स्त्रियांनी आपल्या हक्कांसाठी मनोदौबल्य टाकून, कंबर कसून आपली चळवळ ( Republican movement) मजबूत करण्यासाठी पुढे आले पाहिजे


? स्त्रियांनी आपल्या हक्कांसाठी मनोदौबल्य टाकून, कंबर कसून आपली चळवळ ( Republican movement) मजबूत करण्यासाठी पुढे आले पाहिजे.?

तारीख 25 डिसेंबर1952 रोजी कोल्हापूर येथे  कोल्हापुरातील स्त्रियांच्या निरनिराळ्या नऊ संस्थांतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तेथील राजाराम चित्रपटगृहात मोठ्या थाटाने मानपत्र अर्पण करण्यात आले व त्यांनी स्त्रियांच्या विनंतीवरून आपल्या हिंदू कोड बिलात कोणकोणते हक्क दिले होते व काय तरतुदी केल्या होत्या या विषयी थोडक्यात पण सुबोध रीतीने विवेचन केले.
डॉ.बाबासाहेब म्हणाले,
आजच्या जगात संपतीच स्वातंत्र्याचा आधारस्तंभ आहे. जोवर स्त्रियांना संपत्तीचा वारसा मिळत नाहि ,तोवर त्यांची गुलामगिरी संपणार नाही. त्यादृष्टीने हिंदु कोड बिलात मी तरतूदही केली होती. पण ते बिल मंजूर होऊ शकले नाही. यापुढे आता येणारे बिल कोणत्या स्वरूपात येते व त्यात सर्व स्त्रियांच्या स्वातंत्र्याची, हक्काची काय तरतूद आहे या कडे महिला वर्गाने फार बारकाईने पहिले पाहिजे. इतकेच नव्हे तर आपल्या हक्कांसाठी झगडण्यास त्यांनी आपले मनोदौर्बल्य टाकून कंबर कसून पुढे आले पाहिजे. तरच त्यांची सुधारणा व प्रगती होईल.
एखाद्या स्त्रीने दुधात विरजण घालून ठेवावे आणि तिला ते विरजण शेवटी नासले असल्याचे दिसावे, अशी स्थिती माझ्या हिंदू कोड बिलाची झाली आहे.

स्त्रियांच्या सर्वस्वी हिताचे हे बिल मंजूर करण्यासाठी स्त्रियांनी काहीच हालचाल केली नाही ही खेदपूर्वक बाब आहे. मी पुरुष असून देखील स्त्रियांच्या हितासाठी भांडलो.पण स्त्रियांनी का उत्सुकता दाखविली नाही हे समजत नाही. या बिलाला पाठिंबा देण्याची गोष्ट तर बाजूलाच राहो, पण काही स्त्रियांनी माझ्या कडे येऊन ते बिल चांगले नाहीअसे मला सांगण्याचा प्रयत्न केला. मी दिल्लीत असतांना तर काही प्रमुख स्त्रियांचे शिष्टमंडळच माझ्या कडे आले. त्यांना मी, ‘ते बिल वाचले का ?’म्हणून विचारले तर त्यांनी ते वाचले नाही असे सांगितले, न वाचता का विरोध करता असे त्यातील मुख्य स्त्रीला बोलावून विचारता ती म्हणाली ‘ माझ्या नवऱ्याने मला सांगितले की तू त्या बिलाला विरोध कर, नाही तर मी दुसरी बायको करून घेतो’ म्हणून सवत पत्करण्यापेक्षा बिलालाच विरोध करणे मला भाग आहे. पण स्त्रियांची मानसिक दुर्बलता आहे. त्यांच्या या दुर्बलतेमुळेच या बिलाचा घात झाला. स्रियांच्या पायात ताकत असती तर ते बिल बारगळले नसते. पार्लमेंटमध्ये निवडून आलेल्या स्त्रियांनी देखील या बिला बाबत काहि जागरूकता दाखविली नाही. त्या स्त्री सभासदांचे सारे लक्ष युनो, आय. एल.ओ. कोरिया या गोष्टी कडेच लागले असायचे ! माझ्या बिलाला पाठींबा देण्यास त्या तयार दिसल्या नाहीत. कारण त्या मुळे प्रधानमंत्री नाखूष होतील व आपल्याला युनोत किंवा दुसरीकडे कोठे जाण्यास संधी मिळणार नाही याची त्यांना भीती वाटते. अशा प्रकारच्या लोभी वृत्तीनेच आपल्या देशाचे नुकसान होत आहे. सार्वजनिक व राजकीय क्षेत्रात कार्य करणारा हरेक मनुष्य आज आपल्याला कमिशनर होता येईल काय किंवा अमुक जागा मिळेल काय या लोभाने धडपडत असतो. स्त्रियांत हा दोष मला फार दिसतो. स्त्रियांच्या मनावर परंपरेचा पगडा जास्त असतो. त्या मुळे त्यांच्यात हे मनोदौबल्य आहे. हे काढून टाकले पाहिजे.
इंग्लंडमधील स्त्रियांनी मतदानाचा हक्क मिळविण्यासाठी चळवळी केल्या आहेत. त्याच प्रमाणे स्त्रियांना आपली सुधारणा होण्यासाठी, आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी जर हे बिल यावे असे वाटत असेल तर  त्यासाठी त्यांनी चळवळ केली पाहिजे. त्या खेरीज स्त्रीवर जुलूम करणारा पुरुष तिची सुधारणा करणार नाही. इंग्लंड मधील स्त्रिया आपल्या इच्छेप्रमाणे घटस्फोट घेऊन  स्वतंत्र जीवन जगू शकतात. याचे मूळ कारण त्यांना संपत्तीचा वारसाहक्क असतो हे आहे. तसेच मलबारी समाजात गेल्या 50 -60 वर्षांपासून घटस्फोट फारसे होतच नाहीत याचे कारण तेथे स्त्रीलाही वारसा हक्क आहे. त्यामुळे पुरुष तिच्याशी चांगला  प्रकारे वागतो. म्हणून पुरुषांप्रमाणे आपल्यालाही वारसाहक्क मिळावा या साठी स्त्रियांनी चळवळ सुरू करावी. घरात बसून किंवा सभा संमेलने व ठराव करून या गोष्टी होणार नाहीत त्या साठी स्त्रियांनी स्वतः चळवळ करण्यास पुढे यावे.
—डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(संदर्भ -vol 18/3)
??जय भिम??

—संग्राहक—-
उज्वला इंगोले
समता सैनिक दल
यवतमाळ
www.ssdindia.org

(रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणी साठी कटिबद्ध)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.