? स्वतंत्र बौद्ध विवाह कायदा म्हणजे राष्ट्रप्रेमी बाबासाहेबांच्या भारत-राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पास सुरुंग?
मित्रांनो,
आजघडीला भारतात मात्र एकजिनसी समाजरचना दिसत नाही. ही राष्ट्रनिर्मिती मधील मोठी अडचण होय. या अडचणीवर शक्य तितक्या लवकर मात करणे गरजेचे आहे. सर्व भारतीयांना कायद्यापुढील समानता ज्याअर्थी मान्य करण्यात आली आहे त्याअर्थी सर्व भारतीयांसाठी समान कायदे असणे हेही तितकेच महत्वाचे आहे. कोणत्याही धर्माचे स्वतंत्र कायदे असणे हि बाब सार्वजनिक जीवनात भेदभाव निर्माण करणारी राष्ट्रविरोधी बाब ठरते. बाबासाहेब त्यांच्या संविधान सभेतील शेवटच्या भाषणात म्हणतात, ” मी या मताचा आहे की, आपण एक राष्ट्र आहोत यांवर विश्वास ठेवणे म्हणजे जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आहे असा समज बाळगण्यासारखे होय. हजारो जातींमध्ये विभागलेल्या लोकांचे राष्ट्र कसे बनू शकेल. सामाजिक आणि मानसिक दृष्ट्या अजूनही आम्ही एक राष्ट्र नाही याची आम्हाला जेवढ्या लवकर जाणीव होईल तेवढे ते आमच्या हिताचे ठरेल. त्यानंतरच एक राष्ट्र होण्याच्या गरजेचे महत्व आम्हाला कळेल आणि आमच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कोणत्या मार्गांचा आणि उपायांचा अवलंब करावा याचा आम्ही गांभीर्याने विचार करू शकू. या ध्येयाप्रत पोहोचणे अतिशय कठीण आहे. अमेरिकेतील लोकांना जेवढे कठीण होते त्याहीपेक्षा कितीतरी पटीने कठीण आहे. अमेरिकेत जातीची समस्या नाही. भारतात जाती आहेत. जाती या राष्ट्रविरोधी आहेत. पहिली गोष्ट त्या समाजजीवनात विभागणी करतात, त्या राष्ट्रविरोधी आहेत कारण त्या जातीं-जातींमध्ये मत्सर व तिरस्काराची भावना निर्माण करतात. आम्हाला वास्तवात जर राष्ट्र व्हायचे असेल तर या सर्व अडथळ्यांवर आम्ही मात केली पाहिजे. राष्ट्रनिर्मिती नंतरच बंधुत्व वास्तवात पहावयास मिळेल. बंधुत्वाशिवाय असलेली समता आणि स्वातंत्र्य म्हणजे रंगाच्या वरवरच्या थरासारखा केवळ बाह्य देखावा असेल. आपल्यापुढे जे महान कर्तव्य आहे त्यासंबंधीचे माझे विचार असे आहेत. काही लोकांना ते फारसे आवडणारही नाहीत.” तेव्हा बाबासाहेबांनी आपल्याला राष्ट्रनिर्मितीकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित केले आहे. हे आपण कदापिही विसरता कामा नये. तत्वाधारीत कायदेशीर लोकशाहीच्या रुजवणुकीतुन ते साध्य करावयाचे आहे. मात्र लोकशाहीच्या रुजवणुकीसाठी जनतेतील सहसबंध हे एकजिनसी स्वरूपाचे असावयास हवे. त्यासाठी देशातील जनसमूहाची वाटचाल समाज या मूलभूत संकल्पनेकडे होणे गरजेचे ठरते. लोकशाहीची मूळे ही जनतेतील आपापसातील सामाजिक सहसंबंध निर्माण करणाऱ्या ‘समाज’ या संकल्पनेत रुतलेली असतात. समाज या संज्ञेतून काय अभिप्रेत असते, काय अंतर्भूत असते? बाबासाहेब म्हणतात, ” थोडक्यात जेव्हा आपण ‘समाज’ या विषयावर बोलतो तेव्हा आपणांस जे अभिप्रेत असते ते म्हणजे तत्वतः एकजिनसी स्वरूप असलेला जनसमूह होय. एकसंधपणाच्या (unity) जोडीला जे गुण असतात त्यात असा प्रशंसनीय जनसमूह जो जनहित व जनकल्याणाची भावना, सार्वजनिक उद्दिष्टांप्रति निष्ठा, एकमेकांप्रति सहानुभूती आणि सहकार्याची भावना अंगी बाळगण्याच्या गुणांनी परिपूर्ण असतो. काय ही आदर्शतत्वे भारतीय समाजात आढळतात? भारतीय