महापरिनिर्वाण सुत्ता मध्ये तथागत बुद्धाने आनंदाला सांगितले आहे की,माझा धम्म बुद्धीवादावर व अनुभवावर आधारित आहे आणि म्हणून माझ्या अनुयायांनी मी सांगतो म्हणून सत्य आहे असे समजून अंधानुकरण करू नये. बुद्धिप्रामाण्य व अनुभव हा माझ्या धम्माचा मूलभूत पाया असल्याने कालमानानुरूप व परिस्तिथीनुसार त्याच्यात त्यांना बदल करता येतो. एवढेच नव्हे तर माझी जी मते काळाशी अनुरूप व परिस्तिथीशी सुसंगत वाटत नसतील ती मते त्यांना टाकूनही देता येतात.
याच कारणामुळे तथागत बुद्धाने बौद्ध धम्म शुष्क, काष्ठ न समजता तो सदाहरित व चिरतरुण मानला जावा,अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.त्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांना नितांत गरज भासेल तेव्हा बौद्धमते प्रिवर्तनशाली करण्यास पूर्णपणे स्वातंत्र्य प्रदान केलेले आहे. असे स्वातंत्र्य दुसऱ्या कोणत्याच धर्मगुरुने आपल्या अनुयायांना दिलेले नाही, किंवा तसे स्वातंत्र्य देण्याचे धाडसही दाखविलेले नाही. कारण त्यांना भीती वाटली असावी कि,अशा मुक्त स्वातंत्र्याने त्यांनी प्रस्थापित केलेल्या धर्ममतांचा डोलाराच नेस्तनाबूत होईल व त्यांचे नामनिशाण सुद्धा राहणार नाही. परंतु,अशी भीती बुद्धाला कधीही वाटली नाही. त्यांच्या धम्ममतांची इमारतच मुळात भक्कम अशा पायावर आधारलेली होती. जगातील कोणताच वैचारिक झंजावात आपल्या धम्माला जमीनदोस्त करू शकणार नाही, ह्याची बालंबाल खात्री बुद्धाला होती.हेच तथागत बुद्धाच्या अद्वितीय व्यक्तिमत्वाचे निदर्शक होय.
डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
खंड २० पृष्ठ क्रमांक ३७५
संकलन:- विजय रणवीर,नांदेड