भावकी-बौध्दांचं आत्मचिंतन!
हे बहुजन,बहुजन करणारे जरा जास्तच शहाणपणा करु लागलेत. काय तर म्हणे, बाबासाहेबांनी पुणे करारावर स्वाक्षरी केली ही त्यांची फार मोठी ऐतिहासिक चूक होती. आता बाबासाहेबांचं मुल्यमापन करण्याची ह्यांची पात्रता तरी आहे काय? समजा, बाबासाहेबांनी स्वाक्षरी केलीच नसती आणि गांधी मेले असते तर हे मुल्यमापन करणारे सुध्दा गर्भातल्या गर्भातच मेले असते. त्या गोडसेने गांधीची हत्त्या केल्यानंतर पुण्यातल्या ब्राह्मणांची काय ससेहोलपट झाली, हे ह्यांना माहित नाही काय? पण या ऊंटावरच्या शहाण्यांना सांगणार कोण? काय तर म्हणे,बौध्दांनी बहुजनांपर्यत पोहोचायला हवे होते. कशासाठी,कुणास ठावे? स्साला स्वत: बौध्द व्हायला मागत नाहित आणि आमच्यावरच टिकेची झोड उठवताहेत. जणू काही आम्ही बौध्द झालो, हा आम्ही अक्षम्य गुन्हाच केला आहे. म्हणे जाती तोडो, समाज जोडो. मग या जाती तोडल्यानंतर जो समाज निर्माण होईल, त्याला काय संबोधन वापरणार ते हे सांगतच नाहित. जाती तोडो- समाज जोडोचं ओरिजनल आंदोलन ख-या अर्थाने जे झालं ते १४ आँक्टोबर १९५६ साली. या आंदोलनातून जो एकसंघ समाज निर्माण झाला त्याला बाबासाहेबांनी अगदी स्पष्टपणे ‘बौध्द समाज’ म्हणजेच ‘बौध्दजन’ असे नाव दिले. पण म्हणतात ना, ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं, असाच या बहुजनवाल्यांचा ऊद्योग दिसतो आहे. बाबासाहेबांनी जेंव्हा बौध्द धम्माची दिक्षा घेतली तेंव्हा त्यांच्या पाठीशी १०० टक्के जर कोणती जात उभी राहिली असेल तर ती एकमेव महार जात होय, हा इतिहास आहे. बाबासाहेबांच्या एका हाकेसरशी आपल्या वाढलेल्या जटा कापून व घरातले तेहत्तीस कोटी देव भिरकाऊन महाराष्ट्रातला महार सर्व प्रथम बौध्द झाला. बाकीचे मात्र अंगचोरपणा करुन बाबासाहेबांनी दिलेल्या सवलती ऊपभोगत राहिले. आपल्याला सर्वच क्षेत्रात मिळत असलेल्या सोयी सवलती कुणामुळे मिळाल्यात हे ह्यांना माहित नाही, असं मुळीच नाही. ह्यांना हे चांगलं माहित आहे.म्हणूनच केवळ औपचारिकपणे बाबासाहेबांचे नाव घ्यायचे आणि स्वत:चं तकलादू पुरोगामित्व सिध्द करण्यासाठी फक्त बहुजन,बहुजन म्हणत रहायचे. बुध्दांचा ऊल्लेखही न करता केवळ बाबासाहेबांना स्विकारणारे हे फक्त अर्धामुर्धा आणि आपल्या सोयीचा बाबासाहेब स्विकारत असतात. बुध्द स्विकारल्याशिवाय परिपूर्ण बाबासाहेब स्विकारताच येणार नाही. कारण बाबासाहेब व बुध्द ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दुसरी बाब ही की ज्यांना खरोखर मनापासून बहुजन व्हायचं असेल तर त्यांना प्रथम बौध्दजनच व्हावं लागेल.
बाबासाहेबांनी धम्मचक्रप्रवर्तन करुन थोडीथोडकी नव्हे तर ६० वर्षे लोटली आहेत. हे जर खरेच शहाणे असते तर ह्यांनी आपल्या सारासारविवेकबुध्दीला स्मरुन कधीच बौध्द धम्माचा स्विकार केला असता. पण ह्यांचं अजून बहुजन,बहुजनच चाललं आहे. आता बहुजन,बहुजन बस्स झालं,आता फक्त बौध्दजनच हे फक्त ऊपरेकाकांनाच कळलं आणि स्पष्ट भूमिका घेऊन,त्यानी ‘चलो बुध्द की ओर’ चा नारा दिला. बाकीचे मात्र अजुन ‘चलो मुलनिवासीकी ओर’ हाच नारा देत आहेत. ऊपरेकाका म्हणायचे, ओ.बी.सी.म्हणजे ओरिजनल बुध्दिस्ट कम्युनिटी. आपण पूर्वाश्रमीचे बौध्दच आहोत. आपलं मुळ बुध्दच आहेत. बामसेफला मात्र अजून आपलं मुळ सापडलेलं दिसत नाही. किंवा सापडलं असलं तरी त्या मुळाकडे जाण्याची त्यांची मानसिक तयारी झाल्याचे दिसत नाही.