समाजात व्यक्तींचा (व्यक्तीला गौण समजले जाते) समावेश नाही. त्यात असंख्य जातींचा समुच्चय आहे. ज्या संबंध जीवनात इतरांशी मिळून-मिसळून वागण्याचे नाकारतात आणि एकमेकांचे समान अनुभव (सुख-दुःख) वाटून घेण्यास ज्यात काहीही वाव नसतो आणि आपापसात सहानुभूतीचा बंधही नसतो. ह्या वास्तवामुळे या मुद्याबाबत वादावादी करण्याची गरज नाही. (कारण ते इतके स्पष्ट दिसणारे आहे) जातींचे अस्तित्व हे समाज निर्मितीची आदर्शतत्वे चिरकाल नाकारणारे आहे आणि म्हणूनच ते लोकशाही नाकारणारे आहे.” (वरील उतारा हा मूळ इंग्रजीत असून तो मराठीत स्वैर अनुवादीत केला आहे) तेव्हा भारतीय जनसमूह हा जोवर असंख्य जातीत विभागला आहे तोवर भारतास लोकशाही राष्ट्र संबोधता येणार नाही. तेव्हा जातींचा बिमोड करणे अत्यावश्यक आहे. जातींचा बिमोड करण्यासाठी बौद्ध धर्माशिवाय अन्य पर्याय नाही. बौद्ध धर्म स्वीकारल्यानेच जातीच्या मानसिक रोगातून मुक्त होता येते व तद्वतच एकजिनसी समाजरचना ही राष्ट्र निर्मितीकडे वाटचाल करण्यास कारणीभूत ठरते. बाबासाहेब म्हणतात, ” बौद्ध धम्म जातीविरहीत एकजिनसी समाजरचनेचा पुरस्कार करतो.” (नवी दिल्ली, २ मे १९५०) ज्याअर्थी बौद्ध धम्म एकजिनसी समाजरचनेकडे वाटचाल करावयास लावणारा आहे त्याअर्थी तो लोकशाहीस पुरक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समान नागरी कायद्याचे (सर्व भारतीयांसाठी समान कायदा) खंदे पुरस्कर्ते होते. समान नागरी कायदा म्हणजे सर्व धर्माचा एकच कायदा. वेगवेगळया धर्माची वेगवेगळी कायद्याची छावणी निर्माण करने हे राष्ट्र निर्मितीसाठी घातक आहे हे बाबासाहेबांना पक्के ठाऊक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ” मी कोणताही प्रांतभेद, भाषा, संस्कृती वगैरे भेदभाव कधीच पाळू इच्छित नाही. प्रथम भारतीय नंतर हिंदू किंवा मुसलमान हेही तत्त्व मला पटत नाही.
सर्वांनी प्रथम भारतीय, अंतिमतःही भारतीय, भारतीय पलिकडे काहीच नको हीच भूमिका घ्यावी. हीच वृत्ती ख-या भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याला परिपोषक आहे.”
(संदर्भ. लेखन आणि भाषणे खंड 18 भाग 2, पान क्र.137) डॉ बाबासाहेब आंबेडकर हे प्रखर राष्ट्रवादी, राष्ट्रप्रेमी होते. ते बौद्ध धर्माभीमानी होते परंतु धर्माच्या नावावर भिन्न भिन्न धर्मासाठी भिन्न भिन्न कायदे करून राष्ट्र विभक्त होईल असे कृत्य कटाक्षाने टाळणारे होते. जाती, धर्माची विषमता नष्ट व्हावी यासाठी बौद्ध, जैन, शिख हे वेगळा कायदा मागत होते तेव्हा ते म्हणतात, “आपण सर्व कोणत्याही कीमती मधे एकत्र येण्याचा प्रयत्न केला पाहीजे, प्रत्येकाला वेगवेगळा धर्म असु शकतो, कुणी देवांवर विश्वास ठेवेल तर कुणी आत्म्यावर विश्वास. तो आध्यात्मिक विषय आहे. ते काही जरी असले तरी आपल्या अन्तर्गत संबंधांना बांधून ठेवण्यासाठी आपण कायद्याची एकच पद्धती विकसित केली पाहीजे.” खंड 14(2)पान -1172-) यापूर्वी बौद्ध ,जैन ,शिख यांना वेगळा कायदा मागणाऱ्यांना बाबासाहेब म्हणालेत की, “आपण शक्यतोवर एकत्र येण्याचा प्रयत्न केला पाहीजे आणी आपण नेहमी फुटीरतेचे बी पेरू नये. या सभागृहात जेव्हा एकत्रीकरणाचा मुद्दा येतो तेव्हा कुणीतरी उठतो व म्हणतो, “आम्ही या गटात मोडत नाही आणि आम्हांला हा कायदा नको.” (संदर्भ- खंड 14(2)पान 1171) हिन्दू