रिपब्लिकन पार्टी च्या पुनर्बांधणीचा प्रश्न आणि ती सोडविण्याचे उपाय !


? रिपब्लिकन पार्टी च्या पुनर्बांधणीचा प्रश्न आणि ती सोडविण्याचे उपाय !?
A post written by,
–Prashik Anand–

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जन्मास घातलेली रिपब्लिकन पार्टी हि बाबासाहेबांनी तिच्यासाठी लिहिलेल्या जगातील अप्रतिम अशा सात तत्वांमुळे सर्वश्रेष्ठ ठरते..खरे तर ती सात तत्वे म्हणजे मानवमुक्तीचा जाहीरनामाच होय..ज्याला मानवतावाद म्हणतात त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे ती सात तत्वे होत ! जी या पृथ्वीतलावरच्या प्रत्येक मनुष्यमात्रास श्रेष्ठतम जीवन जगण्यासाठी गरजेची आहेत, इतकेच नव्हे तर ती त्याचा प्राण आहेत..या तत्वांखेरीज मनुष्याचे जीवन म्हणजे दुःखाचा महासागरच ! तेव्हा या तत्वांना जनमानसात रुजविण्यासाठी गरज पडते ती संघटनेची, सामुहिक प्रयत्नांची ! तेव्हा ज्या संघटनेची पायाभरणी या सर्वश्रेष्ठ तत्वांवर स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे तो पक्ष म्हणजे आपली ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ होय. आजघडीला आपला हा पक्ष उद्ध्वस्थावस्थेला दिसत असला तरी विरोधकांना देण्यात येणाऱ्या बाबासाहेबांच्या उत्तराप्रमाणे, “माझी स्थिती सुकून गेलेल्या रोपट्याप्रमाणे झाली आहे, असे म्हटले जाते. त्या विरोधकांना मला हे सांगावयाचे आहे कि, वसंतऋतुपूर्वीची हि स्थिती आहे. माझी चळवळ अमर आहे.” तेव्हा या अशा अजरामर रिपब्लिकन चळवळीचे पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी आता आपल्या खांद्यावर येऊन पडलेली आहे. आपल्या चळवळीचा इतिहास हा काही कालपरवाचा नसून फार जुना आहे हे सांगताना बाबासाहेब म्हणतात, ” शेड्युल्ड कास्टस फेडरेशन च्या राजकारणाला १९१९ सालापासूनच सुरुवात झाली. त्याचे अगोदर सुद्धा अस्पृश चळवळीचे काम चालू होते. हि संस्था आजकालची नाही. ती कॉंग्रेसइतकीच नव्हे तर त्यापेक्षाही जास्त जुनी आहे.” त्यानंतर आपली चळवळ बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या विविध संस्थांमधून उत्क्रांत (बहिष्कृत हितकारणी सभेपासून, समता सैनिक दल, स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्युल्ड कास्टस फेडरेशन आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) होत गेली आणि तिचा शेवटचा टप्पा म्हणजे रिपब्लिकन पार्टी होय. या देशातील अस्पृश्य बांधवांना त्यांची मुळे हि या देशातील बुद्धकाळातील गणराज्य संस्कृतीशी (Republican culture) कशी जुळली आहेत ह्याची जाणीव करून देऊन दि. १४ ऑक्टोंबर १९५६ ला बुद्धधम्माची दीक्षा दिली आणि तत्पूर्वी दि.३० सप्टेंबर १९५६ ला शे.का.फे. ला बरखास्त करून रिपब्लिकन पार्टी चा जन्म झाला. म्हणजे आपल्या चळवळीच्या उत्क्रांतीचा इतिहास लक्षात घेता आमचा शे.का.फे.चा किल्ला बरखास्त करून त्या जागी आता रिपब्लिकन पार्टी चा किल्ल्याची उभारणी सुरु झाली. वसंतऋतु आला कि झाडाला जशी नवी पालवी फुटावी अगदी तशी, झाड मात्र तेच ! तसेच आमच्या चळवळीचेही..चळवळ तीच ! फक्त त्यात आता सर्व भारतीयांसाठी सर्वसमावेशकतेने सर्वांना सामावून घेतलेली..त्याची दालनं आता सर्वांसाठी उघडलेली…अस्पृश्यांची चळवळ आता रिपब्लिकन चळवळ झाली आणि पुढे तिची गौरवशाली वाटचाल हि ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाची ठरली. नंतर मात्र साधारणत: तीन-चार दशकांपासून तिला जे ग्रहण लागलंय ते सुटता सुटता सुटेना..त्याला बरीचशी कारणे आहेत…काहींनी या चळवळीचा मुख्य मार्गच बदलवून टाकला आणि तिला वाममार्गाने ‘बहुजन’ या गोंडस नावाखाली संपविण्याचाही अतोनात प्रयत्न केला आणि सध्याही तो अहोरात्र अवतीभवती होतांना दिसतो आहे..डॉ.