बाबासाहेबांना या संपूर्ण भारताला आपल्या मुळ असलेल्या स्वग्रुही आणायचे होते. म्हणून तर त्यांनी भारत बौध्दमय करण्याचं स्वप्नं पाहिलं होतं. हे स्वप्नं म्हणजे शेखचिल्लीसारखं झोपेत पाहिलेलं स्वप्नं नव्हतं.तर ते एका दुरद्रुष्टी असलेल्या भविष्यवेत्त्याने पुर्णपणे जाग्रुतावस्थेत पाहिलेलं स्वप्न होतं. आपण असू किंवा नसू पण या देशाला बौध्दमय व्हावच लागणार आहे, हे बाबासाहेबांना चांगलं माहित होतं. भारताला पुन्हा बुध्दांकडे येण्यावाचून गत्यंतरच नाही, याची पुर्ण कल्पना बाबासाहेबांना होती. थोड्या वेगळ्या शब्दात सांगायचं तर १४ आँक्टोबर १९५६ ला स्टार्ट झालेल्या बौध्द धम्माच्या या सुपर एक्सप्रेस ट्रेनमध्ये या देशातील प्रत्येकाला बसावच लागणार आहे. या ट्रेनमध्ये सर्वप्रथम आम्ही चढलो आहोत. त्यामुळ साहजिक आम्ही फर्स्टक्लासमधून प्रवास करतो आहोत. आमच्या नंतर लक्ष्मण माने आणि काल परवाच ऊपरेकाकांच मुलगा आपआपल्या लोकांना घेऊन या बुध्दत्वाच्या ट्रेनमध्ये चढला आहे. हळू,हळू ही ट्रेन भरत जाणार आहे आणि सरते शेवटी जो राहिल त्याला मालडब्ब्यामधून किंवा लोंबकळत प्रवास करावा लागणार आहे. आम्ही तर केंव्हाचेच बुध्दत्वाच्या महासागरात विलीन होऊन समुद्र बनलोय. ज्या नद्या,नाल्यांना समुद्र व्हायचं असेल त्यासाठी समुद्र नद्या,नाल्यांकडे येणार नाही तर नद्या,नाल्यांनाच समुद्राकडे यावं लागणार आहे.
म्हणूनच बहुजनवाल्यांनी कितीही जरी व्यापक विचार मांडण्याचा आव आणला तरी बौध्दांनी त्यात न्यूनगंड बाळगण्याचं काहिच कारण नाही. कारण बुध्दापेक्षा व्यापक संकल्पना मांडणारा अजून या जगात जन्माला आलेला नाही. अशा प्रगत विचारसरणीचे आपण एक अविभाज्य अंग आहोत. आणि याचा प्रत्येक बौध्दाला सार्थ अभिमान वाटला पाहिजे. बाबासाहेबांना साथ देणारी इमानी जात आपणच आहोत, याचा आपण गर्व बाळगला पाहिजे. बौध्द असणं म्हणजे सूसंस्क्रुत असणं, प्रगत असणं, बुध्दिमान असणं. आणि म्हणूनच ज्यांना कुणाला अठरा पगड जातीची मोट बांधून बहुजन चळवळीचं राजकारण करायचं असेल त्यांना खुशाल करु द्यावं. बौध्द माणसाने त्यात पडायचं कारण नाही. कारण आता आपली ध्येय्य,आपली ऊद्दिष्टं आणि आपली दिशा पुर्णत: वेगळी आहे. या बहुजनवाल्यांच्या नादी लागून आपण आपला वेळ,पैसा आणि शक्ती वाया घालविण्यापेक्षा आता फक्त आपण आपल्यावरच लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याला जो मार्ग दाखविला आहे त्या राजमार्गावर चालताना आपल्याला साठ वर्षे होऊन गेली आहेत. जर आपल्याला पुढे मार्गक्रमण करायचे असेल तर या साठ वर्षाचं आपण परिशिलन केलं पाहिजे. विशेषत: यासाठी बौध्दांच्या तरुण पिढीने आपली पूर्वपिठिका जाणून घेणं अगत्याचं ठरेल.
