-जनज्ञानार्थ जारी–
? महाडच्या सत्याग्रहात रोवलीत रिपब्लिकन पार्टीची बीजे.?
A post written by,
–Prashik Anand–
सप्रेम जय भीम मित्रांनो,
खरे तर विषयाचं शीर्षक बघून रिपब्लिकन पार्टी चा द्वेष करणाऱ्या भल्याभल्यांना जरा धक्काच बसला असेल किंबहुना पायाखालची जमीन तरी सरकल्यासाखे वाटणे स्वाभाविकच आहे, नाही का?? त्याला कारणही तसेच आहे…कारण महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह हा तर फक्त पिण्याच्या पाण्यासाठी केलेला संगर होता असे प्रथमदर्शनी वाटणाऱ्यांकडून आपण आणखी काय अपेक्षा करणार?? एवढेच नव्हे तर त्या महाडच्या संगरात रिपब्लिकन आंदोलनाची बीजे कशी काय रोवली गेली आहेत यावर दृष्टीक्षेप टाकणे काही ऐऱ्या-गबाळ्याचा खेळ नव्हे…त्यासाठी सम्यक दृष्टीचीच गरज भासते..आणि ती दृष्टी काही अपवाद वगळता आजच्या धर्मांतरित आंबेडकरी बौद्ध (पूर्वाश्रमीच्या महारवंशीय) लोकांमध्येच आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाहीये. नव्हे, त्यांच्या रक्तातच रिपब्लिकनची बीजे पहावयास मिळतात. त्यासाठी मनुवादी हिंदू बहुजनांनी जन्म घेवून आम्हास काय तो शहाणपणा शिकवू नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी साठी लिहिलेल्या जगातील सात सर्वश्रेष्ठ तत्वांचा आधी सखोल अभ्यास करावा..ज्यातील पहिले तत्व आम्हास सांगते कि, “ सर्व भारतीय लोक कायद्यासमोर समान न्याय ( equal before law ) व दर्जाचे हकदार आहेत असे पक्ष मानेल. एवढेच नव्हे तर प्रत्येक भारतीयास ‘समान न्याय हे त्याचे जीवनमूल्य’ प्राप्त करून घेण्याचा त्याचा हक्क आहे. म्हणून जेथे समता नाही तेथे ती आणण्यासाठी पक्ष झटेल व जेथे समता नाकारण्यात येते तेथे ती राबविण्यासाठी पक्ष लढा देईल.” किती उद्दात्त, किती थोर हे तत्व !!!
आपल्या चळवळीच्या इतिहासात डोकावून पाहिले असता आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मनुस्मृतीदहन दिवशीचे २५ डिसेंबर १९२७ चे महाड सत्याग्रह परिषदेतील ऐतिहासिक अध्यक्षीय भाषण दुर्लक्षून चालणार नाही, इतकेच नव्हे तर ते भाषण रिपब्लिकन क्रांतीची प्रेरणा देण्यासाठी कसे अभूतपूर्व आहे याबद्दल कोणासही शंका घेता येणार नाही. याप्रसंगी १९ मार्च १९२७ च्या महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला स्मरून बोलतांना बाबासाहेब म्हणतात कि, “ सत्याग्रह कमिटीने आपणास महाडला बोलाविले आहे ते महाडच्या चवदार तळ्याचे पाणी पिण्याकरिता बोलाविले आहे, असा आपला समज होऊ देऊ नका. चवदार तळ्याचे पाणी प्याल्याने तुम्ही-आम्ही अमर होऊ अशातला काही भाग नाही. आजपावेतो चवदार तळ्याचे पाणी प्यालो नव्हतो तरी तुम्ही-आम्ही काही मेलो नव्हतो. चवदार तळ्यावर जावयाचे ते केवळ त्या तळ्याचे पाणी पिण्याकरिता जावयाचे नाही. इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरिताच त्या तळ्यावर आपणास जावयाचे आहे. म्हणजे हि सभा समतेची मुहूर्तमेढ रोवण्यासाठीच बोलाविण्यात आली आहे….” यावरून असे लक्षात येईल कि चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा, वापरण्याचा आमचाही तितकाच अधिकार आहे जितका ब्राह्मण, ब्राह्मणेतरांचा…तेव्हा सर्व मनुष्यमात्रास ‘समान न्याय’ हेच नैसर्गिक तत्व लागू व्हावयास हवे..या तत्वाच्या अंमलबजावणीसाठी आम्ही क्रांतीचे रणशिंग फुंकले.
