? सुसंस्कृत, उत्साही मन संवर्धनासाठी धर्माची अत्यावश्यकता !?
डॉ.बाबासाहेब म्हणतात–
मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला धर्म हि अत्यन्त आवश्यक वस्तू आहे. मला माहित आहे की कार्ल मार्क्सच्या वाचनामुळे एक पंथ निघाला आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे धर्म म्हणजे काहीच नाही. त्यांना धर्माचे महत्व नाही. त्यांना सकाळी ब्रेकफास्ट मिळाली, त्यात पाव, मलई, लोणी, कोंबडीची टांग वगैरे असले, पोटभर जेवण मिळाले, निवांत झोप मिळाली, सिनेमा पाहावयास मिळाला की सगळं संपल. हे त्यांचं तत्वज्ञान ! मी त्या मताचा नाही. माझे वडील गरीब होते; म्हणून मला या प्रकारचे सुख काही मिळालेले नाही. माझ्या इतके जास्त कष्टमय जीवन कोणीही आयुष्यात काढलेले नाही. म्हणून माणसाचे जीवन सुखसमाधानाच्या अभावी कसे कष्टमय होते याची मला जाणीव आहे. आर्थिक उन्नतीची चळवळ आवश्यक आहे असे मी मानतो. त्या चळवळी विरुद्ध मी नाही. माणसाची आर्थिक उन्नती व्हावयास पाहिजेच.
पण मी याबाबत एक महत्वाचा फरक करतो. रेडा, बैल व माणूस या मध्ये फरक आहे. रेडा व बैल यांना रोज वैरण लागते. माणसासहीं अन्न लागते. मात्र दोहोंत फरक हा आहे तो हा की रेडा व बैल यांना मन नाही. मनुष्याला शरीरा बरोबर मन हि आहे. म्हणून दोन्हीचाही विचार करावयास हवा. मनाचा विकास झाला पाहिजे. मन सुसंस्कृत झाले पाहिजे. ते सुसंस्कृत बनविले पाहिजे. ज्या देशातील लोक अन्नाशिवाय माणसाचा सुसंस्कृत मनाशी संबंध नाही असे म्हणतात त्या देशाशी अगर लोकांशी संबंध ठेवण्याचे मला काहीच प्रयोजन नाही. जनतेशी संबंध ठेवतांना माणसाचे शरीर जसे निरोगी पाहिजे तसे शरीर सुदृढ होण्याबरोबर मनहि सुसंस्कृत झाले पाहिजे. एरवी मानव जातीचा उत्कर्ष झाला असे म्हणता येणार नाही.
मनुष्याचे शरीर अथवा मन हे रोगी का असते? त्याची कारणे हि कि त्यास एकतर शारीरिक पीडा असते किंवा मनाला उत्साह नसतो. मनात उत्साह नसेल तर अभ्युदयही नाही. हा उत्साह का राहत नाही? याचे पहिले कारण हे कि मनुष्यास अशा रीतीने ठेवण्यात आले आहे की त्याला वर येण्याची संधी मिळत नाही; अगर आशा राहत नाही. त्या वेळी त्यास उत्साह कोठून असणार? तो रोगीच असतो. ज्या माणसाला आपल्या कृतीचे फळ मिळू शकते, त्यास उत्साह प्राप्त होतो. नाही तर शाळेत शिक्षक असे म्हणू लागला की कोण रे हा? हा तर महार! आणि महारडा पहिल्या वर्गात पास होणार? याला प्रथम श्रेणी कशाला पाहिजे? तू आपला तृतीय श्रेणीतच राहा – पहिल्या वर्गात येणे हे ब्राम्हणाचे काम! अशा अवस्थेत त्या मुलाला काय उत्साह मिळणार?त्याची उन्नती काय होणार? उत्साह निर्माण करण्याचे मूळ मनात आहे, ज्याचं शरीर व मन हि धडधाकट असेल जो हिम्मतबाज असेल, मी कोणत्याही परिस्थितीतून झगडून बाहेर पडेल असा ज्यास विश्वास वाटतो, त्याच्या मधेच उत्साह निर्माण होतो व त्याचाच उत्कर्ष होतो. माणसाला निरुत्साही करून टाकणारी परिस्थती हजारो वर्षे टिकली तर जास्तीत जास्त कारकुनी करून पोट भरणारे लोक होतील या पलीकडे दुसरे काय होणार? या कारकुनाचे रक्षण करावयास मोठा कारकून पाहिजे. मनुष्याच्या उत्साहाला काही कारण असेल तर मन !
(संदर्भ vol 18/3)
??जय भिम??
—-संग्राहक—–
उज्वला इंगोले
समता सैनिक दल, यवतमाळ
www.ssdindia.org
(संविधानिक रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बाधणी साठी कटिबद्ध)