डॉ.बाबासाहेबांचा आदेश ??
? विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या पंचत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चारित्र्य बनविले पाहिजे?
औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयातील बोधी मंडळाच्या विद्यमाने दि.12 डिसेम्बर1955 रोजी सभा भरविण्यात आली होती. या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या भाषणात प्रथम श्री. शंकरराव देव यांच्या दि.7 डिसेंबर रोजी महाविद्यलयात झालेल्या व्याख्यानातील एका विधानाचा परामर्श घेतला. श्री. शंकरराव देव यांनी आपल्या भाषणात म्हटले होते की “महाविद्यायलयाला केवळ ‘मिलिंद’ हे नाव देऊन भागणार नाही तर अक्रोधाने क्रोध जिंकणाऱ्या बौद्ध शिकवणुकीचाच पुरस्कार तिथे झाला तर मिलिंद हे नाव सार्थ होणार आहे “
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे श्री देवांच्या टिके संबंधी बोलतांना म्हणाले, मिलिंद हा एक ग्रीक राजा होता. त्याला आपल्या विद्धवते बद्दल घमण्ड होती की ग्रीकांसारखे विद्धान लोक जगाच्या पाठीवर कोठेही सापडायचे नाहीत. त्याने जगाला आव्हानही दिले होते. त्याला एकदा वाटले आपण एखाद्या बौद्ध भिक्षु बरोबर वाद करावा. त्याच्याबरोबर वाद करण्यास कोणीही तयार झाला नाही. मिलिंद हा एक क्षुल्लकसा मनुष्य होता. तो काही तत्वज्ञानी नव्हता किंवा जाडा विद्वानही नव्हता. त्याला राज्यकारभार कसा चालवायचा हेच माहित होते. पण अशा मिलिंदाबरोबर वादविवाद करण्यास कोणीही तयार झाला नाही. महाप्रयासाने “नागसेन” भिक्खू ला तयार केलं गेलं. नागसेन हा ब्राम्हण होता. वयाच्या सातव्या वर्षी त्यानं आपल्या आई बापाच घर सोडलं होतं. अशा या नागसेनाने भीक्खु लोकांचा आग्रह मान्य केला. नंतर मिलिंद व नागसेन यांचा वादविवाद होऊन मिलिंदाचा पराजय झाला. त्या वादविवादाच पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. त्या पुस्तकाला पाली भाषेत ‘मिलींद पन्ह’ असे नाव आहे. या पुस्तकाचं मराठीत भाषांतर ‘मिलिंद प्रश्न ‘ असं आहे. या पुस्तकाच शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी अवश्य वाचन करावं. त्यात शिक्षकांच्या अंगी कोणते गुण असावेत हे दिलेले आहे. म्हणून मी व माझ्या सोसायटीने ह्या कॉलेज ला मिलिंद महाविद्यालय हे नाव दिलं व जागेला ‘नागसेन वन’ अस नाव दिल. मिलिंद हरला व बौद्ध झाला म्हणून मी हे नाव दिलेलं नाही. मी जे ह्या कॉलेज ला नाव दिलेलं आहे ते आदर्शभूत असंच आहे.
बौध्द धर्माशी संलग्न झालेले ‘मिलिंद’ हे नाव महाविद्यालयास देण्याचे दुसरे कारण असे की, विद्या हि अन्ना सारखी सर्व मनुष्यास आवश्यक आहे. प्रत्येकाला तिचा लाभ झाला पाहिजे. हा उदार विचार पहिल्यांदा उदघोषीत केला असेल तर तो भगवान बुद्धांनीच. तेव्हा ज्या असंख्य लोकांना कैक शतके अज्ञानात दडपून ठेवण्यात आले त्यांना सुविद्य बनविण्याचा प्रारंभ करताना बुद्धाचे अथवा त्यांच्या शिष्याचे नाव आठवावे हे स्वाभाविकच आहे .