बाबासाहेबांनी पुढे फ्रांस मध्ये झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीचा उल्लेख करीत ‘महाड सत्याग्रह परिषद’ आणि फ्रान्समधील व्हर्साय मुक्कामी ता. ५ मे सन १७८९ रोजी भरलेल्या फ्रेंच लोकांच्या ‘क्रांतिकारक राष्ट्रीय सभेत’ कसे मोठे साम्य आहे हे विशद करतांना फ्रेंच लोकांच्या क्रांतिकारक राष्ट्रीय सभेने पुढे जे तीन जाहीरनामे ता. १७ जून १७८९ ला काढलेत त्याचा विशेषत्वाने उल्लेख केला. ज्यात पहिला हा तेथील त्रैवर्णिक धर्मसबंधाने होता तर दुसरा जाहीरनामा धर्मोपदेशक संबंधाने होता, तर तिसरा सामाजिक व्यवस्थेसंबंधाने होता. यापैकी तिसरा जाहीरनामा हा अत्यंत महत्वाचा असा जाहीरनामा आहे, एवढेच नव्हे तर त्यास जाहिरनाम्यांचा राजा असे ते संबोधतात. त्यात एकूण १७ कलमे आहेत त्यापैकी महत्वाची ६ कलमे त्या सभेत सांगतात. ज्यातील खालील दोन येणेप्रमाणे आहेत. १) सर्व माणसे जन्मतः समान दर्जाची आहेत; व ती मरेपर्यंत समान दर्जाचीच राहतील. लोकहिताकारणेच त्यांच्या दर्जात अंतर करता येईल. येरवी, त्यांचा समान दर्जा तसाच कायम राहिला पाहिजे. २) वरील जन्मसिद्ध मानवी हक्क कायम राहावेत हाच राजकारणाचा अंतिम हेतु असला पाहिजे. हि दोन्ही कलमे ‘समान न्याय व दर्जाच्या हक्काविषयी’ भूमिका स्पष्ट करतांना दिसतात..इतरही उर्वरित कलमांविषयी गांभीर्याने चिंतन-मनन केले असता आपल्या असे लक्षात येईल कि बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या मुक्ती संग्रामात आपल्या भाषणातून मांडलेला फ्रेंच राज्यक्रांतीचा जाहीरनामा ज्यात ‘समान न्याय’ या तत्वाला मानवीमूल्य (जीवन जगण्याची पद्धत) आधारभूत मानले गेले आहे त्याच तत्वाचा स्वीकार करून ‘समान न्याय’ हे पहिले तत्व रिपब्लिकन पार्टी साठी लिहिलेल्या जगातील सात सर्वश्रेष्ठ तत्वांपैकी पहिल्या क्रमांकावर स्वीकारले. एवढेच नव्हे तर ते तत्व मानवी मूल्य म्हणून जेथे अस्तित्वात नाही तेथे ते प्रस्थापित करण्यासाठी झटले पाहिजे आणि जेथे ते नाकारण्यात येते तेथे ते प्राप्त करण्यासाठी प्रखर लढा दिला पाहिजे अशी ठाम भूमिका वठविण्याची प्रेरणा दिली.
पुढे जसजसा बुद्धधम्माचा अभ्यास अधिकाधिक दृढ होत गेला तेव्हा ‘समान न्याय’ हे तत्व बुद्धांनी सांगितलेल्या मानवमुक्तीच्या तत्वांपैकी एक म्हणून जगापुढे मांडले. तेव्हा हे चांगले लक्षात असू द्या मित्रांनो कि, रिपब्लिकन पार्टी ची पायाभरणी इतक्या मजबुत तत्वांवर आधारित आहे कि ती जरी वरवर आपणास मरणासन्नवस्थेत दिसत असली तरी त्याची पाळेमुळे मात्र जिवंतच आहेत आणि सदैव जिवंत राहतील..कारण बाबासाहेब त्यांच्या दि. १५ ऑक्टोंबर १९५६ च्या भाषणात सांगतात कि ‘तत्वे नेहमी अजरामर असतात.’ आपण रिपब्लिकन आंदोलनाचा पिंपळवृक्ष फुलविण्यासाठी कंबर कसून पुढे आले पाहिजे एवढेच या महाडच्या सत्याग्रहांच्या आठवणीनिम्मित आपणास आवाहन करून सांगावेसे वाटते.
जय भीम. ??
(ता.२४ मार्च २०१६)
प्रशिक आनंद
समता सैनिक दल,
HQ, दीक्षाभूमी, नागपूर.
www.ssdindia.org
(संविधानिक रिपब्लिकन पार्टी च्या पुनर्बांधणी साठी कटिबद्ध)