? जर आपले सच्चे प्रतिनिधी विधानसभा आणि संसदेत नसतील तर आमचे मरण अटळ आहे...?
दिनांक 28 ऑक्टो्बर 1951 रोजी लुधियाना येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले, ते आपल्या भाषणात म्हणाले…
भारताच्या ब्रिटिशसतेच्या काळात ब्रिटिशांनी आम्हाला कसे फसविले हे तुम्हास मी सांगतो. ते भारतापासून शेकडो मैल दूर राहत असले तरी भारतात त्यांचे राज्य स्थापण्यात ते यशस्वी झाले. प्रथम ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली तेव्हा तीचा हेतू केवळ व्यापार करण्याचा होता. क्रमाक्रमाने येथे आपले राज्य स्थापावे याबद्दल इंग्रज लोक कार्योत्सुक झाले. हा त्यांचा हेतू साध्य करण्यास ते समर्थ कसे बनले? भारतात त्यांचे सैन्य नव्हते. इंग्रजांच्या स्वतःच्या सैन्याशिवाय ते भारतातील सर्व राजामहाराजांना जिंकण्यास समर्थ कसे ठरले याचे स्पष्टीकरण कोणीही करू शकला नाही. मी आता या प्रश्नाचे ऊत्तर देणार आहे. ज्यांना त्यांचेच देशवासी लोक ‘अस्पृश्य’ म्हणून संबोधित होते अशा शेड्युल्ड कास्ट्स च्या लोकांच्या मदतीने ब्रिटिश लोक भारताचे राज्यकर्ते बनले. हे अस्पृश्य लोक निरक्षर होते आणि सवर्ण हिंदूंनी त्यांना दिलेली वागणूक मानहानी कारक होती. त्यांना चारितार्थाचे कोणतेही साधन नव्हते. त्यांना नेहमी सवर्ण हिंदूंच्या दयेवर अवलंबून राहावे लागत असे. जे काही घडले ते योग्य होते हे तुमच्या मनावर बिंबवावे असा माझा हेतू नाही. मला हे दाखवून द्यावयाचे आहे की ज्या लोकांना भारतात राज्य स्थापण्यासाठीं मदत केली त्यांनी सुद्धा आमच्या लोकांना अशा निकृष्टपणे वागविले. ह्या ब्रिटीश्यांसाठी आमच्या लोकांनी लढाईत आपले प्राण गमावले. परंतु त्यांना मोबदल्यात काय मिळाले? लाभ कुणाला झाला? ब्रिटिशांना शेड्युल्ड कास्ट्स च्या लोकांनी मदत केलेली असतांनाही त्या पासून ब्राम्हण आणि सवर्ण हिंदूंनी पूर्ण लाभ उपटले. ब्रिटिशांनी त्यांच्याच मुलांना शिकविले आणि सर्व प्रकारची आर्थिक मदत त्यांनाच दिली व आपल्या लोकांकडे मुळीच लक्ष देण्यात आले नाही. याचा परिणाम असा झाला की, गरीब बिचाऱ्या शेड्युल्ड कास्ट्स च्या लोकांच्या जीवावर सवर्ण हिंदू संपन्न झाले आणि अस्पृश्य लोक जसेच्या तसे राहिले.आज पर्यंत शेड्युल्ड कास्ट्स चे कुटुंब सुसंपन्न का नाहीत, त्यांची मुले शिक्षित का नाहीत आणि ते मागासलेले का आहेत याचे हेच कारण होय. परिणामतः सैन्यातील, पोलीस दलातील आणि प्रशासकीय खात्यातील महत्वाची पदे सध्या सवर्ण हिंदूंच्या हातात आहेत. ब्रिटिश लोकांनी आमच्या उन्नती साठी काही तरी करावयास पाहिजे होते परंतु त्यांनी आमच्यासाठी काहीही केले नाही. 1858 मध्ये बंड झाले. त्या बंडाची कारणे काय होती? कारण आमच्या लोकांसाठी काही तरी करण्यास ब्रिटिश लोक चुकले; सैन्यातील आमच्या लोकांना त्यांच्या विरुद्ध बंड करणे भाग पडले. जेव्हा हे बंड आटोक्यात आले आणि असे दिसून आले की सैन्यातील आमच्या लोकांची सैन्यामध्ये भरती करणे बंद केले. त्यांच्याऐवजी हिंदू राजपुतांची सैन्यात भरती करण्यात आली. अशा प्रकारे आपल्या लोकांचे उत्पन्नाचे मुख्य साधन नष्ट झाले.
