तरुणांनो आत्मविश्वास बाळगा आणि लक्षात ठेवा- सतत दिर्घोद्योगांनेच मनुष्य पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो


? तरुणांनो आत्मविश्वास बाळगा आणि लक्षात ठेवा- सतत दिर्घोद्योगांनेच मनुष्य पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो.?

आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नये. उदाहरणार्थ, कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरलेल्या पहिलवानाने दुसऱ्याच्या ठणठणीत दंड थोपटण्याने घाबरून गर्भगळीत झाल्यास त्याच्या हातून काही तरी होणे शक्य आहे काय? मी तर नेहमी असे म्हणत असतो की मी जे करीन ते होईल. अर्थात, मी हे सर्व आत्मविश्वासावर अवलंबून म्हणत असतो. माझ्या या म्हणण्यामुळे काही लोक मला घमेंडखोर, प्रौढीबाज वगैरे दूषणे देतील. परंतु ही प्रौढी अगर घमेंड  नसून आत्मविश्वासामुळे मी हे म्हणू शकतो. मी सुद्धा तुमच्या सारखाच एका महारीन बाईच्या  पोटी जन्मास आलेलो आहे. गरिबीच्या दृष्टीने विचार करिता आजच्या गरीबातील गरीब विद्यार्थ्यांपेक्षा माझी त्यावेळी मोठी चागली सोय अगर मला  इतर अनुकूलता होती असे नाही. मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपारमेन्टच्या चाळीत दहा फूट लांब व दहा फूट रुंद अश्या खोलीत आई-बाप भावंडे यांच्यासह राहून एका पैश्याच्या घासलेट तेलावर अभ्यास केला आहे. इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना व संकटांना त्याकाळी तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो तर तुम्हास आजच्या साधन-सामुग्रीने सज्ज असलेल्या काळात अशक्य का होईल? कोणताही मनुष्य सतत दिर्घोद्योगांनेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो. कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही. मी विद्यार्थी दशेत इंग्लंड मध्ये असतांना ज्या अभ्यासक्रमास 8 वर्ष लागतात तो अभ्यास मी 2 वर्ष 3 महिन्यात यशस्वीतर्हेनें पुरा  केला. हे करण्यासाठी 24 तासापैकी 21 तास अभ्यास करावा लागला आहे. जरी माझी आज चाळीशी उलटून गेली असली तरी मी 24 तासा पैकी सारखा 18 तास अजूनही खुर्चीवर बसून काम करीत असतो. अलीकडच्या तरुणाला तर अर्धा तास तो सारखा बसला की चिमट्या च्या चिमट्या तपकीर नाकात कोंबावी लागते. नाही तर सिगारेट्स ओढीत हातपाय ताणून काही काळ पेंगल्याशिवाय उत्साह येत नाही.
दिर्घोद्योग व कष्ट करण्यानेच यश प्राप्ती होते. नुसत्या पदव्या मिळविण्याने काही होणार नाही. कारण पदव्या म्हणजे ज्ञान नसून शिक्षकांच्या मदतीशिवाय ज्ञानार्जन करण्यास जमविलेली साधन सामग्री होय. (संदर्भ Vol.18/2)
__ रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर

?जयभीम?

—संग्राहक—
उज्वला इंगोले
समता सैनिक दल, यवतमाळ
www.ssddinia.org

(रिपब्लिकन पार्टी च्या घटनात्मक पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.