या पूर्वपिठिकेच्या अनुषंगाने तुम्ही कधीही न ऐकलेली साठ वर्षापूर्वीची एक सत्य घटना सांगतो. जुन्नर तालुक्यामध्ये’गोडेगाव’ नावाचं एक गाव आहे. या गावात बौध्दांची ५०-६० घरे असतील. त्या काळात ७वी ची परीक्षा बोर्डाकडून घेतली जायची. त्या परीक्षेला व्हर्नाकुल फायनल बोर्ड असेही म्हणत असत. ही परीक्षा पास केली की लगेच प्राथमिक शिक्षकाची नोकरी मिळायची. गोडेगावचं विशेष म्हणजे गावात सगळ्यात जास्त शिक्षक हे महार समाजाचे होते. त्यामुळे शिकलेल्यांचा गाव म्हणून गोडेगाव पंचक्रोशीत प्रसिध्द होतं. गावातले मराठा बहुतेक या महार मास्तरांचे विद्यार्थी असल्याने ते या मास्तर मंडळींचा आदर करायचे. या मास्तर मंडळींचे राहणीमानही अगदी टापटिपीचे असायचे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर या गोडेगावच्या महारांनी धम्मदिक्षेचा कार्यक्रम आपल्या गावात करायचे ठरविले. प्रमुख पाहुणे होते आर.डी.भंडारे साहेब. भंडारे साहेबांच्या ऊपस्थितीत गोडेगावात भव्यदिव्य असा धम्म दिक्षेचा कार्यक्रम संपन्न झाला. चावडी समोरचे पटांगण माणसांच्या गर्दिने फुलून गेले होते. कार्यक्रमानंतर पु-या,गुळवणी आणि वांगी, बटाट्याची भाजी असा खुमासदार जेवणाचा बेत होता. पंगत बसली, वाढप्यांची धांदल उडाली. जेवणानंतर गोविंद म्हशिलकर, मंचरचे लव्हाजी देठे आणि गोडेगावची प्रबुध्द गायन पार्टी असा कव्वालीचा तिरंगी सामना होता. पण हे महार, हिंदू धर्माला ठोकरुन बौध्द होताहेत म्हणून गावातल्या एकाचीही या कार्यक्रमाला विरोध करण्याची छाती झाली नाही.
या पाठीमागचं कारणही रोमहर्षक आहे. म्हणजे साधारणत: या दिक्षा समारंभाच्या दहा बारा वर्षापूर्वीची घटना असेल. तेंव्हा देश स्वतंत्र झाला नव्हता. या दहा बारा वर्षापूर्वीच्या घटनेचा धसका गावानेच नव्हे तर सगळ्या पंचक्रोशीने घेतला होता. ती घटना अशी की, मधल्या आळीच्या भक्ताजीच्या घरी त्याच्या घरच्या देवाचे कंदूरीचे जेवण होते. मटणाच्या जेवणावर ताव मारण्यात वस्तीतली सगळी बाया,बापडे,मुले,मुली तुटून पडली होती. हे सगळं चालू असतानाच गावचा मुलकी पाटील तिथे अवतरला आणि तो जोरजोरात सगळ्यांना शिव्या घालायला लागला, म्हणाला, “म्हारड्यांनो,भडव्यांनो इकडे जेवत बसलात आणि तिकडे डाक बंगल्यावर तुमचा बाप प्रांत साहेब आलाय. त्याची कामे कोण करणार?” पाटलाच्या या आवाजाने सगळेच गपगार झाले. हे पाहून पाटलाचा पारा आणखीनच चढला. लोकांच्या ढुंगणाखालच्या चटया,सतरंज्या ओढत,शिव्यांचा भडीमार करीत तो जेवायला बसलेल्यांना उठऊ लागला. सगळ्या जेवणात त्याने माती कालवली. हे पाहून काशीराम महार, जो येसकराचं काम करायचा, त्याने सगळ्यांना आवाज दिला की,आपआपला ताटे उचला आणि बंगल्यावर चला. आणि मग ६०-७० जणांचा जमाव आरडा ओरडा करीत डाक बंगल्यावर प्रांत साहेबासमोर ऊभा राहिला. तेथे असलेल्या दुभाष्याकडून प्रांत साहेबाला जेंव्हा घडलेला प्रकार कळला तेंव्हा त्याला फार राग आला आणि त्याने आँर्डर दिली, “व्हेअर इज पाटील.अँरेस्ट हिम!” पाटलाला अँरेस्ट करणार, ही बातमी सगळ्या गावात पसरली आणि मग गावातली सगळी प्रतिष्ठित मंडळी डाक बंगल्यावर येऊन प्रांत साहेबाला शांत करु लागली. पण प्रांत साहेब कुणालाच ऐकेना. एक दिड तासानंतर पाटलाला अटक करण्याऐवजी त्याला पाटीलकीच्या कामातून बडतर्फ करावे, असा समझोता झाला. अशा रितीने गोडेगावच्या महारांनी पाटलाला धडा शिकवला. या घटनेमुळे महार मंडळींकडे बघण्याचा गावाचा द्रुष्टिकोन बदलला.
