? ज्या वृक्षाच्या छायेखाली गुण्यागोविंदाने बसावयाचे आहे, त्या छायेच्या फांद्या तोडण्याचा दुष्टपणा करु नका?
संकलन: नितीन गायकवाड
खरे पाहिले असता मला या कायदे मंडळात जाण्यापेक्षा कायदे मंडळाच्या बाहेर राहुन कार्य करण्यात अधिक बरे,असे वाटते. माझ्यापुढे आज धर्मांतराचा प्रश्न आहे. नवीन कॉलेजची काळजी आहे व इतर बरीच सार्वजनिक कामे आहेत. तरीसुद्धा आपणा सर्वाच्या इच्छेसाठी मी या नवीन पक्षाच्या संगनमताने कायदे मंडळात शिरण्याचा संकल्प केला आहे. माझी पुर्ण खाञी आहे की, माझ्या या संकल्पात काँग्रेस काटे पेरल्याशिवाय राहणार नाही. पैशाच्या बळावर काँग्रेस मला विरोध करण्याचे अनेक प्रकारचे प्रयत्न करील व आज त्यांनी त्याप्रमाणे प्रयत्न चालविले आहेत. यासाठी आपण सर्वांनी शिस्तीने संघटित झालो पाहिजे आणि आपली प्रत्येकाची सर्व मते यावेळी मला मिळाली पाहिजेत. मी निवडून येण्यासाठी तत्त्वापासुन ढळणार नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. आपणास कुणी मदत करणार नाही आणि अशावेळी फंदाफितुरीच्या मोहाला तुम्ही बळी पडता कामा नये. ज्यांना उमेदवार म्हणून घेता आले नाही असे असंतुष्ट लोक फंदाफितुरीच्या मार्गाला लागलेले आहेत. त्यांच्या फंदफितुरीला केवळ स्वाभिमानासाठी तरी बळी पडू नका. तुम्ही विचार करा की, ज्या वृक्षाच्या छायेखाली आपणास गुण्यागोविंदाने बसावयाचे आहे, ज्या वृक्षाच्या छायेने आपणास पूर्ण समाधान मिळणार आहे ती छाया तुम्ही नष्ट करण्याचा, ह्या छायेच्या फांद्या कु-हाडीने तोडुन टाकण्याचा दुष्टपणा करणार नाही अशी मला खाञी आहे. स्वार्थाला, लोकांच्या चिथावणीला बळी पडून जे. आज अविचाराचे आणि दुष्टपणाचे कृत्य करावयास प्रवृत्त झाले आहेत त्यांच्यापदरी यश कितपत मिळेल याबद्दय शंका आहे,परंतु ते आज आपलीच कु-हाडी आपल्याच पायावर मारुन घेत आहेत.या सर्वप्रकारच्या कारवायापासुन अलिप्त राहुन मी माझ्या सहका-यांच्या मदतीने जो कार्यक्रम ठेवीत आहे तो तुम्ही, समता सैनिक दलातील प्रत्येक सैनिकानी शिस्तीने पार पाडला पाहिजे.
आपल्याला ब-याच बलाढ्य शञुंशी टक्कर द्यावयाची आहे. यासाठी कमीत कमी दोन हजार सैनिकांची उभारणी या मुंबई शहरात झाली पाहिजे. आपल्याजवळ मुबलक मनुष्यबळ असल्यावर, शिस्तीच्या व संघटनेच्या बळावर वाटेल त्या बिकट परिस्थितीत मार्ग काढणे कधीही कठिण झाले नाही. माझ्या निवडणुकीबाबत काँग्रेस व इतर हितशञू पुष्कळ प्रकारची कारस्थाने रचुन, माझा त्यांच्या मार्गातील काटा काढुन टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत.माझी खाञी आहे की, माझ्या निवडणुकीच्या वार्डातील प्रत्येक अस्पृश्य मतदार मला मत दिल्याशिवाय राहणार नाही आणि हे कार्य समता सैनिक दलाने प्रत्यक्ष हाती घेऊनच करावयास पाहिजे आणि माझी खाञी आहे की, माझ्या गैरहजेरीत हि मोठी जबाबदारी समता सैनिक दलाचा प्रत्येक शिस्तीचा शिपाई इमाने-इतबारे पार पाडील. मी या कार्यासाठी एक कमिटी नेमली आहे. तिच्या मदतीने तुम्हास तुमचे कर्तव्यकर्म पार पाडता येईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
संदर्भ:-
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणे खंड १८, भाग, १ पान नं. ५६२,५६३
समता सैनिक दल
HQ : दिक्षाभूमी, नागपूर
www.ssdindia.org
(संविधानीक रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणीसाठी कटिबध्द )