महापुरुष आणि समाजसुधारक यातील फरक
Post By : Aayu. Sushil Jambhulkar.
जातीचे राजकारण करण्यासाठी बहुजन आणि मुळनिवाशी प्रचारकांनी बाबासाहेब आणि बुद्धाच्या प्रतिमेसोबत कुठुन -कुठुन शोधून आणून कित्येक समाज सुधारक एका रांगेत बसविलेत.पण या सर्व फोटोंत बाबासाहेब आणि बुद्ध लुप्त झालेत!
महापुरुष आणि समाजसुधारक यांच्यात फरक असतो. बाबासाहेब महापुरुषाला सत्यनिष्ठा आणि बुद्धी या दोन कसोट्या लावितात. जगात ईश्वराचे अस्तित्व नाही. त्यामुळे कोणत्याही ईश्वरप्रणालीत धर्मात जन्म जरी झाला असला ,तरी त्याच अविवेकवादी अमानुष धर्मात मी मरणार नाही ,हा बुद्धीविकासाचा भाग आहे, तर बौद्ध धर्माशिवाय जगाचे कल्याण नाही ही सत्यनिष्ठा होय. ज्या समाजसुधारकांचा समाज सुधारणेचा अंतिम मार्ग बौद्ध धर्माकडे जात नाही, मी त्यांना महापुरुष संबोधू शकत नाही. जे ईश्वर मानतात, जे सत्य नाकारतात किंवा ईश्वर नाकारतात, पण त्या धर्माच्या विरोधात पोहण्याची त्यांची शक्ती त्यांना बुद्ध धम्माकडे घेऊन जात नाही, ते महापुरुष होऊच शकत नाहीत.
महापुरुष तोच होतो ,जो लाखो करोडो लोकांचे दु:ख दुर करतो. अशा व्यक्तीचे वचन वर्तमानातच नाही तर भविष्यातही त्रिकालाबाधीत सत्य असते. असा व्यक्ती हजारो वर्ष जीवंत असतो आणि प्रत्येक पिढीला तो मार्गदाता बनत असतो. समाज सुधारकांचा काळ हा दशकांचा अथवा शतकाचा असतो. ते फक्त ज्या पिढीत ते जन्मतात त्यांचेच मार्गदाते होतात, पण भविष्यात त्यांच्या विचारांचे प्राबल्य हे मनुष्य कल्याणाचे नसते.
त्यामुळे प्रवाहाच्या विरोधात पोहून भारतात फक्त तिनच महापुरुष झालेत. बुद्ध,सम्राट अशोक आणि बाबासाहेब. याखेरीज भारतात कुणिही महापुरुष नाहीत.समाजसुधारक यांच्या बद्दल मला आदर आहे पण ते हिंदू धर्मातच जन्मलेत आणि हिंदू धर्मातच मेलेत. ते त्यांच्या लोकांना हिंदू धर्माच्या गटारीतून काढत जागतिक कल्याणाच्या बौद्ध धर्माकडे घेऊन जाऊ शकले नाहीत.
बहुजन समाज पार्टी आणि बामसेफ यांनी जे इतर जातीचे समाजसुधारक जमा केलेत ते त्यांच्या जातीय राजकारणाच्या पोळ्या शेकण्यासाठी. कोणत्याही समाजसुधारकांची कोणतीही पॉलीसी त्यांनी आजपर्यंत अंमलतात आणली नाही. उलट यामुळे त्यांनी जाती अधिकच घट्ट केल्यात.