आपले हक्क प्रस्थापित करण्याकरिता चढाईचे धोरण स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही.


आपले हक्क प्रस्थापित करण्याकरिता चढाईचे धोरण स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही.

दि. २३ मार्च १९२९ रोजी मु.बेळगाव येथील सभेतील भाषण.
आपली अस्पृश्यता आपणच घालविली पाहिजे! व त्यादृष्टीने आपण सबळ व निर्भय होण्यानेच आपली अस्पृश्यता जाणार आहे. या बाबतीत आपणास बरेच कष्ट करावे लागतील व प्रसंगोचित आपणास स्पृश्यांशी दोन हात करण्याचा प्रसंग येणार आहे व त्यासाठी आपण हिम्मत बाळगली पाहिजे. आपला समाज परावलंबी आहे व हे चुकीचे आहे असे मी म्हणत नाही. अस्पृश्य समाज स्पृश्य समाजाशी सहकार्याने वागल्याशिवाय त्याचा तरणोपाय नाही! अशा प्रबळ समाजाशी असहकारिता पुकारुन आपला कार्यभाग कसा साधणार असे पुष्कळ लोकांना वाटते. परंतु बहिष्कृत समाजातील लोकानी हे पक्के लक्षात ठेवावे की, आपला स्वावलंबनाच्या अबाधित मार्गाशिवाय अन्य मार्ग निकामी व घातकी असल्यामुळे ते प्रयत्न सर्वस्वी त्याज्य होत.
अस्पृश्य समाजात कसलाही मनुष्य असो,तो मनुष्य कितीही सर्वगुणसंपन्न असो! कितीही विद्वान असो! तथापी, तो एका विशिष्ट सामाजात जन्माला एवढ्याच कारणास्तव त्याच्या गुणाचे चीज होत नाही. करिता आपण आपले हक्क प्रस्थापित करण्याकरिता चढाईचे धोरण स्वीकारले पाहिजे! हे धोरण स्वीकारल्याशिवाय या धक्काबुक्कीच्या मामल्यात आपणास गत्यंतर नाही.
आपल्यावरील अन्याय दुर करण्याचा अत्यंत महत्त्वाचा दुसरा उपाय म्हणजे सरकारी सत्ता प्राप्त करून घेणे होय! आपल्याला चातुर्वण्याच्या चौकटीबाहेर असावे लागते तरी ही चातुर्वण्याची चौकट मोडुन आत जावयाचे असेल तर आपणास राजकीय सत्ता हवी. राजकीय सत्ता हातात असल्याशिवाय समाजात आपणास वर्चस्व प्राप्त होणार नाही. हल्ली महाराष्ट्रातील ब्राह्मणांचेच एवढे वर्चस्व का आहे? याचे कारण दुसरे काहीही असले तरी त्यांच्या हातात राजकीय सत्ता प्रबळ आहे हे विसरुन चालणारा नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

संकलन
आयु.नितीन गायकवाड, ठाणे

समता सैनिक दल
HQ : दिक्षाभूमी, नागपूर
www.ssdindia.org

(संविधानीक रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणीसाठी कटिबध्द )

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.