श्री. शंकरराव देवांनी या कॉलेजला मिलिंद हे नाव दिल्या बद्दल आमच्या धम्मपदातील श्लोक सांगितला आहे. तो असा ‘अक्रोधेंन जेयत् क्रोध !’ मनुष्याने क्रोध हा अक्रोधाने जिंकावा, असे ते म्हणाले. कारण मी अतिशय क्रोधी आहे. हे जगाला चांगलेच परिचित आहे. श्री. देव म्हणतात माणसाने क्रोध गिळला पाहिजे. यावरून वाटते की श्री .देवाच वाचन अपुरं आहे. त्यांनी चांगलं वाचन केलेलं दिसत नाही. भगवान बुद्धांनी ‘राग’ (anger) यावर व्याख्यान दिलं आहे. ते जर देवांनी वाचलं असत तर त्यांनी असले उद्गगार काढले नसते. मनुष्य रागीट असला तर त्याच्यावर टिका करू नये. राग दोन प्रकारचे असतात. 1 द्वेषमूलक 2 प्रेममुलक. जो कसाई असतो तो कुऱ्हाड घेऊन जातो. त्याचा राग हा द्वेषमूलक असतो. आईने आपल्या मुलाला चापट मारली तर तिला कोण काय म्हणेल? तिचा राग असतो तो प्रेममूलक असतो. मुलाने सदाचारी व्हावं म्हणून आई मुलाला मारीत असते. माझा रागहि प्रेममुलक आहे.
विद्या एक प्रकारची तलवार आहे. ही दुधारी असते. तिने दृष्टाचा संहार हि करता येतो व दृष्ट्रांपासून आपले रक्षणही करता येते.
तुम्ही सर्वजण विद्या शिकण्यासाठी आला आहात ; पण माझ्या मते केवळ विद्याच पवित्र असू शकत नाही. विद्येबरोबर भगवान बुद्धांनी सांगितलेली प्रज्ञा म्हणजे शहाणपणा, शील म्हणजे सदाचारणांन संपन्न अस आचरण, करुणा म्हणजे सर्व मानव जातीसंबंधी प्रेमभाव आणि मैत्री म्हणजे सर्व प्राणिमात्रविषयीची आत्मीयता. या चार पारामिता असल्या पाहिजेत. तरच विद्वते चा काही उपयोग आहे. विद्येंबरोबरच मानवा जवळ जर करुणा नसली तर तो कासाई आहे असे मी समजतो. करुणा म्हणजे माणसामाणसावरच प्रेम ! ह्याच्यापुढेही मनुष्य गेला पाहिजे व त्याने मैत्री संपादन केली पाहिजे. हि विचारसरणी जर कोणी मांडली असेल तर ती भगवान बुद्धांनीच होय.
जगात काही माणसे भित्री असतात. माणसाने एकट जगण्याचं धैर्य केलं पाहिजे. एकट जगण्याचं धैर्य मी करतो. हजारो लोक जरी माझ्या मागे नसले तरी मी त्याची पर्वा करीत नाही किंवा खंत हि बाळगीत नाही.
एक डॉ. पिक्विक त्याचे चार मित्र होते तो आपल्या मित्रांना म्हणाला की, मी तुम्हाला जत्रा दाखवितो. तो आपल्या मित्रासह एका गावात गेला व तेथे त्यांनी दोन तीन खोल्या राहण्यासाठी घेतल्या. त्या गावात इलेक्शन होत. डॉ.पिक्वीक च्या कंपनी ला सॅम वेलर नावाचा पोरगा त्याच्या जवळ त्याची सेवा करण्यासाठी ठेवण्यात आला होता. निवडणुकीची धामधूम ऐकल्यावर तो त्या खोलीतून बाहेर बघण्याचा प्रयत्न करू लागला व त्याने दरवाजा उघडण्यास व लावण्यास सुरुवात केली भित्र्या डॉ. पिक्विक ने विचारले की, “what are you doing there?”(तू तिथे काय करतो आहेस ?) त्याने ऊत्तर दिले की ” there is a big crowd, sir”.( सर तिथे मोठा जमाव आहे ?) सॅम वेलर बाहेर जाण्याची धडपड करू लागला. तेव्हा डॉक्टरने त्याला बजावलं कि go with bigger crowd and not with little one. ( मोठ्या जमावा सोबत जा, लहाना सोबत जाऊ नकोस.) आणि पुन्हा अस सांगितलं की “मोठा जमाव जिकडे जाईल तिकडे जा, अथवा त्याच्या मागे जा” माझे मात्र तुम्हाला असे सांगणे आहे की, केवळ अशा प्रकारच्या ‘जमावा’ मागे जाऊ नका.
विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या पंचतत्वानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनविले पाहिजे आणि या मार्गाने एकट्यानेच जावे लागले तरी मनोधैर्य व निष्ठा राखून गेले पाहिजे. ‘महाजनो येन गत: सपंथ: हि पर प्रत्ययनेय. बुद्धी सोडून विवेकाने, जो मार्ग आपणास योग्य वाटेल त्याच मार्गाने या पुढे गेल पाहिजे . (संदर्भ vol 18/3)
??जय भिम??
——संग्राहक——-
उज्वला इंगोले
समता सैनिक दल, यवतमाळ
www.ssdindia.org
(रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणी साठी कटीबद्द)