शिकवा,चेतवा आणि संघटित करा !
संग्राहक : नितीन गायकवाड (www.ssdindia.org)
१९२६-२७ च्या सुमारास या दलाची स्थापना करण्याची मुहूर्तमेढ महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने करण्यात आली. यावेळी महाडच्या सत्याग्रहाचे कार्य निर्विघ्नपणे आणि यशस्वीरीतीने पार पाडण्यासाठी अशा संघटित दलाची फारच आवश्यकता होती. आम्ही स्थापन केलेल्या या समता सैनिक दलाची पूर्वपिठीका पाहता व एकंदर परिस्थितीचा विचार करता दलाची स्थापना मी माझ्या नावाकरिता, जयजयकाराकरिता किंवा बुवाबाजीच्या स्वरुपाच्या कार्याकरिता केलेली नाही. याला सरळ रोखठोक उत्तर महाड तलावाच्या लढ्याने सहज मिळण्यासारखे आहे. हिंदुस्थानात जे अनेक धर्मीय समाज आहेत त्यात हिंदू समाजात अस्पृश्य मानलेल्या समाज बांधवांवर, होणा-या अन्याय, जोर- जुलुम, विषमतेची शिकवण व वागणूक वगैरे अनिष्ट आणि घातुक प्रकारांना आळा बसविण्यातकरिता या दलाची प्रामुख्याने स्थापना करण्यात आली आहे. ज्या समाजात माणुसकीने जगता येत नाही, नैसर्गिक हक्कांचा जिथे समतेने उपयोग घेता येत नाही,ज्या धर्मावर विषमतेचा कीट चढला आहे. तो धर्म झुगारून देऊन खरी माणुसकी जाणणारा धर्म निर्माण करण्याकरिता जे कार्य करावे लागत आहे, त्या पवित्र आणि उज्ज्वल कार्यसाठी या दलाची स्थापना झालेली आहे. या कार्याची मुहूर्तमेढ महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने करुन हा सत्याग्रहाचा लढा विजयी केला आहे.
समता सैनिक दलाचे संस्थापक
डॉ बाबासाहेब आंबेडकर
संदर्भ:-
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणे खंड १८, भाग,२ पान नं. २४३,२४४