💥 ब्राह्मणी सणोत्सव आणि बौद्धांची भूमिका 💥
मित्रांनो,
सर्वत्र साजरी करण्यात येणाऱ्या उधळपट्टीच्या दिवाळी सणाबाबत (हिंदू बांधवांच्या अनेक सणांपैकी एक मोठा सण, त्याद्वारे होणारे फायदे किती व तोटे किती हे त्या काळात होणाऱ्या नुसत्या ध्वनी-वायू प्रदूषणाचा अंदाज घेतला तरी ‘स्वच्छ भारत अभियानास’ काम मिळवून दिल्याचा आनंद दिवाळी साजरी करणाऱ्यांना झाल्यावाचून राहणार नाही एवढे मात्र नक्की !) काहीसा खोलवर विचार करता, एक बाब आपल्यापुढे मांडाविशी वाटते ती अशी की, बाबासाहेबांनी ‘प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती’ या भारताच्या इतिहासावर लिहिलेल्या संशोधनपर ग्रंथात कुठेही दिवाळी, दीपदानोत्सव किंवा बळीराजा याच्या अस्तित्वाविषयी काहीच लिहिलेले आढळत नाही. दुसरे असे की बाबासाहेबांनी या देशाच्या इतिहासाविषयी सांगतांना असे स्पष्ट केले आहे की “भारताचा इतिहास दुसरा-तिसरा काहीही नसून बौद्धवाद (Buddhism) आणि ब्राह्मणवाद (Brahmanism) यांच्यातील मरणांतिक संघर्षाचा इतिहास आहे.” ज्याला दुसऱ्या शब्दांत क्रांती (Buddhism) आणि प्रतिक्रांतीचा (Brahmanism) इतिहास म्हटल्या जातो. तेव्हा आता इतिहासाच्या अवलोकनातून ज्ञात झालेले आमच्यापुढे बौद्धवाद आणि ब्राह्मणवाद हे दोनच विकल्प उभे राहतात ज्यांपैकी आम्ही विषमतावादी ब्राह्मणवाद नाकारून समतावादी बौद्धवाद स्वीकारला आहे आणि क्रांतीचा मार्ग अवलंबविला आहे आणि हा मार्ग अवलंबवितांना आम्हाला बाबासाहेबांनी बौद्ध धम्माच्या अनुषंगाने ‘समाजाची आणि तात्पर्याने जगाची पुनर्रचना’ (Reconstruction of the world) करायला सांगितले आहे. तेव्हा जुन्या ब्राह्मणी-हिंदुत्वाच्या रुढीवादी, परंपरा, सणोत्सव यांना मूठमाती देऊनच ‘नवनिर्मितीकडे आपली वाटचाल असावयास हवी’ असे कोणत्याही नवदीक्षित बौद्ध व्यक्तीस वाटणे स्वाभाविक आहे. त्याला कारणही तसेच आहे. कारण विषमतावादी ब्राह्मणवाद हा इतका संसर्गजन्य आहे की जरी इतिहास काळातील काही पुराव्यानिशी आपण मागेपुढे दिवाळी वा दीपदानोत्सव अशा सणांचा सहसंबंध बौद्ध संस्कृतीशी जोडण्यात यशस्वी झालो तरीही पिढ्यानपिढ्या हिंदुत्वाच्या जोखडाखाली या देशात जो सांस्कृतिक ब्राह्मणवाद पसरविल्या गेला आहे त्याला आपण कितीही शुद्ध करून अंगिकारतो म्हटले तरीही त्यांचे अंश आम्हाला आता हानिकारकच होणार. जसे बुद्धाने ब्राह्मणवादाविषयी म्हटले आहे की, “ब्राह्मणवादात सुधारणा करता येणे शक्य नाही, तो फक्त संपविणेच शक्य आहे.” (It can not be amended, it can only be ended. संदर्भ-TBHD) तेव्हा आपण या सर्व बाबींचा अगदी गांभीर्याने विचार केला तर मला असे जाणवते की, आपण दिवाळी वा दीपदानोत्सव हे जर बौद्ध संस्कृतीशी जुडलेला सणोत्सव म्हणून मान्य केला तर मग जसे या देशात जैन, शीख धर्मियांचे वेगळे धर्मवादी अस्तित्व असतांनाही आजघडीला ब्राह्मणवादाने त्यांना जसे व्यापून गिळंकृत केले आहे आणि ते धर्मही आता ब्राह्मणी-हिंदू संस्कृतीचाच एक भाग म्हणून आपणांस वास्तविकतेत दृष्टीस पडताहेत तशीच काहीशी आपली अवस्था होण्याचा मोठा संभाव्य धोका नाकारता येत नाही. तेव्हा आपली (बौद्धांची) भूमिका हि खंबीर असावयास हवी. आम्ही तडजोडीचा मार्ग अवलंबून ‘समरसतेत’ सामील होता कामा नये. ‘नवनिर्मिती’ हेच आम्ही सूत्र अवलंबिले पाहिजे.