बाबासाहेब आंबेडकर मात्र आमच्या या चळवळीविषयी बोलतांना म्हणतात, ”शेड्युल्ड कास्टस फेडरेशनचा (Predecessor of RPI ) किल्ला हा अस्पृश्य जनतेच्या भावनेवर उभारला आहे. हा किल्ला मोडू नये, अशी माझी पूर्ण इच्छा आहे.” पुढे बाबासाहेबांचे विधान अतिशय महत्वाचे आहे जे आजघडीलाही तंतोतंत लागू पडते. ते म्हणतात, “ माझे शेड्युल्ड कास्टस फेडरेशनकडे गेली १० वर्षे दुर्लक्ष झाले. (१९४२-१९४६ या काळात Labour member : Viceroy’s Executive Council, नंतर १९४६ ते १९४९ या काळात संविधान लिहिण्याची जबाबदारी आणि सप्टेंबर १९५१ पर्यंत स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, नंतर १९५२ च्या निवडणुका इत्यादी कार्यकाळ अतिव्यस्त गेल्यामुळे) या १० वर्षांच्या गैरहजेरीत शेड्युल्ड कास्टस फेडरेशनमध्ये पुष्कळ मतभेद निर्माण झाले आहेत. यापूर्वी असले मतभेद नव्हते. प्रत्येक माणसाने फेडेरेशनमध्ये गटबाजी सुरु केली आहे. प्रत्येकाने आपापले लहानलहान गट निर्माण केले आहेत. (आज आम्ही RPI चे अनेक गट बघतो आहोत) एकाचे वर्चस्व दुसऱ्यास नको आहे. यामुळे आपले लोक अजून तरी राजकारणात पक्के मुरले नाहीत. राजकारण म्हणजे काय याची त्यांस पूर्णपणे जाणीव नाही. आपल्या समाजात आपापसात फार मतभेद असतात. ते मतभेद ताबडतोब नष्ट होत नाहीत. त्या मतभेदाची झाडे त्यांच्या पोटात वाढू लागतात. त्यांचे मतभेद त्यांच्या मुलांच्याही पोटात वाढतात. (आजघडीलाही आपणास ह्या गटाधीपतींच्या पोराबाळांचा चांगलाच अनुभव येत असतो.) अशा रीतीने हे मतभेद वाढत जातात. हा गुणधर्म आपल्या लोकांत जास्त प्रमाणात आहे. कॉंग्रेससारख्या पक्षातसुद्धा मतभेद आहेत. त्याबरोबरच त्यांच्याजवळ काही सद्गुणही आहेत, असे अनुभवाने म्हणावे लागते. त्यांचा एक गुण फार महत्वाचा आहे आणि तो म्हणजे बहुमताने ठरलेले ते सर्व मान्य करतात. मग त्या गोष्टीचे विरोधकसुद्धा खोट्याचे समर्थन करू लागतात. हि कृती राजकारणात फार आवश्यक आहे. (आमच्या समाजात एखाद्या वेळेस संघटनेतील कुणाच्या हातून निर्णय घेतांना भूलचूक झालीच तर लागलीच आमची बोंबाबोंब सुरु होते आणि धिंडवडे काढणे सुरु होते..असे न करता संघटनेच्या एकाच कुटुंबातील आपण सगळे आहोत या भावनेने सांभाळून घेण्याची वृत्ती जोपासायला हवी.) माझ्या मत प्रमाणे जर कारभार चालला तरच मी संस्थेत राहीन, अशी प्रवृत्ती फार वाईट. हम करे सो कायदा नको. “
वरील त्यांच्या या विधानांवरून राजकीयदृष्ट्या आपणास कसे वागले पाहिजे यावर बाबासाहेबांचे अगदी मोलाचे मार्गदर्शन लाभलेले आहे. सद्यपरिस्थितीत गटातटांमध्ये विभागलेल्या आपल्या रिपब्लिकन पार्टीची पुनर्बांधणी करण्यासाठी आणखी महत्वाची गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे ती अशी कि बाबासाहेब म्हणतात, “प्रत्येक अस्पृश्य माणूस (आजचे धर्मांतरित बौद्ध) हा दलित फेडरेशनचा (Predecessor of RPI) सभासद आहे. तो जरी तसे म्हणाला नाही तरी तसे आम्ही समजणार. अशा रीतीने प्रत्येक गावातील लोकांनी आपल्या गावातील पाच लोक निवडून द्यावे. याप्रमाणे सर्व तालुक्यातील गावाची पाच माणसे प्रमाणे लोकांनी आपले अध्यक्ष, सेक्रेटरी यांची निवड करावी. यामुळे तक्रार राहण्याचे कारण नाही. हि निवड सर्वांनाच बंधनकारक राहील. जे पैसे जमतील ते बँकेमध्ये ठेवण्यात येतील.”
वरील त्यांच्या या विधानावरून आजघडीला आम्ही आपल्या पक्षाची, रिपब्लिकन पार्टी ची पुनर्बांधणी करण्यासाठी बाबासाहेबांनी सुचविलेला तंतोतंत हाच मार्ग स्वीकारल्यास आपला बलाढ्य पक्ष प्रचंड ताकदीनिशी परत एकदा या भारतभूमीवर उभा झालेला दिसल्याशिवाय राहणार नाही असा मला आशावाद आहे.
तेव्हा आपापल्या गावामध्ये, शहरामध्ये, तालुक्यामध्ये, राज्यामध्ये अशी संघटनात्मक बांधणी करण्यासाठी आपण पुढे धजावलो पाहिजे. आपणच आपली गावागावातील कार्यकारिणी निवडून एकमेकांशी जोडल्या गेलो पाहिजे आणि बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे, ज्यांचा-ज्यांचा अस्पृश्यतेचा (उदा जसे महाराष्ट्रातील पूर्वाश्रमीचे महार, आजचे बौद्ध) वारसा राहिलेला आहे ती प्रत्येक व्यक्ती आजघडीला या रिपब्लिकन पार्टी चा जन्मजात सदस्य आहे तेव्हा बाबासाहेबांच्या चळवळीचे खरे वारसदार म्हणून आपण त्या चळवळीचे वाहक आहोत. तेव्हा तिला गतिमान करण्याची जबाबदारी आपोआपच आपल्यावर येऊन ठेपते तेव्हा तिला तिच्या निश्चित ध्येय-उद्दिष्टांपर्यंत आपण पोहचवू या !!

जय भीम

प्रशिक आनंद, नागपूर.
www.ssdindia.org

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.