कोड बिलाच्या कलम 2 मधे बाबासाहेबांनी हा कायदा हिन्दू , बौद्ध, जैन, शिख यांना लागु होण्याबाबत प्रस्तुत केला तेव्हा काही सनातनी खासदारांनी कडाडून विरोध केला की त्यात वरील उल्लेखित धर्मीय नकोत. या एका कलमावर संसदेत सात दिवस वाद झाला परंतु बाबासाहेब त्या॑ना जुमानले नाही, ते म्हणाले की, ” या कायद्यात बौद्ध, जैन, शिख राहतील. नाही तर कुणीच रहाणार नाही.” (खंड 14(2)पान 1156) जेव्हा हिन्दू म्हणजे कोण हा मुद्दा आला तेव्हा ते म्हणाले की, ” जे लोक हिन्दू धर्माला मानतात व जे मानत नाहित ते या कायद्यासाठी हिन्दू समजावे.” डॉ बाबासाहेब हे प्रख्यात कायदेतज्ञ होते. कायद्याची भाषा ही तांत्रिकदृष्ट्या असते. वैचारिक सिद्धांताची मांडणी व कायद्याची भाषा या दोन वेगवेगळया लेखन पद्धतीआहेत. हा भेद एकदा समजला तरच हा मुद्दा समजतो. हिन्दू कोड बिलातून हिंदुत्व लादले नाही तर कायद्याचे नाव हिंदू दिले पण त्यात बुद्धा ची समता, स्वातंत्र्य, बंधुत्व ही तत्वे त्यांनी टाकलीत म्हणुन त्यांना प्रचंड विरोध झाला. मग मुद्दा असा येतो की त्यांना हिन्दू कायदा हे नाव पाहीजे होते काय? मुळीच नाही. त्यांना सर्व धर्माच्या लोकांसाठी एकच भारतीय कायदा पाहीजे होता त्यासाठी त्यांनी हिन्दू कोड द्वारे पायाभरणी केली. ते म्हणतात, “हिन्दू कोड हे समान नागरी कायद्याची पहली पायरी आहे.” यातून उद्या समान नागरी कायदा बनविणे सोपे जाईल असा त्यांचा दृष्टिकोन होता. ” उद्या मुसलमान या अल्पसंख्य लोकांना यातील सुधारणा सांगू.” असेही ते म्हणाले (खंड 18भाग 3पान 185) हे सर्व राष्ट्र निर्मितीच्या प्रेमास्तव समान नागरी कायदा करण्यासाठी त्यांनी केले.
ते म्हणतात “समान नागरी कायदा व्हावा ही माझी फार फार ईच्छा आहे.” (खंड 18 भाग 3 पान 226) बाबासाहेबांनी अनेकदा समान नागरी कायद्याची भूमिका व्यक्त केली पहा खंड 18(3) पान 185, 226, 288, 342, बाबासाहेबांची ही ईच्छा पूर्ण केली तर हिन्दू कायदा असे नाव राहणार नाही तर भारतीय कायदा असे ते नाव होईल. ज्याला समान नागरी कायदा म्हणतात, तो आरक्षणाबाबत नसतो तर फक्त विवाह, वारस, दत्तक या बाबींचे नियमन करण्यासाठी असतो. समान नागरी कायदा करा अशी तरतूद बाबासाहेबांनी घटनेच्या कलम 44 मधे केली कारण ते प्रखर राष्ट्रनिष्ठ होते, राष्ट्रप्रेमी होते. संकुचित वृत्तीचे नव्हते. तेव्हा त्यांनी सुचविलेल्या दिशेनेच मार्गक्रमण करणे हे शहाणपणाचे ठरेल. आपले समाजबांधव कधी समान नागरी कायद्याची मागणी करीत नसल्याने व तो कधी होणारच नाही अशी नाउमेदपणाची भाषा करण्यात धन्यता मानतांना दिसतात ही चिंताजनक बाब आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला समान नागरी कायदा करा असा निर्देश नेहमीच दिला आहे. आपण बाबासाहेबांच्या दिशेनेच वाटचाल केली पाहीजे. मागे केंद्रीय विधी मंत्र्यांनी विधी आयोगाला समान नागरी कायद्याचे प्रारूप बनविण्याचे निर्देश दिले आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या संरक्षणासाठी, अंमलबजावणीसाठी व राष्ट्रनिर्मितीसाठी समान नागरी कायद्याचा आग्रह धरणे हे राष्ट्रप्रेमी बौद्धांचे आद्यकर्तव्यच होय.
जय प्रबुद्ध भारत
दि.१०/०२/२०१८
प्रशिक आनंद
दीक्षाभूमी नागपूर
www.republicantimes.in
विशेष साभार : भूतपूर्व न्या.अनिल वैद्य सर