पांडुरंगाची मूर्ती हि बुद्धाची मूर्ती आहे असे बाबासाहेबांनी जरी आम्हास सांगितले पण आम्हाला त्या पांडुरंगाच्या चरणी लोळायला आणि त्याच्या वाऱ्या करा म्हणून त्यांनी कदापिही उपदेश केलेला नाहीये. आपल्या अनुयायांना ते खडसावून प्रश्न विचारतांना म्हणतात, “आपल्या लोकांत देवभोळेपणा फारच शिरला आहे. जो तो उठला सुटला पंढरी-पैठण-आळंदीला जातो. मला आपणांस हे विचारावयाचे आहे की पंढरी-पैठण-आळंदीला जाऊन आपण काय मिळविले आहे ? पंढरीला जाऊन कोणाचे भले झाले आहे काय? किंवा आळंदीला जाऊन कोणाचा उद्धार झाला आहे काय ?…
दुसरे ज्ञानेश्वराने तरी काय केले ? त्याने भगवदगीतेवर ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचे सार काय ? तर जग हे ब्रह्ममय आहे. जर जग ब्रह्ममय आहे तर महार मांगातही ब्रह्म असायला पाहिजे. मग ज्ञानेश्वर महारा-मांगात का राहिला नाही. ब्राह्मणाने त्यास परत घ्यावे म्हणून त्याने प्रयत्न का केला ? ब्राह्मणाने त्यास वाळीत टाकल्या नंतर त्याने त्यांना सांगायला पाहिजे होते की मी महारा-मांगात जावून राहीन कारण सर्व जग ब्रह्ममय आहे. पण असे त्याने सांगितलेले नाही.
सर्वसाधारण जनतेला भूलविन्यासाठी हे सर्व थोतांड आहे आणि या थोतांडाला तुम्ही सर्व भुललेले आहात. तेव्हा तुम्ही पंढरी किंवा जेजुरी किंवा दुसऱ्या कुठल्या देवाच्या नादी लागलात तर तुम्हाला वाळीत टाकण्याचा हूकूम मला द्यावा लागेल. त्याच्याशिवाय तुमचा देवभोळेपणा जाणार नाही आणि तुमची सुधारणाही होणार नाही. आजचे युग हे विचारांचे युग आहे. कसलेही थोतांड रचले तरी ते थोतांड आहे हे तुम्हाला ओळखता आले पाहिजे.” (संदर्भ-खंड १८/३) किती हे प्रेरणादायी डोळे उघडणारे विचार !
