? रिपब्लिकन पार्टी चे तत्व क्रमांक 2- स्वविकास : स्त्री मुक्ती चा एकमेव आधार?
डॉ. बाबासाहेब म्हणतात…
हिंदु लोकांत स्त्री म्हणजे एक पुरुषाच्या चैनीची वस्तु आहे, असा सर्व साधारण समज आहे आणि पुरुषांच्या इच्छेनुसार स्त्रियांनी वागावे अशी सर्वांची समजूत असते. स्त्री म्हणजे चैनीची वस्तु समजली गेल्यामुळे तिच्या शरीराला वस्त्रप्रावरणांनी व दागदागिन्यांनी शृंगारण्यात बऱ्याच धनाचा व प्रेमाचा व्यय होतो हे खरे. तथापि माणूस समजून तिला कोणत्याच प्रकारचे हक्क हिंदु धर्मात देण्यात आलेले नाहीत. जड जीवाची जोपासना करण्यास संपत्तीचा वारसा तिला नाही तो नाहीच. पण शिक्षण घेऊन मन सुसंस्कृत करण्याचा अधिकारही तिला नाही. आमच्या शास्त्रांत गाईला आत्मा आहे असे सांगून ख्रिस्ती लोकांना लाजवू पाहणारे हिंदु लोक स्त्रीला आत्मा आहे असे जरी मानीत असले तरी कृतीने तसे दाखवीत नव्हते हे खरे. आता कोठे त्यांना हे उमगत आहे, परंतु त्यातही त्यांचे ध्येय मोठेसे उच्च नाही. स्त्रियांनी गृहलक्ष्मी तेवढे व्हावे ! त्याच्या पुढे स्त्रियांच्या प्रगतीची मजल जाऊ नये ! हि मर्यादा अबला-उन्नती प्रित्यर्थ झटणाऱ्या बऱ्याच सुधारकांनी आपल्यापुढे ठेविल्याचे दृष्टोत्पत्तीस येते. आमच्या मते अशा प्रकारचे संकुचित ध्येय स्त्रीवर्गापुढे ठेवणे अनुदारपणाचे द्योतक आहे. दरेक व्यक्तिमात्राला पूर्णावस्थेस जाण्यास समाजाने अवसर दिला पाहिजे हे तत्व (रिपब्लिकन पार्टी चे तत्व क्रमांक 2-स्वविकास ) जर एकदा मान्य झाले तर मग स्त्रियांच्यापुढे असले हलके ध्येय ठेवण्यात यावे याचे आम्हास नवल वाटते.
—डॉ.बाबासाहेब आंबेडकर
–दि.15 जुलै 1927 बहिष्कृत भारत
(संदर्भ Vol.19)
—संग्राहक—
उज्वला इंगोले
समता सैनिक दल, यवतमाळ
www.ssdindia.org
(संविधानिक रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध)