूर्ख  आहात, हे कुणीतरी  सांगायलाच पाहिजे.
आपण नवीन घटना घेतली आहे. आपल्याला नवीन पद्धतीचा अनुभव नाही. ती जर अत्यन्त दक्षतेने राबविली नाही  तर या देशाचा नाश होईल. केवळ पांढऱ्या टोप्यानी काम चालणार नाही. सगळ्या राष्ट्राने बसून राजकारणाचा अभ्यास केला पाहिजे. नेता बुद्धिमान पाहिजे, कणखर पाहिजे, तो देशाचे कार्य करणारा पाहिजे.
या देशाच्या जातीगत राजनीती मध्ये आम्हाला कोणतेही स्थान नाही. राजकीय जीवन व्यतीत करता येत नाही, अशी स्थिती आहे. बाबासाहेब म्हणतात, मी जीवनातील पाच वर्षे केंद्रीय मंत्रिमंडळात काढली व दहा वर्षे केंद्रीय विधि मंत्रीमंडळात सदस्य म्हणून राहिलेलो आहे. आता मला पाहण्यासारखे काही बाकी राहिले नाही. पूर्ण समाधान झाले आहे. राष्ट्राची हानी होऊ नये यासाठी हे सारे मी करतो .
— डॉ.बाबासाहेब आंबेडकर
–दि.15 ऑक्टोबर 1956–
(संदर्भVol.18/3)

टीप: डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना खऱ्याखुऱ्या अर्थाने राबविण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा राजकीय पक्ष तिच्या संविधाना समवेत दिलेला आहे. तेव्हा समाजबांधवांनी रीतसर लोकशाही मार्गाने तो पक्ष चालवून देशाच्या राज्यघटनेची अंमलबजावणी करणे क्रमप्राप्त ठरते, नव्हे ते आपले कर्तव्यच आहे याची जाणीव ठेवावी.)
??जय भीम??

—–संग्राहक—–
उज्वला इंगोले
समता सैनिक दल, यवतमाळ
www.ssdindia.org

(संविधानिक रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.