? धम्म अभ्यासकांच्या हितार्थ जारी?
संकलन- अशोक भरणे.
मित्रहो,
बरेचदा बौद्ध साहित्यात’ देव ‘ हा शब्द येतो व त्यामुळे वाचक व अभ्यासकही बुचकळ्यात पडतात! म्हणूनच, प्रथमतः बौद्ध साहित्यानुसार देव हा शब्द कसा वापरला जातो हे समजून घेणे महत्वाचे ठरेल. यासंबंधात, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या ‘ प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती ‘ या ग्रंथात लिहितात :-
” बौद्ध साहित्य (पाली साहित्य ) सांगते की, देव हे मानवी समूहाचा एक समाज होता. असे अनेक ‘ देव ‘ आहेत जे बुद्धाकडे येतात व आपल्या शंकांना आणि अडचणींना दूर करून घेतात. देव जर मानव नसते तर हे कसे शक्य होऊ शकले? “
ते याच ग्रंथात असेही लिहितात,” यक्ष, गण, गंधर्व, किन्नर इत्यादी हे मानवी परिवाराचे सदस्य होते. ते देवांच्या सेवेमध्ये होते. यक्ष हे महालांचे(वाडे) पहारेकरी होते, गण हे देवांचे रक्षण करणारे होते. गंधर्व हे संगीत व नृत्यांच्या द्वारे देवांचे मनोरंजन करणारे होते. किन्नर सुद्धा देशांच्या सेवेमध्ये होते. किन्नरांचे वंशज आज सुध्दा हिमाचल प्रदेशात रहात आहेत. ”
वरील देव या संज्ञेस अथवा मानव समाजाच्या एका घटकास पाली भाषेतील बुद्ध वंदना कशी सार्थपणे पुष्टी देते हे पाहणे अर्थपूर्ण आहे :-
इतिपी सो भगवा अरहं, सम्मासम्बुद्धो,
विज्जा-चरण सम्पन्नो सुगतो,
लोकविदु, अनुत्तरो, पुरिस-दम्मसारथी,
सत्था देव-मनुस्सानं, बुद्धो भगवा’ति।
बुद्धं याव जीवितं सरणं गच्छामि।
अर्थात
(अर्हत (जीवनमुक्त), सम्यक सम्बुद्ध ( संपूर्ण जागृत ), विद्या व आचरणांनी युक्त, सुगती ज्यांनी प्राप्त केलेली आहे, लोकांना जाणणारे सर्वश्रेष्ठ, दमनशील पुरूषांचे सारथी व आधार देणारे, देव व मनुष्य यांचे गुरु, असे भगवान बुद्ध आहेत.
तेव्हा, बुद्धानुयायांव्यतिरिक्त अन्य लोकांची ‘ देव म्हणजे ईश्वर ‘ जो या सृष्टीचा निर्माता असून सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापी असल्याची जी धारणा आहे त्याचेशी बौद्ध शिकवणीचा दुरान्वयानेही संबंध नाही, हेच आपण लक्षात घेतले पाहिजे. अत्त दीप भव। हीच तथागत बुद्धांची शिकवण आहे.
– अशोक भरणे.
www.ssdindia.org
??✍✍✳✳