ऐतिहासिक संशोधनांन्वये तर तिरुपती बालाजी, जगन्नाथ पुरी इत्यादी ठिकाणी बौद्ध संस्कृतीचाच ठेवा होता हे जरी इतिहासातून सिद्ध होऊ शकणारे असले तरीही आता मात्र आपण त्याच्या मागे लागून ब्राह्मणवादी संस्कृतीची घाण कुठपर्यंत साफ करीत राहण्यात स्वतःला धन्य मानायचे? आणि मुख्य म्हणजे या सर्व बाबींचा आपल्या धम्माशी (मनुष्या-मनुष्यातील सदाचारी व्यवहार) काय संबंध? कारण आपला विषय मानवकल्याणाचा (धम्म) आहे. मनसंवर्धनाचा आहे, मनोरंजनाचा नाहीये. बुद्धाचा परिवर्तनवाद स्वीकारून नवनिर्मितीकडे वाटचाल करणे आणि जगाची पुनर्रचना करणे हाच एकमेव तोडगा आम्हा नवा-जन्म घेतलेल्या, बौद्ध झालेल्या आंबेडकरी समाजबांधवांपुढे आहे. तेव्हा आम्ही राजकीय बहुजनवादाच्या (जाती जोडो मानसिकतेला बळी पडून समरस होण्याच्या) भानगडीत न पडता क्रांतिकारी बौद्धवादाचेच पाईक झालो पाहिजे आणि ज्या-ज्या विषयांना ब्राह्मणवादी संसर्ग झालेला असेल त्याला बाजूला सारून विवेकवादी बौद्ध सांस्कृतिक बाबींची नव्याने या देशात पायाभरणी केली पाहिजे हेच यांतून आपणांस सुचवावेसे वाटते. याचे कारणही अगदीच स्पष्ट आहे. सामाजिक सांस्कृतिक दृष्ट्या आपला जो आजवर ऱ्हास होत आला त्याला मुख्य कारण म्हणजे वैदिक-ब्राह्मणी-हिंदू धर्म संस्कृती ! तेव्हा या विषमतावादी संस्कृतीचा एकूणच त्याग करून बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करणे हेच धर्मांतरित बौद्धांचे आद्यकर्तव्य आहे.
बौद्ध धम्माचे पुनरप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “हिंदू सण, उत्सव, परंपरा, प्रथा मानून तर आपण जातीयवादी जोखडात अडकून पडलो होतो व भिकाऱ्यापेक्षाही वाईट अवस्था आपली झाली होती. म्हणून तुम्हाला मी बौद्ध धम्माकडे प्रगतिशील वाटचाल करण्यास नेत आहे. परंतु जर तुम्ही पुन्हा त्या वाटेकडे जात असाल तर समजून घ्या तुमचे जुने दिवस लवकर येण्यास जास्त दिवस लागणार नाही. तसेच यातून तुम्हाला परत मुक्त करण्यासाठी मी पुन्हा जन्म घेणार नाही.” सदर विचार लक्षात घेतले की, आपल्या अधोगतीची व उद्धाराची नेमकी कारणे कशात दडली आहेत हे आपल्या डोळ्यांपुढे उभी राहतात. बौद्ध धम्माच्या रुजवणुकीच्या दृष्टीने काय योग्य, काय अयोग्य हे सुज्ञ बौद्ध जणांनी लक्षात घेऊन आपली सांस्कृतिक वाटचाल केली पाहिजे. ही वाटचाल करीत असतांना कसल्याही प्रकारची सांस्कृतिक भेसळ आपण खपवून घेता कामा नये. इतिहासकाळात या देशात अशीच सांस्कृतिक भेसळ करण्यात आली आहे. ती भेसळ दूर सारून आपली वाटचाल कशी असावी यांवर मार्गदर्शन करतांना बाबासाहेब म्हणतात, “हिंदू धर्म नाल्यासारखा आहे. दोन नाल्यांचा मिळून संगम होतो व त्याचा तिसरा नाला बनतो. तसा हिंदू धर्म त्या नाल्यासारखा झाला आहे. एका नाल्यातले पाणी स्वच्छ असते व दुसऱ्यातील घाणेरडे असते. या दोहोंचा संगम घाणेरडा. तसेच हिंदू धर्माच्या नाल्यात दोन तऱ्हेचे पाणी वाहून आले आहे. स्वच्छ असा बौद्ध धर्माचा नाला आणि ब्राम्हणी धर्माचा गलिच्छ नाला. या दोहोंच्या संगमामुळे हिंदू धर्माचा नाला घाणेरडा झाला आहे. त्यातील घाणेरडे आणि स्वच्छ पाणी निराळे केले पाहिजे. तरच घाण साफ करता येईल.