1947 साली जेव्हा इंग्रजांनी भारत सोडला तेव्हा इंग्रज लोक भारतात येण्यापूर्वी अस्पृश्य ज्या स्थितीत होते त्याच शोचनीय स्थितीत होते. राजसत्तेच हस्तांतरण करते वेळी इंग्रजांनी सर्व सत्ता सवर्ण हिंदूंच्या हाती सोपविली. आपणाला काही सुद्धा मिळाले नाही. ज्यांना न्यायाबद्दल जरा सुद्धा आस्था नाही अशा आमच्या देशवासी हिंदूंच्या दयेवर आम्हाला सोडून देण्यात आले. यावरून गरीब बिचाऱ्या शेड्युल्ड कास्टच्या लोकांना अन्य लोक कशी वागणूक देतात हे तुम्ही समजू शकता. आज पर्यंत आपण मागासलेले का राहिलो आहे याचे हे कारण आहे. आता, मी तुमच्या समोर एक प्रश्न ठेऊ इच्छितो. अजूनही तुम्हाला तसेच मागासलेले राहून सवर्ण हिंदूंच्या हाताखाली गुलाम होऊन राहावयाचे आहे काय? जेव्हा आर्य भारतात आले तेव्हा वर्णव्यवस्था कार्यरत झाली. लोकांना त्यांच्या जन्मावरून सामाजिक दर्जा देण्यात आला. काहींना ब्राम्हण म्हणण्यात आले, काहींना क्षत्रिय, काहींना वैश्य, काहींना शूद्र आणि इतरांना ‘अस्पृश्य’ या श्रेणीनुसार अस्पृश्य सर्वांच्या खालचे आणि समाजापासून पूर्णत: वेगळे होते. सवर्ण हिंदू आणि अस्पृश्य यांच्यातील संबंध पाय आणि जोडा अशा प्रकारचा आहे. आपण जेव्हा घरात शिरतो तेव्हा जोडा घराबाहेरच ठेवतो. त्याचप्रमाणे ‘अछुत’ लोकांना समाजाच्या बाहेर ठेवण्यात आले आणि त्यांना कसल्याही प्रकारचे अधिकार देण्यात आले नाही. सवर्ण हिंदू कडून आम्हाला देण्यात आलेली अपमानकारक वागणूक आम्ही शेकडो वर्षे सहन केली आणि अजूनही सामाजिक,आर्थिक आणि राजकीयदृष्टया होत असलेला जुलूम आम्ही सोशीतच आहोत.
अनेक वर्षे झगडल्या नंतर आपण काही राजकीय हक्क प्राप्त केलेले आहेत आणि त्याचा समावेश खुद्द भारतीय राज्यघटनेतच करण्यात आला आहे. वीस वर्षा इतक्या लांब काळापर्यंत मी महात्मा गांधीच्या विरुद्ध लढा दिला. आपणाला कोणतेही वेगळे अधिकार देण्याच्या कल्पनेच्या ते विरुद्ध होते. त्यांचा युक्तिवाद असा होता की, जर अस्पृश्याना वेगळे हक्क देण्यात आले तर ते हिंदू जीवन पद्दतीत येण्याला कधीही पात्र ठरणार नाहीत. या शिवाय ते नेहमी साठी हिंदुपासून तुटक राहतील. गोलमेज परिषदेतही आमच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीला महात्मा गांधीनी विरोध केला. इतक्या मोठ्या काळा पर्यंत झगडून आपण थोडेसे राजकीय हक्क मिळविलेले आहेत. आता शेड्युल्ड कास्ट्ससाठी राखीव असलेल्या जागेवरून आपण आपले प्रतिनिधी विधानसभा आणि संसदेत पाठवू शकतो.
हे आपले हक्क हिसकावून घेण्यासाठी बरेच पक्ष कार्यरत झालेले आहेत.आपल्या लोकांसाठी राखीव असलेल्या जागेवरून आपले अनुचर निवडून आणण्यासाठी आपली मते त्यांना मिळावीत यासाठी हे पक्ष कार्यरत आहेत. त्यांचा हेतू तुम्ही चांगल्यारीतीने समजू शकता. शेड्युल्ड कास्ट्स चे लोक जेथे आहेत आणि जसे आहेत तसेच त्यांनी राहावे, त्यांनी राजसत्ता प्राप्त करू नये म्हणजे आज आपले लोक करीत असलेल्या तिरस्करणीय धंद्यांची आबाळ होणार नाही असे त्यांना वाटते. येत्या निवडणुकीत तुमच्या माताबद्दल तुम्ही सतर्क राहिले पाहिजे. आमच्या मतांच्या बळावर केवळ आपले खरे प्रतिनिधीच निवडल्या गेले पाहिजेत, दुसरे नाही, याची तुम्ही काळजी घ्यावी.असे झाले तरच तुमचे जे हक्क राज्यघटनेत समाविष्ट झाले आहेत ते सुरक्षित राहतील.
जर आपले खरे प्रतिनिधी विधानसभा आणि संसदेत निवडल्या गेले नाहीत तर आपण स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकणार नाही. आपल्या लोकांकरिता स्वातंत्र्य एक नाटक ठरेल. हे स्वातंत्र्य हिंदू लोकांचे स्वातंत्र होईल, आपणासाठी नव्हे. परंतु जर आपले सच्चे प्रतिनिधी विधानसभा आणि संसदेत असेल तर ते आपल्या हितासाठी लढा देतील आपली दुःखे दूर करतील. फक्त तेव्हाच आपल्या मुलांना योग्य असे शिक्षण मिळेल; फक्त तेव्हाच आपले दारिद्र्य दूर होऊ शकेल आणि तेव्हाच जीवनाच्या सर्व क्षेत्रात आपणाला बरोबरीचा वाटा मिळेल. भारतीय राज्यघटनेत जरी शेड्युल्ड कास्ट्स च्या लोकांना खास हक्क देण्यात आलेले आहेत तरी सुद्धा अन्य पक्ष त्या मध्ये विनाकारण ढवळाढवळ करीत आहे. शेड्युल्ड कास्ट्स साठी राखीव असलेल्या जागांवर निवडणुकीसाठी ते आपले अनुचर उभे करीत आहेत. इतर पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या लोकांना त्यांच्या धन्याच्या इच्छेनुसार वागावे लागते त्यामुळे ते आमच्या हिताचे संरक्षण कसे करू शकतील? आमच्यासाठी ते काय करू शकतील?
(टीप: डॉ.बाबासाहेबांनी आपला जुना राजकीय पक्ष शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन (SCF) बरखास्त करून आपल्याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) हा नवा राजकीय पक्ष जन्मास घालून दिला आहे.)
—-संग्राहक—
उज्वला इंगोले
समता सैनिक दल, यवतमाळ
www.ssdindia.org
(संविधानिक रिपब्लिकन पार्टीच्या पुनर्बांधणी साठी कटिबद्ध)