महार कोण आहेत ?
Mr. Wilson यांनी मांडलेल्या मतानुसार ‘महाराष्ट्र’ हे नाव महार या नावामुळे पडले आणि म्हणून महारांचे राष्ट्र ते महाराष्ट्र असे त्यांचे मत आहे आणि या आपल्या मतास दुजोरा देतांना ते जे उदाहरण देतात जसे गुजराष्ट्र, गुजरांचे राष्ट्र, सौराष्ट्र हे सौराजांचे राष्ट्र इत्यादी. परंतु या विधानावर आक्षेप घेतांना दोन गोष्टींचा आधार दिल्या जातो. एक तर महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र (Great Country) आणि दुसरे असे कि महार लोकांची इतिहासाच्या कालखंडात जी काही त्यांच्या सामाजिक स्थितीत पिछेहाट झालेली दिसते आहे त्यावरून ते कधी उच्च, उन्नतपदाला पोहोचली असावीत कि जेणेकरून ते राज्यकर्ते असावीत, असे दिसत नाही. बाबासाहेब, Mr. Wilson यांच्या विधानाला खोडून काढतांना दोन अगदी वेगवेगळी कारणे देतात. एक, जर का महाराष्ट म्हणजे महारांचे राष्ट्र असे मानले गेले तर महार समाज ‘महार’ या नावाने निश्चितच इतर लोकांच्या अस्तित्वाच्या तुलनेत इतिहासात अगदी प्राचीन काळापासून ठळक वेगळेपण (Distinct) असलेलाच असला पाहिजे. तेव्हा आता काय आपणास महार समाजाचा, इतिहासात महार या नावाने काही पुरावा सापडतो का?
नुसता मुंबई प्रांतापुरता (Bombay Presidency) जरी आपण विचार केला तर आपणास असे दिसून येईल कि, अस्पृश्यांमध्ये प्रामुख्याने तीन समाजाचा समावेश होतो. १) महार २) चांभार ३) मांग. यामध्ये महार समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आढळते. हे अगदीच विलक्षण आहे कि मांग आणि चांभार यांचा समाज म्हणून इतिहासात अस्तित्व आढळते परंतु महारांचा समाज म्हणून कुठेच उल्लेख आढळत नाही. मनु च्या काळात डोकावून पाहिले असता असे निदर्शनास येते कि मनु ने काही वर्गास अस्पृश्य समाज म्हणून उल्लेखिले होते ज्यात चांभार समाजाचा समावेश होता. मांग समाजाचा मात्र मनु ने त्याच्या मनुस्मृतीत उल्लेख केलेला नव्हता. कदाचित त्यावेळेस मनुस्मृती च्या लेखकाला त्याच्या अधिकारक्षेत्रात मांग समाज आढळला नसावा. परंतु बौद्ध साहित्यात मांग समाजाला ज्यांना त्याकाळी मातंग समाज म्हणून उल्लेखिले जायचे याचे भरपूर पुरावे सापडतात. परंतु मनुस्मृती वा बौद्ध साहित्यात ‘महार’ समाज असा कुठेच उल्लेख आढळत नाही. नुसते प्राचीन काळातील लोककथेतच नव्हे तर अगदी अलीकडच्या काळातील लिहिलेल्या ‘स्मृतीं’ मध्ये सुद्धा ‘महार’ समाज असा उल्लेख आढळत नाही.
खरोखरच अगदी मुस्लिमांच्या आगमनापर्यंत, महार शब्द कुणालाही, कुठेच आढळत नाही. मात्र ११ व्या शतकात लिहिलेल्या ज्ञानेश्वरीत फक्त एकदाच ‘महार’ शब्दाचा उल्लेख आढळतो. म्हणजेच यापूर्वी महार हे नाव अगदीच अस्तित्वात नव्हते. मग आम्ही काय समजायचे? काय प्राचीनकाळी इतिहासात महार नावाचा असा कुठलाच समाज नव्हता? वा असे समजायचे कि प्राचीनकाळी इतिहासात या समाजास दुसऱ्या कुठल्या नावाने ओळखले जायचे?? काहीही असो, पण महार या नावाचे मुळात अस्तित्वच सिद्ध होत नसल्याकारणाने, पुरता आधार मिळत नसल्याने Mr.Wilson यांनी मांडलेले महारांचे राष्ट्र ‘महाराष्ट्र’ हे मत प्रतिकूल ठरते.
क्रमश: …
—जनज्ञानार्थ जारी—
द्वारा प्रसारीत-प्रचारीत
समता सैनिक दल,
HQ, दीक्षाभूमी नागपूर.
www.ssdindia.org