येथील भिक्षुमित्रांने सांगितले की, पुष्कळ लोकांना दीक्षा घ्यावीशी वाटते पण त्यांना मी सांगितले की बौद्ध होणे सोपं नाही. म्हणून मी आणि माझे लोक मिळून आम्ही काही नियम करणार आहोत. ते नियम जे लोक पाळतील त्यांनाच दीक्षा दिली पाहिजे. बुद्ध धर्माची दीक्षा घेतल्यावर तुम्हाला हिंदू धर्मातील मते आणि दैवते बुद्ध धर्मात आणता येणार नाही. घरात खंडोबा व बाहेर बुद्ध चालणार नाही. शिवाय ज्या हिंदू लोकांना दीक्षा घ्यावयाची असेल त्यांनी हिंदू धर्माच्या दुष्कृत्याचा त्याग केला पाहिजे. जातीला मानणारे लोक बौद्ध होतात व बौद्ध धर्माचा ब्राम्हणी धर्म बनवतात व बौद्ध धर्माचे मूळच नाहीसे करतात. सर्व वाईट चाली बरोबर घेऊन तुम्हाला बौद्ध धर्मात येता येणार नाही. ज्यांना सवड असेल त्यांनी येथे यावे व बौद्ध धर्म शिकावा व त्यानंतर त्याचा स्वीकार करावासा वाटला तर करावा. नाही तर बारा भाईची खिचडी करून चालायचे नाही. फक्त बुद्ध धर्मच पाळा इतर काही नाही.” (संदर्भ-खंड १८/३)
तेव्हा मित्रांनो, वरील सर्व बाबींबर सारासार विचार करून बौद्ध धम्माच्या संस्कृतीचे नवसृजन करतांना आपण विशेष काळजी घेतली पाहिजे. आपल्या चळवळीचा प्रवास उलट दिशेने होणार नाही याची दक्षता बाळगून मार्गक्रमण केले पाहिजे. बाबासाहेबांना धर्मांतराच्या आदल्या दिवशी पत्रकारांनी असा प्रश्न विचारला की, “आपण बौद्ध धर्मातील हीनयान पंथ स्वीकारणार आहात की महायान?” तेव्हा बाबासाहेब पत्रकारांच्या सभेत स्पष्ट सांगून टाकतात की, “माझा बौद्ध धर्म हा ‘हीनयान’ व ‘महायान’ या दोन्ही रूढ पंथाहून भिन्न आहे. वाटल्यास त्याला तुम्ही ‘नवयान’ म्हणा.” यावरून हे स्पष्ट होते की, बाबासाहेबांची बौद्ध धर्मासंबंधीत सांस्कृतिक वाटचाल ही भेसळयुक्त परंपरागत पद्धतीची नसून नवसृजनकर्ती आहे. बौद्ध धर्माची नव्याने, शास्त्रशुद्ध, तार्किक, विज्ञानवादी, बुद्धिसंगत व अत्यंत वास्तववादी वाटचाल करणारी आहे. बाबासाहेबांचे अनुयायी त्यांच्या दिशानिर्देशान्वये वाटचाल करून देशास प्रबुद्ध भारत करण्यासाठी अधिकाधिक कटिबद्ध होऊन या उदात्त कार्यात झोकून देतील असा आम्हास आपल्या बांधवांप्रति विश्वास वाटतो. त्यांच्या वाटचालीस अनेक मंगल कामना !
(मूळलेखन : ऑक्टोबर २०१६)
पुनर्लेखन : दि. ८ नोव्हेंबर २०१८
प्रशिक आनंद,
भारतीय बौद्ध महासभा, नागपूर
(रिपब्लिकन चळवळीच्या घटनात्मक पुर्णबांधणीसाठी कटिबद्ध)
टीप: वाचकांनी वरील लेख हिंदूंच्या सणानुरूप बदल करून (दिवाळी, दसरा, होळी, नागपंचमी इत्यादीसारखे सण लक्षात घेऊन) वाचावा.