या सारख्या अनेक घटना सांगणारं ‘भावकी’ नावाचं पुस्तक गेल्या ५ डिसेंबरला प्रकाशीत झालय. जे बौध्द तरुण आहेत त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे. बाबासाहेबानंतरचा बौध्द समाजाचा प्रवास कसा,कसा झाला, याचं अत्यंत तपशीलवार वर्णन या पुस्तकात आहे. बौध्दांच्या धार्मिक संघटना किती हे आपल्याला नक्की सांगता येणार नाही. पण बौध्दांच्या सात धार्मिक संघटना आहेत, हे आपल्याला हे पुस्तक वाचल्यावर कळतं. आजच्या तरुणांना आपल्यात किती जाती होत्या हे माहित नाही. एका अर्थाने ते चांगलच आहे. पण सांस्क्रुतिक द्रुष्टीने हे जाणून घ्यायचं झालं तर तीही माहिती हे पुस्तक आपल्याल पुरवतं. आपल्यातल्या नेत्यांचे,साहित्यिकांचे,विचारवंतांचे आणि समाजाचे नेमके गुणदोष हे पुस्तक आपल्याला दाखवतं
पण हे वाचताना त्याचं कुणालाही वाईट वाटत नाही. कारण हे बहूआयामी पुस्तक लिहणारा माणूस आपला असल्याने त्याने हे सगळं आपलेपणाने व आत्मियतेने लिहलं आहे. चळवळीमधून आलेला हा माणूस आपल्या ७० वर्षाच्या आयुष्यात जे जगलं, जे भोगलं ते त्यानं अत्यंत प्रामाणिकपणे त्याने या पुस्तकात मांडलं आहे. त्याच्या जगण्याचा अर्क म्हणजे त्यांचं हे भावकी नावाचं पुस्तक होय. सत्तर वर्षाच्या या तरुणाचं नाव आहे सयाजीराव वाघमारे. मी सयाजीरावांना तरुण म्हणतो ते यासाठी की, ते आजही वयाच्या सत्तराव्या वर्षीही महार वतनी जमीनीचा लढा लढताहेत. नामदेव ढसाळांच्या लग्नानंतर त्यांच्या घराची व्यवस्था सयाजीरावांनी केली होती. नामदेव ढसाळ,भाई संगारे यांच्याशी त्यांचे मित्रत्वाचे घनिष्ट संबंध होते. सरकारी नोकरी संभाळूनही पँथरच्या चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग होता. काही काळ ते रिपब्लिकन पक्ष (खोरिप)चे मुंबई प्रदेशचे व नंतर महाराष्ट्राचे अध्यक्षही होते. बांद्र्याच्या प्रद्न्या सांस्क्रुतिक केंद्राचे ते संस्थापक अध्यक्ष होते. तिथल्या त्रिरत्न बुध्दविहाराच्या ऊभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सध्या ते महार वतनी जमिनी बचाव क्रुती समितीचे अध्यक्ष आहेत.
पूर्वाश्रमीची महार जात आणि आताची बौध्द समाजाची स्थित्यंतरे ते स्वत: जगले आहेत. पूर्वीची ‘भावकी’ म्हणजे आपल्या संघशक्तीची द्योतक होती, असं त्यांना ठामपणे वाटतं. या संघशक्तीच्या बळावरच परिवर्तनाची कैक आंदोलने यशस्वी झाली होती. आज मात्र भावकी हा प्रकार नामशेष होत असल्याची ते खंत व्यक्त करतात. आज कोणीही ऊठतो आणि काहीही करतो, अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा ऊठवळांवर अंकुश ठेवणारी भावकी आज असायला हवी होती, असं त्यांना प्रामाणिकपणे वाटते. म्हणूनच त्यानी आपल्या पुस्तकाचं नाव ‘भावकी-बौध्दांचं आत्मचिंतन’ असं ठेवलं आहे. भावकी म्हणजे आपलं पूर्वसंचित आहे. बौध्दांची एकजूट करायची असेल तर पुन्हा एकदा ‘भावकी’ निर्माण व्हायची गरज आहे. एका चळवळीतल्या प्रामाणिक बौध्दाने बौध्द समाजाचं केलेलं हे प्रांजल परिशिलन आपण आणि विशेषत: बौध्द तरुणांनी वाचलच पाहिजे. हे पुस्तक कुठे मिळेल हे मला माहित नाही. म्हणून मी तुम्हाला सयाजीरावांचा फोन नंबरच देतो. तो नंबर ९८९२०६६९६७ असा आहे. प्रत्येक जीद्न्यासू व सुजाण बौध्दाने सयाजीरावांना फोन करुन एकदा का होईना पण त्यांना आपल्या भावकीत घ्यायला काय हरकत आहे?
विवेक मोरे
. मो. ८४५१९३२४१०